कचऱ्यातून फुलतं सोनं

“आम्ही दोघं भल्या सकाळी नोकरीसाठी घराबाहेर पडतो. घरात आजारी सासूबाई, मुलं शाळेत. घंटागाडी कधीही यायची, तिची फिक्स वेळ नव्हती. ओला कचरा घरात साठायचा. दुर्गंधी यायची. काय कराव ते कळेना. एक दिवस कंपोस्ट खताबद्दल वाचलं. मग लागले कामाला. घरातल्या घरात ओला कचरा एका सच्छिद्र बादलीत गोळा करुन त्यापासून खत बनवू लागलो.” बँकेत काम करणारी नयना गोखले सांगत होती. नयनाने ओल्या कचर्याच्या निर्मूलनासाठी शोधलेला मार्ग आज तिला हळूहळू घरीच भाज्या, फळे पिकविण्यापर्यंत घेऊन गेला आहे. 

“मी गेली अनेक वर्षं आयटी फिल्डमध्ये कार्यरत आहे. मला कामानिमित्त बाहेर जाव लागायचं. पण जसा कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला तसं मला घरूनच ऑनलाईन काम करायची संधी मिळाली. लॉकडाऊन काळात हाताशी थोडा जास्त वेळ मिळाल्याने आवडत्या छंदाकडे- बागकामाकडे वळलो. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात माझे दोन फ्लॅट आहेत. दोन्ही फ्लॅटची गॅलरी एकत्र करून, मी बागेत काकडी, पालक, वांगी, करडई अशा असंख्य प्रकारच्या भाज्या, फळे पिकविली. आपण पिकवलेली, घरची भाजी, फळे यांची चव काही औरच असते याचा अनुभव आला. याला यश मिळाल्यावर मी गॅलरीतील बागेसह, फक्त पाण्यावर रोपं वाढवण्याचा (हायड्रोपोनिक्स) अभिनव प्रकार करून पहिला. तोही शंभर टक्के यशस्वी झाला. घरात एका कोपऱ्यात मी हा प्रयोग केला असून, रोपांना बल्बद्वारे प्रकाश देतोय. याला जागा कमी लागते, केवळ पाणीच लागते आणि भरपूर पिक येतं. माझ्या बरोबर या कामात मला आई, वडील, पत्नी यांची मदत मिळते. याशिवाय सांगायची गोष्ट म्हणजे मी घरातील सर्व ओला कचरा घरातच खत करून जिरवतो. घंटागाडीकडे जायची वेळच येत नाही.” आयटी तज्ज्ञ अजय कामत समाधानाने सांगत होते.

कंपोस्ट खत टाकलेल्या घरच्या बागेतून मिळालेला ताजा भाजीपाला

अशीच कथा चेतना नगरला राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिक राजेंद्र मानकर यांची. त्यांच्या बंगल्याच्या आवारात आणि गच्चीत त्यांनी फुलांची आणि फळभाज्यांची बाग उभारली आहे. टोमॅटो, वांगे, भेंडी, कोबी, फ्लॉवर, बटाटे, आलं, हळद, गिलके, दोडके इ. अनेक गोष्टी पिकवल्या आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून स्वयंपाकघरातील ओल्या कचर्यापासून ते खत तयार करतायत आणि “आम्हांला घंटागाडीच तोंडही बघायची वेळ येत नाही, शिवाय ताजा रसायनमुक्त भाजीपाला मिळतो ते वेगळंच.” हे ही त्यांनी आवर्जून नमूद केलं.

अशी नाशकात घरीच कचरा कुजवून कंपोस्ट खत बनवणाऱ्यांची आणि घरच्याघरी भाजी पिकवणाऱ्यांची किती उदा. सांगावीत? यात नोकरदार आहेत, गृहिणी आहेत, पत्रकार आहेत, व्यावसायिक आहेत आणि ज्येष्ठ नागरिकही आहेत. पण या उपक्रमासाठी लागणारं मार्गदर्शन करतोय तो   ‘गच्चीवरची बाग’ समूह. गेली दहा वर्षे या पर्यावरणपूरक उपक्रमातून संदीप चव्हाण आणि साथीदार नाशिककरांना प्रोत्साहन देत आहेत. “या दहावर्षात ‘गार्बेज टू गार्डन’ ही संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि पर्यावरणाच्या बाबतीत जागरूक नागरिकांनी याला भरभरून प्रतिसाद दिला. घरच्या ओल्या कचऱ्याचं घरीच विघटन करणारा, घरीच सुंदर बाग बनवणारा हा उपक्रम नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक बंधू-भगिनींपर्यंत पोहोचवता आला, याचा आनंद आहे. जवळपास दीड हजार मंडळी कचरा व्यवस्थापनात सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. जैविक अर्थात कुजणारा नैसर्गिक कचरा हा बाग फुलवतांना तर वापरला जातोच पण त्याचे खत करणं हे गरजेचं आहे. कारण त्यातून झाडं आणि रोपांची सेंद्रिय खताची गरज भागून जाते” संदीप चव्हाण सांगत होते.

कंपोस्ट करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी नाशिक महानगरपालिकेतर्फे ‘आत्मनिर्भर वॉर्ड’ या अंतर्गत नाशिक शहरातील सहा ठिकाणी ‘ओला कचरा घरातच जिरवा’ अशी संकल्पना राबविण्यात येतेय. पंचवटीतील महालक्ष्मी नगरच्या रहिवाश्यांवा खत तयार करण्यासाठी कंपोस्टचे कीट मोफत देण्यात आलं. एका सामाजिक संस्थेच्या वतीने हा उपक्रम प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी राबविण्यात आला. या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ९० टक्के लोक आता आपापल्या घरातला ओला कचरा घरातच जिरवत आहेत आणि त्यापासून खत तयार करत आहेत. त्यांना खत कसे तयार करायचे याचे प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. आता घंटागाड्या फक्त सुका कचरा घेणार, ओला नाही असे त्यांना सांगण्यात आले. त्यांनीही ते मान्य केले आहे.

हायड्रोपोनिक तंत्रज्ञान वापरून केवळ पाण्यावर फुलणारी बाग

नैसर्गिक कचरा हा अनेक प्रकारचा असतो. त्यात जेवढे प्रकार तेवढे त्याचे परिणामत्याची गुणवत्तात्यांच्या विरजणाचे आयुष्यत्यांची कंपोस्टिंग करण्याची आणि वापरण्याची पद्धत याचे अनेक प्रकार आहेत. कचरा वाळवणेतो वाफ्यात पसरवणे, नारळाच्या काथ्यापासून कोकोपीट बनवणे असे अनेक उपयोग होतात. होम कंपोस्टिंग करतानाही साधनात सुध्दा विविधता असणे गरजेचे आहे. उदाः प्लास्टिकचा ड्रम,  मातीचा माठविटांचा वाफा अशा वेगवेगळ्या साधनात खत बनवावे. एकाच प्रकारच्या साधनात एकाच प्रकारचे खत सातत्याने करत राहिलो तर एकाच प्रकारचे जिवाणू मातीत प्रविष्ट होत राहतात. परिणामी मातीचा सामू स्थिर होतो आणि मग त्यातून अपेक्षित परिणाम दिसून येत नाही, म्हणून साधन हे बदलत राहणं गरजेचं आहे.

सौरउर्जा वापराला चालना देण्यासाठी शासनाकडून घरपट्टीत पाच टक्के सवलत दिली जाते. त्याच धर्तीवर नागरिकांनी ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट खतामध्ये रूपांतर करण्याची सोय केल्यास, अशा नागरिकांना घरपट्टीत सवलत दिली जाण्याचा प्रस्ताव लवकरच नाशिक मनपात महासभेवर ठेवला जाणार आहे. शहराचा विस्तार होत असताना मुलभूत सुविधा पुरविण्यावरील ताणही वाढतोय. त्यात महापालिकेकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. शहरात मोठ्या प्रमाणात कचरा वाढत असल्याने घरामध्येच कंपोस्ट खत करावे, यासाठी नाशिक मनपाही प्रोत्साहन देतेय. त्याला वाढती साथ हवी वर उल्लेख केल्याप्रमाणे सुजाण नागरिकांची.

लेखन: भाग्यश्री मुळे, नाशिक

नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/

#नवी_उमेद

#ओलाकचराकुजवाकंपोस्टबनवा

#कंपोस्ट

#कचऱ्याचीविल्हेवाट

#गच्चीवरीलबाग

#पर्यावरणप्रेमी

#नाशिक

 

Leave a Reply