कपड्याकडून सॅनिटरी नॅपकीनकडे

‘नवी उमेद’ने गेल्या आठवड्यात #तिचेपाचदिवसतिलापरतमिळवूनदेऊया या पोस्टची कँपेन केली, तेव्हा अनसरवाडा (जिल्हा लातूर. निलंगा तालुका) गावालगतच्या गोपाळ खेळकर या भटक्या समाजाच्या वस्तीतल्या स्त्रियांना अंतर्वस्त्र का वापरायची हे छाया काकडे समजावून सांगत होत्या.  मासिक पाळीच्या काळातलं मुलींचं, स्त्रियांचं आरोग्य हा खूप महत्त्वाचा विषय असला, तरी त्याबद्दल उघड बोलणं शहरी समाजातही अवघड असतं. मग तिथे काय वातावरण असेल…? जेमतेम ६०० लोकवस्ती. त्यात २७५ महिला. तारेवर चालणं आणि रिंगखेळ हा त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय. वस्तीशाळेतला तरूण शिक्षक नरसिंग झरे याने इथं महिलांसाठी काम सुरू केलेलं. गेल्या सहा महिन्यांपासून छाया काकडे यांनीही आरोग्यविषयक माहिती देण्यासाठी या वस्तीत जायला सुरुवात केली. छायाताईंचं पारधेवाडीत सॅनिटरी नॅपकिन तयार करायचं एक युनिट. त्याविषयी ‘नवी उमेद’मध्ये आम्ही मागे लिहिलंच होतं. विचारधारा ग्रामीण विकास या त्यांच्या संस्थेमार्फत छायाताई अनेक कामं करत असतात.

गोपाळ वस्तीतल्या महिलांशी बोलताना जाणवलं की, आरोग्यविषयक जागरुकता नाही. केसाला ना तेल, ना साबण, ना रोजची आंघोळ. छायाताई सांगतात, “पहिल्यांदा संध्याकाळी वस्तीत गेले. अर्ध्याच तास थांबले. पण जमलेल्या महिलांपैकी दहा जणी दारूच्या नशेत. मग काय बोलणं होणार? मग तेव्हा ठरवलं की, इथं दिवसाच यायचं.” नंतर घराघरात जाऊन महिलांशी चर्चा सुरू केली. आरोग्यशिबिरं घेऊन मासिक पाळी म्हणजे काय, या काळात स्वच्छता कशी राखायची हे सांगणं सुरु झालं. छायाताई म्हणतात, “आमचा उद्देश होता, की महिलांना सॅनिटरी नॅपकिन वापराच्या प्रवाहात आणायचं.” पाळीच्या काळातल्या विविध समजुती इथंही होत्याच. एकतर पालं छोटी, कपडे वाळवायलाही जागा नाही. त्यातून ती लोकांच्या नजरेस पडू नये म्हणून दुसऱ्या कुठल्यातरी कपड्याखाली ठेवलेली. कित्येकदा तर पाळी संपली की ती कापडं कुठेतरी वळचणीला, दगडाखाली ठेवली जातात. नंतर पुढच्या पाळीला ती तशीच मळलेली, धुळीची वापरायची. यातून जंतूसंसर्ग होणार, नाही तर काय? काहींना तर महिन्यातले १०-१२ दिवस रक्तस्त्राव सुरूच. त्यातून कापड वापरल्याने मांड्यांवर पुरळ, जखमा ठरलेल्या.
छायाताईंनी हळूहळू सर्वांना सॅनिटरी नॅपकिन दाखवायला सुरुवात केली. नॅपकिन कसा वापरायचा हे समजावताना पॅड निकरमध्ये लावायचं हे सांगितल्यावर कळलं की या महिला अंतर्वस्त्रचं वापरत नाहीत. आता अंतर्वस्त्र का वापरायची इथूनच सुरुवात करावी लागणार होती. सॅनिटरी नॅपकिन तर मोफत देणार होतोच. अंतर्वस्त्रासाठीही पैसे उभे करावे लागणार होते. छायाताई सोशल मिडियाचा उपयोग करत विविध क्षेत्रातल्या व्यक्तींना स्वतःच्या कामाची माहिती देत असतात. त्याचं फळ कधीतरी मिळतंच. या वेळी मदत मिळाली ती – महिलाआरोग्याबात जिव्हाळा असणार्‍या प्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर यांची.
तरीही प्रश्न होता भाषेचा. या समाजाची भाषा गुजराती. वस्तीतल्या सखुबाईला चांगलं मराठी येतं. तिनं मदत केली. छायाताई सखूबाईला आणि सखूबाई बायांना सांगू लागली. बायांशी असा संवाद सुरू झाला. समजूत पटून काही जणी पॅड वापरू लागल्या आणि अनुभवही मैत्रिणींना सांगू लागल्या. एकजण म्हणाली, “कपड्यामुळे शेतात काम करताना त्रास व्हायचा, मांडीच्या बाजूला दुखायचं. आता न्यापकीनमुळे आम्हांला गादी मिळाली आहे’.

– वर्षा आठवले.