कर्जबाजारी शेतकरी ते लखपती कृषिउद्योजक

||अपना टाईम आएगा|| मालिकेतील पुढील भाग

जालना जिल्ह्यातल्या सिंधी काळेगावमध्ये मुळे परिवाराची चांगली 18 एकर जमीन. त्यातली दहा एकर काळी कसदार तर उर्वरित आठ एकर काहीशी पडीक. पण सिंधी काळेगावजवळ सरकारी योजनेत एका तलावाची निर्मिती झाली आणि दुर्दैवाने उत्तम काळी कसदार दहा एकर जमीन तलावाच्या पाण्यात गेली. अर्थात जमिनीचा सरकारी मोबदला मिळाला, पण दुर्दैवाने बाजारमूल्य कमी असल्याने लाखोंच्या जमिनीचे अवघे काही हजार हाती पडले. मुळात उत्तम कसदार जमीन गेल्याचं दु:ख या पिढीजात शेती व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाला झालं ते वेगळंच.

एकनाथ मुळे यांचा परिवार बैलपोळ्याच्या दिवशी

या कुटुंबातील एकनाथ मुळे जि. प. शाळा काळेगाव- घारे इथं शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी असणारे मुळे सर, अत्यंत मन लावून मुलांना शिकवितात. याचंच परिणामस्वरूप म्हणून 2012 साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेला आहे. पण घरात शेतीचं वातावरण असलेल्या मुळे सरांना शेतीत काहीतरी करून दाखवायची उर्मी गप्प बसू देत नव्हती. पडीक असलेल्या शिवारात नांगरणी करून, खतं- माती टाकून आधी ती जमीन वापरण्यायोग्य करून घेतली, त्यातही भरपूर खर्च झाला. मग पारंपरिक मूग, उडीद, ज्वारी, कपाशी, हरभरा अशी पिकं घ्यायला सुरूवात केली. पण दरवेळी बाजारभावाची बोंब. शेतीत मेहनत जास्त आणि उत्पन्न नगण्य अशी परिस्थिती होती. मग मुळे सरांनी द्राक्ष- डाळिंबाचे उत्पादन घ्यायचे ठरविले. फळशेतीतून उत्तम उत्पादन मिळेल, या आशेवर. पण रासानिक खतं, कीटकनाशकं, फवारणी, फळं काळजीपूर्वक बाजारपेठेत पाठवणं , मजुरी या सगळ्यात इतका खर्च यायचा की अक्षरश: गुंतवलेल्या दीड- दोन लाखांइतकं सुद्धा उत्पन्न कधीच निघालं नाही.

मुळे यांच्या शेतातील रसरशीत ड्रॅगनफ्रुट

“उलट या फळबागेच्या नादापायी, त्याची देखभाल, खतं- फवारणीपायी बारा लाखांचं कर्ज आमच्यावर झालं आणि त्यापैकी अडीच एकर जमीन विकावी लागली. आमचीच नव्हे महाराष्ट्रातील कुठल्याही बागायतदार शेतकऱ्याची यापेक्षा वेगळी परिस्थिती असेल असं वाटत नाही. शेतात फळं डोलताना दिसतात, पण शेतकऱ्याच्या डोक्यावरील अदृश्य कर्ज आणि भरमसाठ गुंतवणूक कुणालाच दिसत नाही” मुळे सर सांगत होते. या सगळ्याचा असह्य वैताग आलेला असताना सुद्धा जिद्द सोडायची नाही ही आई- वडिलांची शिकवण मुळे सर आणि त्यांच्या शेतकरी भावाने लक्षात ठेवली आणि शेतीत नवीन प्रयोग करायचे ठरविले, त्यासाठी लागेल ती मेहनत घेण्याची त्यांची तयारी होतीच.

मुळे सर सांगतात “आम्ही जी फळं घेत होतो, ती फवारणीने चांगली सुदृढ, रसरशीत दिसायची. परंतु त्यावर किती कीटकनाशकं फवारली आहेत, कोणकोणती जालीम खतं घातली आहेत, हे आम्हांलाच माहित होतं. एकीकडे आपण शिक्षक म्हणून मुलांना ताजा आहार घ्यायला, रसायनांपासून दूर राहायला शिकवणार आणि दुसरीकडे अशी फवारणी केलेली फळं दुसरा मार्गच नसल्याने बाजारपेठेत विकायला ठेवणार हे काही पटतच नव्हतं. अक्षरश: ही फळं घरी तरी खावीत की नाहीत यावर आम्ही दहादा विचार करायचो, पण शहरातल्या ग्राहकाला असा विचार करायलाही वेळ नसतो, आणि पर्याय तर नसतोच नसते. मग त्यादरम्यान मी सेंद्रिय शेतीची पूर्ण माहिती काढली, त्या विषयावरचे वाचन केले. घरी असलेल्या दोन गायी- दोन म्हशी यांचे शेण, गोमूत्र, शेतातला पालापाचोळा मिळून बनणारे कंपोस्ट खत, जीवामृत याचा वापर करूनच आता पुढील पिकं घ्यायची. पीक थोडं कमी आलं तरी चालेल पण अव्वाच्या सव्वा खर्च करून रासायनिक फवारण्या करायच्या नाहीत. शुद्ध- स्वच्छ- चविष्ट पिकवायचे, तेच विकायचे आणि खायचे असं ठरविलं”

याच दरम्यान मुळे सरांच्या शेजाऱ्यांनी लावलेल्या झाडानं त्यांचं लक्ष वेधून घेतलं. कृष्णकमळासारखी सुंदर फळं आणि टपोरी फळंही यायला लागली. दिसायला कृष्णकमळ, पण हे कृष्णकमळ नाही. तर ही पॅशनफ्रूटची वेल आहे, हे सरांच्या लक्षात आलं. त्यांनी इंटरनेटवर या फळाची आणि वेलीची पूर्ण माहिती काढली. या फळाची वैशिष्ट्यं त्यातील विपुल जीवनसत्त्वांचा खजिना हे वाजून त्यांनी आपल्या शेतात पॅशनफ्रूट लावून पाहायचं ठरवलं. पण याच्या बिया कुठल्याच स्थानिक रोपवाटिकेत मिळेनात. मदग मुळे सरांनी चक्क अमेझॉनवरून त्याच्या बिया मागविल्या. 2020 मध्ये अमेझॉनवरून मिळालेल्या त्या आठ- दहा बियांची लागवड त्यांनी करून टाकली. सेंदिय शेती करत असल्याने त्यांना या बियांचा लगेच चांगला रिझल्ट दिसून आला. सगळ्या बिया उत्तमपणे उगवल्या आणि सरांच्या प्रयत्नांना बळ मिळालं. त्याला फळंहा लगडली आणि सरांमधला शेतकरी पुन्हा नवा विचार करू लागला. मिळालेल्या फळातून ज्या बिया प्राप्त झाल्या त्याच पुन्हा लावल्या तर..

ड्रॅगन फ्रुटची सुंदर देखणी फुलं

 

पुन्हा प्रयोगशील शेतकऱ्याला यश आलं आणि त्या फळांचा गर वाळवून, त्याच्या बियांपासून मुळे सरांनी रोपं बनवायला सुरूवात केली. आज पॅशनफ्रुटच्या जवळपास एक हजार रोपांची  बाग आज सिंधी काळेगावच्या शिवारात डवरली आहे. पॅशनफ्रुटच्या पहिल्याच छोट्या प्रयत्नाला यश मिळाल्यावर सरांना परदेशी फळांची लागवड करून पाहण्याचा नवा छंदच जडला. मग त्यांनी लाल गुलाबी ड्रॅगनफ्रुट, थाई व्हरायटीचे पांढरे जांभूळ अशी नानाविध परदेशी झाडं आपल्या शेतात जोपासली. बारा वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यांची आपल्या शेतात लागवड केली. या सगळ्याला मुळे परिवारातील सर्व सदस्यांची साथ होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे उत्पादन पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने, जीवामृत, शेणखत वापरूनच घ्यायचे यावर सर ठाम होते.

लागवड तर झाली, पण विक्रीचे काय. तर त्याबाबतीतही मुळे परिवाराने ठरविले होते. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करायची, कुठल्याही खाजगी व्यापाऱ्याला किंवा मध्यस्थाला फळं विक्रीला द्यायची नाहीत. सिंधी काळेगावचे त्यांचे शिवार नांदेड- जालना महामार्गापासून फक्त 300 मी आत असल्याने अनेक जण थेट शेतात येऊन खरेदी करतात. सकाळी फिरायला येणारे अनेक जण यांच्या शेतातून ही ताजी फळं खरेदी करतात. शिवाय जालना शहरातील अनेक प्रतिष्ठित, आर्थिक सुस्थितीत असणाऱ्या चोखंदळ ग्राहकांच्या घरी पॅशनफ्रूट, ड्रॅगनफ्रूट, पांढरे जांभूळ इ. फळं बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक होऊन घरपोच पोहोचवली जातात. जालन्यातही काही परिचितांच्या दुकानात ही फळं उपलब्ध आहेत. प्रत्येक बॉक्समध्ये हे फळ मूळ कोणत्या देशातलं आहे, त्याची वैशिष्ट्ये, आरोग्यासाठीचे फायदे, सेंद्रिय पद्धतीने कसं पिकवलेलं आहे, हे सगळं लिहिलेलं एक माहितीपत्रक टाकलेलं असतं. सुरूवातीला लोकांना या परदेशी फळांची ओळख करून द्यायला जरा कठीण गेलं, पण नंतर फळांची चव, फायदे आणि कोणतीही रासायनिक फवारणी नाही हे कळल्यावर लोक स्वत:हून फळं घ्यायला येतात हे सरांनी सांगितलं.

याशिवाय मुळे सरांनी शेतातच आईच्या नावाने ‘कुसुम कृषी पर्यटन केंद्र’ सुरू केलेले आहे. याकरिता बांबू आणि फोमच्या सुंदर अश्या सात खोल्या बांधून घेतलेल्या आहेत. इथं राहून ग्रामीण जीवनशैलीचा आनंद घेता येतो. सकाळी नाश्ता, ताजा रानमेवा- ताजी फळं, सेंद्रिय भाजीपाल्याचे ताजे जेवण, चुलीवरची झुणका- भाकर, ग्रामीण खेळ, पिकांची लागवड आणि मुख्य म्हणजे शुद्ध हवा याचा आनंद घेता येतो. हुरड्याच्या काळात इथं चार- पाच चटण्या, घरचं दही, गूळ, यासह ताज्या गावरान हुरड्याचीही पार्टी आयोजित केली जाते. शिवाय आता उडीद, हरभरा, ज्वारी अशी धान्यंही कमी प्रमाणात पण सेंद्रिय पद्धतीने त्यांच्या शेतावर तयार होतात. त्याचीही विक्री शेत आणि आसपासच्या परिसरात केली जाते. आजूबाजूचे छोटे शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी पर्यटन केंद्रात ताजी भाजी विकायला बोलावलं जातं.

कुसुम कृषी पर्यटन केंद्रात ताज्या चुलीवरच्या भाकऱ्या

मुळे सर सांगतात, “आधीच्या फळबागांच्या पिकांपायी आम्ही कर्जबाजारी झालो. एकरी दीड- दोन लाख खर्च करून हाती फक्त नुकसानच यायचं. आता मात्र नुसत्या ड्रॅगन फ्रुटचे एकरी उत्पन्न पाचेक टन होते, ज्यातून साधारण नऊ लाख रूपयांची कमाई होते. यासाठी सुरूवातीचा लागवडीचा दीड- दोन लाख रू. खर्च कधीच वसूल झाला आणि आता फक्त एकरी पंचवीसेक हजार देखभालीचा खर्च येतो. हे ऐकून बागायतदार शेतकरी सुद्धा आश्चर्याने तोंडात बोटं घालतात. पांढरे जांभूळ आम्ही 400 रू. किलो दराने विकतो. एकूण उत्तम कमाई आणि रासायनिक फवारणी नसल्याने शुद्ध- उत्तम चवीची फळं विकल्याचे समाधान आम्हांला लाभते. शेतकऱ्यांना जर शेतीतून उत्पन्न हवे असेल, तर आधी उत्तम शिक्षण घ्यावे. चांगला अभ्यास करून, नियोजन करून, नवे प्रयोग करून शेती करण्याला पर्याय नाही. तरच शेती फायदेशीर होईल. स्वामीनाथन आयोगाने ज्याप्रमाणे शेतमालाला हमीभाव हवा, हा मुद्दा लावून धरला, (जो महत्त्वाचाच आहे) तसंच त्यांच्या पुस्तकात शेतकऱ्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता, प्रयोग करावेत, हे ही सांगितलं आहे, ते शेतकऱ्यांनी विसरू नये.”

लेखन: अनंत साळी, जालना

नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/

 

#नवीउमेद

#जालना

#सेंद्रियशेती

#ड्रॅगनफ्रूट

#पॅशनफ्रूट

#कृषीपर्यटनकेंद्र

#ApnaTimeAaega

#अपनाटाईमआएगा

 

Leave a Reply