ओळख नव्या आमदारांची

 

राजेश उदयसिंग पाडवी, शहादा-तळोदा (जि.नंदुरबार)

स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर देखील पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध नसलेला शहादा-तळोदा मतदारसंघ. जिल्ह्यात तुलनेने आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली शहरे म्हणून या दोन्ही तालुक्यांकडे पाहिले जाते. मात्र आजही शिक्षणासाठी परिपूर्ण सुविधा नसल्याने येथील मुलांना परजिल्ह्यात जावे लागते. आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याने उपचाराअभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा स्थितीत आपल्या जन्मभूमीचा कायापालट करण्याच्या हेतूने पोलीस खात्यातील उच्च पदाची नोकरी सोडून आलेल्या राजेश पाडवी यांच्यावर जनतेने विश्वास टाकत मतदार संघाच्या प्रतिनिधित्वाची संधी दिली.

मुंबई विद्यापीठातून बीए (राज्यशास्त्र) पदवी घेतल्यानंतर प्रशासकीय सेवेत जाण्याची ईच्छा बाळगत राजेश उदयसिंग पाडवी यांनी स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली. सन १९९२ मध्ये एमपीएससी परीक्षेत यश मिळवत राजेश हे मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. तंदुरुस्तीसाठी नियमित व्यायामासह क्रिकेट व हॉलीबॉल या खेळांची आवड ते जोपासतात. एकीकडे व्यक्तिगत करिअर घडत असताना जन्मभूमी असलेला भाग विकासापासून वंचित असल्याची जाणीव त्यांना होती. आपण काहीतरी केले पाहिजे, या भूमिकेतून २६ वर्षं पोलिस दलात सेवा दिल्यानंतर सन २०१९ मध्ये राजेश यांनी राजकारणात येण्याचे ठरवले. तेव्हा ते अंधेरी पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक पदावर कार्यरत होते. भाजपने उमेदवारी दिल्यानंतर ते शहादा तळोदा मतदार संघातून विजयी झाले.
वडील जनसंघापासून राजकीय क्षेत्रात असल्याने व पूर्वी याच मतदारसंघाचे आमदारपद भूषवल्याने राजेश यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले होते.


दरम्यान, आमदार झाल्यानंतर आता शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला व बाल विकास व शेती या पंचसूत्रीवर काम करण्याचे राजेश पाडवी यांचे ध्येय आहे.
मतदार संघात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या सर्वाधिक आहे. परिणामी रोजगारासाठी गुजरात व मध्यप्रदेशात मजुरांचे स्थलांतर होत आहे. मतदारसंघात उद्योग, व्यवसाय उभारत रोजगार संधी, लघु उद्योग उभारणी करत या युवक, मजुरांना रोजगार देण्यासाठी पाठपुरावा सुरू केल्याचे पाडवी सांगतात. यासह मतदारसंघातील सर्व अंगणवाड्यांना इमारती उपलब्ध करून देण्यासह दुर्गम भागातील शाळांना डिजिटल, आयएसओ बनवणे, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत लायब्ररी सुरू करणे, नवीन शैक्षणिक सुविधा गटनिहाय उपलब्ध करण्याचे काम पाच वर्षांत पूर्णत्वास नेण्याचे पाडवी यांनी ठरवले आहे.
मतदार संघातील मरणासन्न झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांना नवसंजीवनी देणे हा त्यांच्या अजेंड्यावरील मुद्दा आहे. यामध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे, रिक्त पदांवर कर्मचारी नेमणूक करणे, आवश्यक तेथे उपकेंद्राची संख्या वाढविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. यासह सिंचनाच्या दृष्टीने तीस वर्षांपासून रखडलेला राहट्यावड धरण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २९ कोटी रुपये निधी खेचून आणणार आहोत. धनपूर धरण, सुसरी धरण व इतर सर्व जलप्रकल्पांचे काम गतीने पूर्णत्वास नेणार असल्याचे पाडवी सांगतात.
राज्यातील अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत मी माझ्या स्वर्गीय आईच्या नावाने चालवीत असलेल्या ‘कलावती फाऊंडेशन’ने करार केले असून याद्वारे युवक, युवती, महिला, शेतकरी, बालक अशा सर्व घटकांसाठी विविध उपक्रम राबत आहे. कलावती फौंडेशनच्या माध्यमातून कौशल्य विकास शिबिरे, वित्तसहाय्य करणे, महिलांना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे, त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यापुढेही केली जाईल. पर्यटनाच्यादृष्टीने मतदारसंघातील उनपदेव व कुंडलेश्वर या दोन ठिकाणी विकास कामे करणार आहोत. त्याचप्रमाणे राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळ येथे पर्यटकांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्या, यासाठी विशेष विकास योजनेतून निधी आणणार आहोत. मतदारसंघातील आदिवासी व विकासापासून दूर असलेल्या नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणे हेच माझ्या या नव्या राजकीय इनिंगचे ध्येय असल्याचे सांगत ते काम मी नियोजनबद्ध पद्धतीने सुरू केले असल्याचे पाडवी यांनी सांगितले. निवडणूक काळात दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यास आपण वचनबद्ध आहोत, अशी ग्वाही आमदार राजेश पाडवी यांनी दिली.

– रुपेश जाधव, शहादा, नंदुरबार.

 

Leave a Reply