यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी इथले सतीश मुस्कंदे यांची मोठी बहिण ज्योती पारे कर्करोगाने आजारी होती. ही 20 वर्षांपूर्वीच गोष्ट. त्यावेळी बहिणीच्या मरणयातना सतीश यांनी अगदी जवळून अनुभवल्या होत्या. बहिणीला वाचविण्यासाठी सतीश यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र १० महिने मृत्यूशी झुंज देत ज्योती यांचं ९ सप्टेंबर २००१ रोजी निधन झालं. बहिणीवर वेळेवर योग्य उपचार होऊ न शकल्याचं शल्य सतीश यांच्या मनात कायम होतं. कर्करूग्णांची उपचारासाठी होत असलेली धावपळ, माहितीचा अभाव, रूग्णालयांकडून सतत विविध चाचण्यांसाठी धरलेला आग्रह आणि या सर्व प्रक्रियेत रूग्णासह कुटुंबातील सदस्यांवर येणारा मानसिक आणि आर्थिक हा सर्व प्रकार सतीश यांना अस्वस्थ् करीत होता. या अस्वस्थतेतूनच कॅन्सर रूग्ण, त्यांचे नातेवाईक यांना दिलासा देण्यासाठी २००२ मध्ये ‘ज्योती कॅन्सर रिलीफ अँड गाईड सेंटर’ची निर्मिती झाली.
कर्करुग्णाच्या सेवेने झपाटलेले सतीश ग्रामीण भागातील गरजू रुग्णांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेत त्यांना कॅन्सरशी लढण्याचे बळ देतात. कुठलाही शासकीय निधी न घेता त्यांनी कर्करोग जागृती अभियान सुरू केलं. रुणालय, विविध सामाजिक संस्था तसंच शासकीय निधीबाबत पाठपुरावा करून सतीश कर्करूग्णांसह त्यांच्या कुटुंबियांना मार्गदर्शन करतात.
सतीश मुस्कंदे यांनी आजवर राज्यातील किमान पाच हजार कर्करुग्णांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले आहे. ‘लढा कॅन्सरशी’ या उपक्रमातून ते सतत कर्करोगाबाबत जनजागृती करत फिरत असतात. कर्करूग्णांच्या विविध समस्यांबाबत अनेक वेळा आंदोलनेही केली. शासन दरबारी पाठपुरावा करून जीवनदायी योजनेतील त्रुटी दूर करण्यास भाग पाडले. ज्योती कॅन्सर रिलीफच्या लढ्यामुळे यवतमाळ येथे रक्त विघटन केंद्राची मागणी पूर्ण झाली. हळूहळू या मदत केंद्रास आरोग्य सेवेचे स्वरूप आले. त्यातून ग्रामीण तसंच शहरी भागात व्यसनमुक्ती चळवळ, रक्तदान शिबिरे, रोगनिदान शिबिर, आदी उपक्रम सुरू झाले. जिल्हा शासकीय रुग्णालयातच स्वतंत्र कॅन्सर विभाग करून कर्करुणास उपचार मिळावा यासाठी सतीश यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. कॅन्सरग्रस्तांच्या जिल्हा परिषद मदत निधीत वाढ, प्रवास सवलतीसाठी आंदोलन, दारुबंदी चळवळीत सहभाग नोंदविला. ब्लड कॅन्सर तथा सिकलसेलग्रस्तांसाठी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून त्यांनी रक्त पुरवलं. ज्योती कॅन्सर रिलीफ सेंटरच्या माध्यमातून ‘जीवन ज्योती कॅन्सर योद्धा सन्मान’ योजनेअंतर्गत कॅन्सरवर मात करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील महिला रुग्णांना व्यावसायिक पुनर्वसनासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत दिली जाते. ग्रामीण भागातील रुग्णांना नागपूर व मुंबई येथे वारंवार जावे लागत असल्याने प्रत्येक रूग्णाला प्रवासासाठी एक हजार तर किमोथेरपीसाठी नऊ हजार रुपयांची मदत दिली जाते.
सतीश यांना त्यांच्या कार्याबद्दल राष्ट्रपती स्काऊट पुरस्कार, केंद्र सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार, राष्ट्रीय गौरव पुरस्कार, फिलीप कंपनीचा रेड अॅण्ड व्हाईट ब्रेव्हरी अवॉर्ड, एअर इंडिया बोल्ट अवॉर्ड, सत्यमेव जयते प्रेरणा पुरस्कार यासह राष्ट्रीय तथा राज्य पातळीवर अनेक पारितोषिके मिळाली. सिंगापूरच्या आरोग्य व शिक्षण अभ्यास दौऱ्यादरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेतली. त्यांची कर्करुणाविषयीची आत्मीयता, धडपड अनेकांसाठी प्रेरणादायी असून कर्करोगाने बहीण गमावलेल्या या ध्येयवेड्या भावाचा संघर्ष तब्बल २० वर्षापासून सुरूच आहे. कोरोनाकाळात कॅन्सर रुग्ण असलेल्या कुटुंबांशी संपर्क साधून सतीश यांनी जेवण, औषधोपचार आणि आर्थिक मदत केली.
– नितीन पखाले, आर्णी, यवतमाळ