कमी जमीन, योग्य नियोजन, भरघोस उत्पादन

अमरावती जिल्ह्यातला चांदूर रेलवे तालुका. इथल्या बासलापूर गावातले विवेक चर्जन. घरची जेमतेम एक एकर जमीन. या जमिनीवर त्यांनी संत्र्याची १३५ झाडं लावली. केवळ संत्रा उत्पादनावर ते थांबले नाहीत, तर आहे त्या जागेचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. झाडांच्या मधल्या जागेत त्यांनी आंतरपीक घ्यायला सुरुवात केली. काकडी, टोमॅटो, कारले, पालक, कोथिंबीर, कोबी, कांदा, टरबूज अशा काही भाज्यांचं त्यांनी नियोजन केलं. अगदी धुऱ्यावरही त्यांनी पेरू, रामफळ, सिताफळ, फणसाची लागवड केली.
यावर्षी ६० हजार रुपये खर्च झाला. आत्ताच ४० हजार रुपयांचं उत्पन्न त्यांनी भाजीपाल्यातून मिळवलं आहे. तर मागील वर्षी सर्व खर्च वजा जाता १ लाख रुपये निव्वळ नफा झाल्याचं त्यांनी सांगितलं. रासायनिक खताचा कमीत कमी वापर हे त्याचं वैशिष्ट्य. त्याऐवजी पिकांवर जीवामृत, ताकाची फवारणी यासारखे पारंपारिक उपाय केले. यामुळे उत्पादनात वाढ तर होतेच पण पिकांचं कुठलंच नुकसान होत नाही. सातवी, दहावी आणि बारावीत शिकणारी तिन्ही मुलं त्यांना आता शेतीत मदत करतात. पाणी आणि खताचं नियोजन ठिबकच्या मदतीने मुलं करू लागली आहेत. सातवीत शिकणाऱ्या विशालला कारलं पिकाची संपूर्ण माहिती अवगत असून शेतीची सर्व कामं अभ्यासासह तो अगदी सहज सांभाळतो. चर्जन यांच्या पत्नीही शेतातली सर्वच कामं सहजपणे हाताळतात. सगळं कुटुंबच शेतीत असल्यामुळे बाहेरचे मजूर लावण्याची गरज चर्जन यांना पडत नाही.
सध्या शेतकरी हा अस्मानी आणि सुल्तानी संकटांनी हवालदिल झाला आहे. शेती करणे म्हणजे एक प्रकारचा जुगार खेळणे अशी परिस्थिती आहे. उत्पन्न चांगलं झालं, तरी त्याला चांगला भाव मिळेलच याची काहीच शाश्वती नाही. त्यामुळेच तूर, कापूस अन सोयाबीन या पिकांमध्येच तो गुंतून राहतो. चाकोरीबाहेर जाऊन शेती करण्याची मानसिकता सहसा दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर चर्जन यांचं काम उठून दिसतं. कमी जमीन असूनही मेहनत, जिद्द आणि चिकाटीने योग्य नियोजन केल्यास भरघोस उत्पादन घेता येतं, हे चर्जन यांनी दाखवून दिलं आहे.

-अमोल देशमुख.