कर्ज घेऊन बांधलं शौचालय

अकोल्यातल्या कुंभारी गावच्या सुमनबाईंची ही गोष्ट. जिल्हा परिषद शाळेत खिचडी करायचं आणि वाटायचं त्याचं काम. घरी अठरा विश्व दारिद्र्य, त्यातही सामाजिक कार्य करण्याची ओढ. सुमनबाईंनी १५ ऑगस्टला पंतप्रधानांचं भाषण ऐकलं. आणि त्याने प्रेरित होऊन, शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती हलाखीची. पण, दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव नाही. त्यामुळे कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ नाही. तरीही खचून न जाता, आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी बचतगटाचं कर्ज घेऊन त्यांनी घरी शौचालय बांधलं.  सुमनबाईच्या कार्याची दखल घेवून १९ नोव्हेंबरला जागतिक शौचालय दिनानिमित्त कुंभारी येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांचा सत्कार करण्यात आला. गाव हागणदारी मुक्त व्हावं आणि परिसर स्वच्छ राहावा, या सुमनबाईच्या जिद्दीला मग गावकऱ्यांनीही साथ दिली. आणि बऱ्याच गावकऱ्यांनी आपल्या घरी शौचालय बांधलं. 

सुमनबाई शाळेतील विद्यार्थ्यांची लाडकी आज्जी आहे. या आजीच्या हाताच्या खिचडीची चव काही औरच… म्हणूनच, आजी एखाद दिवशी सुटीवर असल्या तर दुसऱ्याच्या हातची खिचडी मुलांना बेचव वाटते. आजीची साफसफाई मुलांना खूप आवडते म्हणून, खिचडीही तिच्याच हातची हवी असा आग्रह मुलांचा असतो.  दारिद्र्य, हलाखी मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून, त्यांनी आपल्या मुलीला एम.ए.बी.एड. पर्यंतच शिक्षण दिलं आहे. आज त्यांची मुलगी कुंभारी इथेच अंगणवाडीसेविका म्हणून कार्यरत आहे. सुमनबाईसारखींच साधीसुधी माणसंच स्वच्छ भारताचं स्वप्न पूर्ण करू शकतात.

– कुंदन जाधव.