करोनाकाळातील हॉंगकॉंगमधील भाषिक प्रयोगाची गोष्ट !

 

 

या करोनाकाळात , कुटुंबातल्या व्यक्तींशी रोज उठून वेगळं ते काय बोलणार ? प्रत्येकाने आपापल्या device मध्ये डोकं खूपसून बसणे हीच एकमेकांना आणि मुलांना स्पेस देण्याची एकमेव व्याख्या नव्हे. करोनाकाळात आपल्या आतल्या भीतीला शब्दरूप देणं हे सुद्धा सोपं नाहीये. तिथे स्तोत्रपठण कामी येऊ शकतं, हा अनुभव आम्ही घेतला.

३० मार्चला २०२०ला सुरू केलेला हा रामरक्षा स्तोत्र एकत्र शिकण्याचा प्रयोग महिनाभरात आम्ही पूर्ण करू शकलो, याचं आश्चर्य आणि आनंद दोन्ही आहे.

५ ते १५ या वयातील मुलं आणि त्यांचे पालक यात सहभागी झाले. मी जबाबदारी घेतली आणि अमृता शिकवायला तयार झाली.

घरी अडकून पडलेले आम्ही सगळे – मुलं,पालक, आणि आम्ही शिकवणारे यात एकत्रित सामिल होतो. एकमेकांना स्क्रीनवर पाहू शकत होतो, त्याचा विलक्षण आधार होता. रोज दहाबारा तास ऑफीसचं काम करून आठवड्यातून तीन दिवस यासाठी वेळ काढणं जरा अवघड गेलं. सुरवातीला Zoom च्या वापराचा अचूक अंदाज न आल्यामुळे गोंधळ झाला. कारण असं कधी करावे लागेल हेच आम्हाला माहीत नव्हतं. शिकवण्याचं तंत्र आणि पुनरुक्तीची लय साधायला १-२ सेशन गेले, आणि तेवढ्यातही १-२ मुलं गळाली. पण जी टिकली. त्या मुलांच्या सोबतीने म्हणायला, आज आमच्याकडे काहीतरी ठोस हाती आहे, ही आनंदाची आणि समाधानाची बाब आहे.

आपण सर्वांनी ठरवलं आणि त्यासाठी एकत्रित वेळ देऊ केला तर संस्कृत स्तोत्रही आत्मसात करता येऊ शकतं, हे आपण यातून नक्कीच शिकलो. सुरवातीला कुरकुरणारी मुलं नंतर-नंतर आतुरतेने वाट पाहू लागली, यातच काय ते आलं.

आधी त्यांना म्हणायची लाज वाटते, सर्वांसमोर उच्चार सुधारायला सांगितलेलं आवडत नाही. नंतर नंतर त्यांना म्हणतssच रहायचं असतं, आणि अजिबात थांबायचं नसतं. सगळीच मजा आहे. थोडक्यात, पूर्वी आपण इंग्रजी बोलायला कसे लाजायचो, आणि त्या बाबतीत न्यूनगंड बाळगायचो, तसं त्यांचं मराठीबाबतीत होतं.

अजूनही, मुलांच्या जरा चुका होतायेत, पण संपूर्ण रामरक्षा स्तोत्र बर्‍यापैकी पाठ झालंय आता, हे छानच झालं. इथल्या मुलांच्या मानाने शब्दोच्चारांमध्येही पुष्कsळ सुधारणा आहे. आमच्या सोबत, घरोघरी प्रत्येक आईने (क्वचित एखाद्या वडिलांनी), कधी गोडीगुलाबीने आणि कधी थोडीशी सक्ती करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात अनमोल मदत केली. महाराष्ट्र मंडळ हॉंगकॉंगने त्यांचं Zoom खातं या प्रयोगासाठी वापरण्याची परवानगी दिली.
मला संस्कृत येत नाही. तर मुद्दा असा आहे की हे शिकवण्यासाठी मी योग्य व्यक्ती आहे का ? तर अजिबात नाहीये. पण आपल्या आया, आज्याही संस्कृत पंडित नव्हत्या. जर कोणीच स्वत:हून उठून जबाबदारी घ्यायला, सातत्याने मराठी शिकवण्याच्या उपक्रमाला सातत्याने वेळ द्यायला तयार होत नाही, तर मग जमेल ते आणि जमेल तसं करणं एवढंच आपल्या हातात उरतं. कोणाही एका व्यक्तीच्या आणि उपलब्ध वेळेच्या मर्यादा अर्थातच आहेत, तशा त्या माझ्याही आहेत. ‘बोलतो मराठी’चे उपक्रम हॉंगकॉंगमध्ये चालवण्याच्या गेल्या ५ वर्षांच्या गंमतींवर आणि निरिक्षणांवर एक पुस्तक लिहून होईल.
मी स्वत:च फार वर्षांनी रामरक्षा म्हटली. कधी काळी शिकलेले शब्द आणि घरातल्या मोठ्या माणसांचे स्वर जसेच्या तसे ऐकू येऊ लागले, आणि समईत जळणार्‍या वातीचा आणि तेलाचा तो संमिश्र वास माझ्यापर्यंत पोचला. ३५ वर्ष तरी होऊन गेली असावीत. आज पुढील पिढीपर्यंत, अंशत: तरी हे पोचवू शकलो त्याचं बरं वाटलं. एक आवर्तन पूर्ण झालं.
यात काहीएक मोठं काम नाहीये याची मला नम्र आणि पुरेपूर जाणीव आहे. त्यात काय एवढं सांगण्यासारखं आणि लिहिण्यासारखं हे वाटूनच, लिहायचं कधी मनावर घेतलं नव्हतं. पण आमच्यासारख्या अनेक धडपडणार्‍या सामान्यजनांना यातून उमेद मिळेल अशी आशा करते. शक्य असलेल्यांनी आपली भाषा जिवंत ठेवण्यासाठी पुढल्या पिढीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत राहायला हवं. भारतात रहात असताना मी आमच्या मदतनीस ताईला इंग्रजी शिकवण्याचा जोरकस प्रयत्न करून पाहिला होता, पूर्वी अकरावी, बारावीच्या मुलांना जर्मन शिकवण्याचाही प्रयोग करून पाहिला होता. शिकण्याशिकवण्याचा प्रयोग करत राहणं सोडू नये. त्यातून आपल्यातले आनंदाचे झरे जिवंत राहतात.

मँडरिन ते मराठी/ संस्कृत (रामरक्षा स्तोत्रम् संपूर्णम् ):

ऋणनिर्देश :
अमृता रानडे (शांतपणे, न कंटाळता शिकवण्यासाठी),
हृषीकेश जोशी (जे श्लोक त्शिया दिवशी शिकुन झाले त्यानंतर कार्यतत्परतेने ते ध्वनीमुद्रित करून सरावासाठी पाठवण्यासाठी)
प्राजक्ता नायक (‘बोलतो मराठी’च्या लोगो डिझाईनसाठी)
सर्व मुलं आणि पालक (आपापल्या मुलांसोबत बसून शिकण्यासाठी), महाराष्ट्र मंडळ हॉंगकॉंग (Zoom वापराच्या परवानगीसाठी), इरा रत्नपारखी (व्हिडियो संकलित करण्यासाठी), मुग्धा रत्नपारखी (संकल्पना, पाठपुरावा आणि मुलांशी संवाद ठेवण्यासाठी )

– मुग्धा रत्नपारखी

Leave a Reply