–
ज्वारीची कडक भाकरी आणि शेंगाची चटणी हे सोलापूरचे प्रसिध्द खाद्यपदार्थ. ज्वारीच्या या कडक भाकऱ्या अमेरिकेतही पोहोचल्या आहेत. त्यामागे आहेत लक्ष्मी बिराजदार.
३४ वर्षांच्या लक्ष्मी उत्तर सोलापूर तालुक्यातल्या शेळगी परिसरातल्या. शिक्षण फक्त ९ वी. लक्ष्मी मूळच्या पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या. लहानपणीच अंगावर आलेले पांढरे डाग औषधोपचारानं बरे झाले मात्र डागांमुळे घरच्यांनी त्यांचं लवकर लग्न लावून दिलं.
लग्नानंतर त्या आधी कर्नाटकातल्या चडचण इथं आणि नंतर सोलापुरात स्थायिक झाल्या. पती सुरेश गवंडीकाम करणारे. संसार चालू ठेवण्यासाठी लक्ष्मी सुरवातीला शिकवणी घ्यायच्या. नंतर कडक भाकऱ्या विकण्याची कल्पना त्यांना सुचली.
सुरुवातीला या कल्पनेची चेष्टा झाली. पण ”ग्राहकांनी भाकऱ्या घेतल्या तर ठेवू” असं आश्वासन सोलापुरातल्या प्रसिद्ध पेठे दुकानदारांनी सांगितलं. पेठे यांच्या दुकानात ठेवलेल्या कुरकुरीत, खमंग, चविष्ट भाकऱ्या संध्याकाळपर्यंत संपल्यादेखील. बघताबघता संपूर्ण सोलापुरात कडक भाकऱ्या प्रसिद्ध झाल्या. मग २०१३ मध्ये सुरू झाला संतोषीमाता गृहउद्योग. मुद्रा योजनेअंतर्गत २०१७ मध्ये बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन त्यांनी उद्योग वाढवला. सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्राचं वेळोवेळी मार्गदर्शन घेतलं.
शहरातील हॉटेल, ढाबे, दुकानात भाकऱ्या पोहोचल्या. सोलापुरातील रहिवासी या भाकऱ्या , इतर शहरात परराज्यात, परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांना पाठवू लागले. मुंबईतले विक्रेते प्रकाश अमेरिकेतील नागरिकांना मागणीनुसार भाकऱ्या पाठवतात. बाजरीची भाकर पाच तर ज्वारीची भाकर चार रुपये . एका पाकिटामध्ये प्रत्येकी पाच नग. लक्ष्मी रोज ५ हजारपेक्षा जास्त भाकऱ्या करतात. यासाठी त्यांच्याकडे वीस महिला रोजंदारीवर काम करतात. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यांना एका भाकरीसाठी एक रुपया.उद्योगात आता त्यांची मुलगी आणि मुलगाही सोबतीला आहेत. त्यांच्या गृहउद्योगांमध्ये तिळाच्या कडक भाकरी, शेंगा चटणी, शेंगा लाडू, जवस चटणी, कुरडय़ा, पापड्या, सांडगे, वाफेवरचे पापड्या, शेवया तयार होतात.
ज्या भाड्याच्या घरात राहून लक्ष्मी यांनी उद्योग सुरू केला होता आज तेच घर विकत घेऊन त्याच ठिकाणी तीन मजली मोठा बंगला बांधला आहे.
अमोल सीताफळे , ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर