सोलापूर जिल्ह्यातलं बार्शी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते इथलं नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल.. ‘ज्यांच्याकडे कुठल्याच सुविधा नाहीत, ते गावखेड्यातले कर्करोगग्रस्त या आजाराला कसे सामोरं जात असतील ?’ असा प्रश्न दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त यांना स्वतःवरच्या उपचारादरम्यान कायम पडायचा. त्यांची तळमळ स्मरणात ठेवून सुरू झालेल्या फाऊंडेशननं स्थापन केलेलं हे रुग्णालय. देशभरात दरवर्षी लाखो लोक कॅन्सरवर उपचार घेतात. यात ज्यांना शक्य आहे ते परदेशात जातात तर काहींना देशात उपचार घेणेही शक्य होत नाही, असे अनेक गरीब रुग्ण बार्शीला येतात.
कर्करोगासारख्या आजारात जिथे उपचाराचाच खर्च न परवडणारा, तिथे खाण्यापिण्याचा, राहण्याचा खर्च कुठून परवडणार? रुग्णांची, त्यांच्यासोबत असलेल्यांची सोय होते ती मातृभूमी प्रतिष्ठानमुळे. समाजाचं, देशाचं आपण काही देणं लागतो, या भावनेतून सेवाभावी काम करण्याची इच्छा असलेल्या बार्शी शहरातल्या काही समविचारी मंडळींनी २०१४ मध्ये ही संस्था सुरू केली. अध्यक्ष संतोष ठोंबरे, सचिव प्रताप जगदाळे, मुरलीधर चव्हाण आणि आणि जवळपास ८० सदस्य. बहुतांश जण आपापल्या उद्योग-व्यवसायात यशस्वी. चांगलं अर्थार्जन करणारे.
प्रतिष्ठानतर्फे दररोज शहरातील कर्करोग रुग्णालय, शासकीय रुग्णालय आणि आणखी एका रुग्णालयाला जेवण पुरवलं जातं. २०१५ पासून प्रतिष्ठान ही सेवा देत आहे. हॉस्पिटलमधून यासाठी अगोदर नोंदणी केली जाते. १० रुपयांत प्रत्येक व्यक्तीला चपाती,भाजी, भात, कधी पुरीभाजी आणि १ रुपया लिटर प्रमाणे फिल्टर, मिनरल वॉटर. रुग्णाचे अनेक नातलग रात्री उघड्यावर, वृत्तपत्र टाकून किंवा जमिनीवर झोपतात. त्यांना संस्था निःशुल्क अंथरूणपांघरूण पुरवते. त्याचसोबत शहरभरात जिथे गरजू, निराधार आहेत त्यांना रोज सकाळी त्यांच्या घरी जेवण दिलं जातं. असे जवळपास ३०० डबे दररोज एका वेळेला पुरवले जातात.
सकाळी ५ वाजता किचन सुरू होते. दुपारी ११ पर्यंत जवळपास सर्व ठिकाणी जेवणाची पार्सल पुरवली जातात. पुन्हा संध्याकाळी ५ वाजता स्वयंपाक सुरू. यासाठी १२ कर्मचारी काम करतात.
लॉकडाऊन काळात अडकून पडलेल्या अनेकांना मातृभूमीने खाऊपिऊ घातले.
आता मातृभूमी मार्फत बार्शीसह जवळच्या गावातही या सुविधा सुरु करण्यात येत आहेत.
-गणेश डुकरे