कम्युनिटी किचन मधून हजार जिवांची भूक भागतेय

 

 

कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये म्हणून सांरच लाॅकडाऊन झालं. जे जिथं होते त्यांना तिथंच थांबावं लागलं. हातावर पोट असलेल्यांची रोजीरोटी थांबली. अशा लोकांसाठी मदतीसाठी अनेकजण पुढे आले. त्यात नगर शहरात महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली कम्युनिटी किचन आदर्श ठरली आहे. अगदी कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकारी यात सक्रीय झाले असून सुमारे आडीचशे ते तीनशे लोकांच्या संकल्पनेतून दररोज एक हजार लोकांची भूक भागवली जात आहे. विशेष म्हणजे यातील अर्ध्या लोकांना घरपोच जेवण पोचवले जात आहे. आतापर्यत असा उपक्रम पहिल्यांदाच राबवला जात आहे.

नगर शहर व उपनगरात राज्यासह परराज्यातून रोजगारासाठी येणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. बांधकाम, औद्योगिक वसाहत, झोपडपट्टीत राहून कचरा गोळा करणे, फळे, भाजीविक्री, खेळणी विक्रेते असे कितीतरी मजुर आहेत. सरकारने अचानक लाॅकडाऊन केले. त्याला आता महिन्याहून अधिक काळ उलटला. सुरवातीला काही मजुरांनी घर गाठलं पण, अनेकजण अचानक झालेल्या लाॅकडाऊनमुळे अडकून पडले. चार-पाच दिवसांनी या मजुरांची उपासमार सुरु झाली. महानगर पालिकेतील सफाई कामगार, पाणी सोडणारे व अन्य थेट लोकांत काम करणाऱ्या कामगारांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. त्यानंतर समाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुरवातीला दोन दिवस घरपोच किराणा पोहोचता केला जात होता. त्यातच एक प्रसंग घडला.

नगर शहरातील प्रेमदान हडको नावाच्या परिसरातील एका घरात असाच पोटाचा संघर्ष सुरू होता. घरातील सर्व पदार्थ संपले होते. घरातील लहान मुलं भुकेने त्रस्त होती. आईला अन्न मागत होती. मात्र, अन्नाचा कणही घरात नसल्याने या माऊलीने जड अंतःकरणाने मुलांना समजावत त्यांना पाणी पाजून झोपी लावलं. आई व वडील रात्रभर मुलांच्या उशाशी रडत होते. हे कळल्यावर सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. आरोग्य अधिकारी डॉ. नरसिंह पैठणकर, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी परिमल निकम यांच्यासह पथक त्या कुटुंबाकडे गेले. त्यांनी त्या माऊलीच्या हातात जीवनावश्‍यक वस्तूंचे किट दिले. ते पाहून माऊली गहिवरली. तिने रात्री मुलेही उपाशी झोपल्याचे सांगत वेदना मोकळ्या केल्या. असाच एक प्रकार औद्योगीक वसाहतीत परप्रांतीय मजुराबाबत समोर आला. किराणा साहित्य दिले जात असले तरी अडचणी येत असल्याने थेट घरपोच जेवण देण्याचे ठरले आणि आयुक्‍त श्रीकांत मायकलवार, उपायुक्‍त सुनील पवार, यंत्र अभियंता परिमल निकम, शशिकांत नजन, गाडळकर, रोहकले यांच्यासह शहरातील समाजिक कार्यकर्त्यांच्या विचारातून कम्युनिटी किचन ही संकल्पना पुढे आली. नगर-कल्याण रस्त्यावर सुरु केलेल्या अन्नछत्रात पहिल्याच दिवशी 350 गोरगरीब नागरिकांना जेवण मिळालं. आता दुसरी शाखा सुरु झाली असून तेथे सहाशे लोकांना जेवण मिळते आहे. लाॅकडाऊनच्या काळात राज्यात पहिल्यांदाच सुरु झालेल्या या संकल्पनेतून हजार लोकांची भूक भागत आहे

– सुर्यकांत नेटके, नगर

Leave a Reply