कर्करोगग्रस्ताच्या उपचाराचा प्रवास त्याच्या कुटुंबाचाही असतो, त्यांचंही समुपदेशन गरजेचं

 

मी विनोद शिंदे. खरंतर एखादी परिस्थिती जोपर्यंत आपल्यावर आघात करत नाही तोपर्यंत त्याचे आपल्यावर, कुटुंबाबर आणि एकंदरीत समाजावर होणारे परिणाम आपल्याला कळत नाहीत. मात्र आपल्यावर ती परिस्थिती आली की आपण त्याचा गांभीर्यानं विचार करू लागतो. आमच्याबाबतीतही असंच झालं. माझा भाऊ मिलिंद पेशानं सॉफ्टवेअर इंजिनिअर. एका खासगी कंपनीतली नोकरी सोडून त्यानं स्टार्ट अप सुरू केलं. स्टार्ट अप पुढे नेण्यासाठी जिगिरीचे प्रयत्न सुरू असतानाच २०१८ मध्ये त्याला कर्करोगाचं निदान झालं. मिलिंदसह आम्हा सगळ्यांसाठीच तो धक्का होता. त्यातून सावरत मुंबईतल्या टाटा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू झाले. टाटा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी आधार दिला. मिलिंद बरा होत आहे, असं वाटत असतानाच ५ महिन्यात त्याला पुन्हा कर्करोगानं ग्रासलं. उपचार सुरू असतानाच गेल्या वर्षी अवघ्या ३८ व्या वर्षी त्याचं निधन झालं. मिलिंदच्या आजारादरम्यान लक्षात आलं, कॅन्सर झालेल्या माणसावरील उपचाराचा प्रवास केवळ त्या माणसाचा नसतो तर संपूर्ण कुटुंबाचा असतो.


ठणठणीत दिसणाऱ्या आपल्या माणसाला कॅन्सर झाल्याचं कळतं तेव्हा त्याला आणि आपल्यालाही धक्का बसतो. त्या माणसाला सावरण्यासाठी जी मानसिक ताकद लागते ती कोणत्याच हॉस्पिटलमध्ये मिळत नाही. ती त्याचं कुटुंबच देऊ शकतं. आजूबाजूच्या, घरातील वातावरणाचा रुग्णाच्या शरीरावर होणारा परिणाम लक्षात घेऊन त्याच्या भोवतीचं वातावरण सकारात्मक ठेवलं पाहिजे. केमोथेरपीमध्ये शारीरिक बदलामुळे माणूस एवढा त्रस्त होतो की त्याच्या वागण्याबोलण्यात, प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये बदल होत जातो. शारीरिक बदलामुळे झालेलं मानसिक खच्चीकरण थांबवण्यासाठी त्याला लागणारा आधार त्याचे कुटुंबीयच देऊ शकतात.
त्या व्यक्तीच्या मनात चालेली गडबड, त्याची चिडचिड या गोष्टींचा बाऊ न करता त्याला त्या वेळेस समजून घेणं आवश्यक असतं.
कॅन्सरवरील उपचारपद्धतीत मानसोपचार, समुपदेशन यात आपण खूप मागे असल्याचं जाणवतं आणि समुपदेशन रुग्णांसोबतच त्याच्या कुटुंबाला देणंही तितकंच आवश्यक आहे. याबाबत इतरांना जमेल तशी माहिती देण्याचा, जागृती करण्याचा प्रयत्न माझ्या परीनं करत आहे.

विनोद शिंदे ,बोरीवली, मुंबई
(शब्दांकन -विजय भोईर )

Leave a Reply

Discover more from Navi Umed

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading