ओठांवर हसू फुलवणारी, साडी बँक.
साडी हा महिला वर्गाच्या जिव्हाळ्याचा विषय. प्रत्येक साडीच्या मागे लपलेल्या आठवणी असतात, काही खास साड्या बायका वर्षानुवर्षं जीवापाड जपतात. याला अपवाद असतो तो मात्र लग्नकार्य, वास्तुशांती किंवा तत्सम कार्यक्रमात आहेर म्हणून मिळालेल्या साड्यांचा. या वेळी साडी आहेरातली असल्याने प्रत्येकीला आवडतेच असं नाही, काही वेळेला सुरूवातीला चार दिवस कौतुक होतं, पण नंतर कपाटाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात अश्या नावडत्या, बऱ्याचदा अंगाला एकदाही न लावलेल्या साड्या साठत जातात.
शिवाय ज्यांना हौस आहे, मुबलक पैसा आहे त्या महिला नवनव्या साड्या घेतच राहतात. पण मोलकरणी, मजूर यांच्यासारख्या कष्टकरी वर्गाला मात्र ही चैन परवडण्यासारखी नसते. जुन्यापान्या कशाही साडीचं फडकं अंगावर लपेटत त्यांची कामं सुरूच राहतात. अगदी नव्या, तलम नसल्या तरी चांगल्या, न फाटलेल्या, नेसत्या साड्या, मॅचिंग ब्लाऊज ही इतकी साधी गोष्टसुद्धा त्यांच्यासाठी बऱ्याचदा दिवास्वप्नच ठरते.
मग या महिलांना आपल्या घरातील, आपल्याला नकोश्या झालेल्या पण सुस्थितीतील साड्या पुरविल्या तर? महिलांची गरज भागेल आणि आपल्या घरातला पसारा कमी होईल. गरजूंना काही दिल्याचं समाधान लाभेल ते वेगळंच. याच विचारानं औरंगाबादच्या मुक्त पत्रकार-संशोधक डॉ. आरती श्यामल जोशी यांनी सुरू केलीये- साडी बँक. गेल्या सहा वर्षांपासून ही अनोखी बँक अखंड सुरू असून गरजु महिलांच्या अंगावर साडी बँकेतल्या मायेच्या साड्या खुलून दिसतायत.
साडी बँकेच्या डॉ. आरती जोशी गरजू महिलेच्या चेहऱ्यावर हास्य फुलविताना
मुक्त पत्रकार असलेल्या डॉ. आरतीश्यामल जोशी कामानिमित्त कचरा वेचक महिलांच्या संपर्कात होत्या. त्यावेळी कचरा शोधतांना या महिलांना साडीचा फाटका पदर, तुकडा असं काही सापडलं की ते स्वच्छ धुवून दुसऱ्या दिवशी महिला अंगावर लपेटून घेत, किंवा आहे ती साडी या तुकड्यांनी जोडून सजवायच्या. या सतत घडणाऱ्या प्रसंगांनी आरतीताईंना महिलांची छोट्याश्या गोष्टीतली मजबुरी लक्षात आली. आणि मग या महिलांना मदत करण्यासाठी आधी त्यांनी घरातल्या त्यांच्या स्वत:च्या वापरात नसलेल्या चांगल्या साड्या या कचरावेचक महिलांना दिल्या.
मात्र फक्त आरतीताईंच्या घरातील साड्या पुरेश्या पडेनात, तेव्हा त्यांना साडी बँकेची कल्पना सुचली आणि त्यांनी साड्या दान करण्यासाठी सुस्थितीतील महिलांना आवाहन केलं. त्यांच्या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत गेला आणि साडी बँकेत भरभरून साड्या येऊ लागल्या.
आरतीताईंना समाजकार्याची आवड असल्याने त्यांची औरंगाबादेत ‘आस्था जनविकास’ नावाची सामाजिक संस्था आहेच. या संस्थेच्या माध्यमातून साडी बँकेचे काम केवळ औरंगाबादेत नव्हे तर अनेक शहरांत धडाक्यात सुरू आहे.
उत्तम साडी मिळाल्याने खुश झालेल्या महिला
मुक्त पत्रकार असलेल्या आरतीताई राज्यातल्या अनेक शहरांत कामानिमित्त फिरत असतात. त्या कुठंही असल्या तरी, बाहेर पडतांना त्यांच्या कारमध्ये एका वेळी पन्नासेक साड्या असतात, तर दुचाकीवर असतांना पर्स आणि डिक्कीत पाच साड्या ठेवूनच आरतीताईंचा प्रवास सुरू होतो. एखाद्या सिग्नलवर, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी, कचरा प्रकल्पावर जिथं-जिथं गरजू महिला आढळतील, त्यांच्याशी आरतीताई गप्पा मारतात. गरजेनुसार त्यांना साड्या देतात.आजकाल त्यांच्याकडे सहावारी साडीसोबत नऊवारी साडीची मागणीही वाढीला लागतेय, म्हणून आता नऊवारी साड्याही जमा केल्या जातायत.
कामानिमित्त राज्याच्या वेगवेगळ्या भागात जावे लागते त्यामुळे साडी बँकेचा पसारा राज्यभर पसरला आहे. आजवर पंचवीस हजारांहून अधिक साड्यांचे वाटप झालं असून, साडी दिल्यानंतर गरजु महिलांच्या चेहऱ्यावरील आनंदच बोलका असतो, असं आरतीताई सांगतात.
त्यांच्या कामाची दखल घेत वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या वतीने आरतीताईंचा गौरव करण्यात आला आहे. यासोबतच त्यांच्या संस्थेद्वारे त्या पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, गरजूंना अन्नदान, होळीची पुरणपोळी होळीत टाकण्याऐवजी गोळा करून गरीब वस्तीत वाटणे अशी अनेक समाजोपयोगी कामंही करत असतात.
पोस्टला देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आरती ताई औरंगाबादमध्ये असतात, त्यामुळे तिथल्या आसपासच्या महिलांनी त्यांच्याकडे साड्या पाठवायला हरकत नाही, पण दुसर्या शहरातील महिलांना त्यांना साड्या कुरिअर कराव्या लागतील. तो खर्च वाचविण्यासाठी जर तुम्ही स्वतःच आपापल्या गावातील गरजू महिलांना थेट साड्या दिल्या, तर त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान तुम्हाला तिथंच पाहायला मिळेल. त्यासाठी एखाद दुसरी साडी बाहेर पडताना तुमच्यासोबत ठेवा. मार्गदर्शनासाठी आरती ताईंचा नंबर:
9923106566
लेखन: प्राची उन्मेष, नाशिक
नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/

Leave a Reply