करून दाखवली- 15 लाख देशी झाडांच्या बियांची पेरणी!
असं म्हणतात की माणसाला वेड असावं कसलंतरी, तरच हातून मोठ्या गोष्टी घडून येतात. आता जालन्यातील भिक्कन सुखदेव पडूळ यांचंच उदा. घ्या की. श्री. पडूळ यांनी या बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील रेणुका माता गड परिसरात चक्क पंधरा लाख देशी झाडांच्या बिया या पावसाळ्यात पेरल्या आहेत. अर्थात त्यांच्या मित्रांनीही त्यांना या कामात मोलाची साथ दिलीय.
भिक्कन पडूळ हे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जालना येथील कार्यालयात, दुय्यम निरिक्षक म्हणून काम करतात. बदनापूर तालुक्यात त्यांचे मूळ गाव आहे. शेतीची मनस्वी आवड असणारा आणि पर्यावरणासाठी झटणारा हा माणूस. याच बदनापूर तालुक्यात सोमठाणा येथे श्री. रेणुका देवी संस्थान उंच डोंगरावर वसलेले आहे. नवरात्रात इथं देवीची मोठी यात्रा तर भरतेच, पण इतर वेळीही धार्मिक पर्यटनासाठी अनेक भाविक गडावर येत असतात. परंतु गडाच्या आजूबाजूचा परिसर उजाड आहे, फारशी झाडंच नसल्यानं इथं भकास वाटत राहतं, उन्हाळ्यात भयंकर उकडतं.
यावर उपाय म्हणून या परिसरात जर भरपूर झाडं लावली तर, गड भविष्यात हिरवागार होईल. हवा थंडगार- आल्हाददायक होईल, भाविकांना सावली मिळेल आणि प्रसन्नही वाटेल, हे विचार पडूळ यांच्या मनात सातत्याने येत होते. हा विचार त्यांनी मित्रमंडळींना बोलून दाखविला आणि मग सुरू झाली योजना- सोमठाणा रेणुकामातेचा गड हिरवागार करण्याची. गडावर देशी आणि औषधी झाडंच लावायची हे त्यांनी नक्की केलं. त्यासाठी आधी लिंबोळी, सागरगोटे, चिंच, वाल, बाभूळ, सीताफळ, जांभूळ, आंबे, आपटा, सेमल, हिरडा, बेहडा, रामकाट, करंज, आवळा, शिवणी, बोर इ. आयुर्वेदिक औषधांच्या आणि फळझाडांच्या जवळपास दहा ते पंधरा लाख बिया त्यांनी मित्रांच्या मदतीने जमविल्या.
आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून जेसीबी मशीनच्या सहाय्याने पडूळ यांनी आधी डोंगरावर चर खोदून घेतले. पावसाचं पाणी अडवलं जावं म्हणून व्यवस्थित नाल्या करून मग त्या चरांमध्ये बियांची लागवड करण्यात आली. 11 आणि 14 जून 2022 रोजी पावसाळ्याच्या तोंडावर, रेणुका मातेच्या गडावर या बिया पेरण्यात आल्या. त्यानंतर तयार केलेल्या चरांमध्ये, खडड्यांमध्ये पुन्हा माती पसरवण्यात आली. ठराविक अंतरावर फळ झाडांची रोपं लावून खड्डे भरून घेतले. या कामात पडूळ यांच्या मित्रांनीही सहकार्य केले आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे बिया पेरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमठाणा परिसरात चांगला पाऊस होऊन गेला.
भिक्कन पडूळ आणि त्यांच्या मित्रमंडळींनी रेणुका मातेचा गड हिरवागार करण्याचं स्वप्न पाहिलंय ते सामाजिक जाणिवेतून. पर्यावरणाचं आपणही काही देणं लागतो या भावनेतून दहा ते पंधरा लाख बीजपेरणीचं हे कार्य नक्कीच इतरांसाठी रोल मॉडेल ठरावे असेच आहे.
पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल, नष्ट होत जाणारी जंगलं आणि वाढतं प्रदूषण या मुद्द्यांवर विचार करणारे नागरिक,अधिकारी, कर्मचारी पुढे येत आहेत आणि पर्यावरणाच्या वाढीसाठी चौकटीबाहेरचे प्रयत्न करत आहेत हे विशेष.
आता पावसाळा सुरू झालाय, रेणुका मातेच्या गडावर पेरलेल्या या फळ झाडांची, पंधरा लाख बियांपैकी निम्म्या जरी झाडांची जोरदार उगवण झाली, तर सोमठाणा गडाचा नजाराच बदलून जाईल.या परिसरात घनदाट औषधी वननिर्मिती तर होईलच शिवाय पर्यटनालाही आणखी वाव मिळेल. अर्थात ऑक्सिजन निर्मितीसाठी याचा चांगला उपयोग होणार आहे, शिवाय औषधी वनस्पतींचा उपयोग प्रथमोपचार म्हणून काही रोगांत करताही येईल. भिक्कन पडूळ यांच्या प्रयत्नांना आता भक्कम साथ मिळायला हवी ती फक्त पावसाची.
लेखन: अनंत साळी, जालना
नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/

Leave a Reply