कर्णबधीर मुलंही शिकतील, श्रवणयंत्र सेल बँकेच्या साथीने

कर्णबधीर मुलं ही इतर सर्वसामान्य बालकांसारखीच. केवळ ऐकण्याच्या क्षमतेचा अभाव हे त्यांच्यातील वैगुण्य. पण, या वैगुण्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व झाकोळते. समोरचा काय सांगतो ते समजत नाही, समजत नसल्याने त्याला अपेक्षित प्रतिसाद देता येत नाही. यावर मात करण्यासाठीच श्रवणयंत्र वापरले जाते. त्यासाठीची बॅटरी सतत वापरल्याने खराब होते. हीच अडचण मुलांसोबत नेहमीचं वावरल्याने अर्चनाताईंच्या लक्षात आली. चार दिवसात हे सेल बदलावे लागतात. त्याचा महिन्याकाठी खर्च येतो चारशे रुपये. बॅटरी उतरली की, यंत्र बंद पडते. सर्वच पालकांना हा खर्च कसा पेलणार? वास्तविक श्रवणयंत्र मुलांनी दिवसभर वापरायला हवं. पण, खर्चामुळे काटकसरीचे धोरण ठेवून ते वापरले जाते. त्यामुळे, कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बाधा येते. 

नाशिक इथल्या ‘श्रीमती माई लेले श्रवणविकास विद्यालयातील ही गोष्ट. अर्चना कोठावदे इथल्या शिक्षिका. मुलांच्या शिक्षणप्रक्रियेतला हा अडथळा त्या रोजच पाहत होत्या. अर्चनाताई म्हणतात, ‘श्रवणयंत्राद्वारे विद्यार्थ्यांना काही अंशी ऐकू येते. सभोवतालचे शब्द एकसारखे कानावर पडले की, त्यांना संवाद साधण्यात मदत होते. त्यामुळे सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत यंत्र वापरणे गरजेचे आहे. सेलचा खर्च अधिक असल्याने यंत्राचा वापर टाळला जातो. सर्वसाधारण श्रवण यंत्रासाठी (दोन्ही कानाची मिळून) किमान २५ हजारपासून ६५ हजार रुपये मोजावे लागतात. ती कायमस्वरुपी कार्यान्वित ठेवण्याचा खर्चही मोठा आहे. ही यंत्रणा कार्यान्वित राखणे अनिवार्य आहे’. म्हणूनच मग त्यांच्या मनात ‘श्रवणयंत्र सेल बँके’ची कल्पना आली. श्रवणयंत्र सेल बँक उभी करणं हा प्रवास सोप्पा नव्हता. कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी राज्यात कुठेही अशी सेल बँक अस्तित्वात नाही. हे बघून नाशिकमधील ‘रचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्थे’ने या संकल्पनेला मूर्त रुप देण्याचे ठरवले. बँकेचा श्रीगणेशा झाला तो श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयात. गंगापूर रस्त्यावरील माई लेले शाळेत एकूण १५० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातील शून्य ते पाच वयोगटातील २६ विद्यार्थी शिशूनिदान केंद्रात आहेत. आज हे विद्यार्थी या बँकेचा लाभ घेत आहे. प्रकल्पसमन्वयक अर्चना कोठावदे आहेत. तर प्रकल्पप्रमुख तुषार जिंतुरकर. श्रवणयंत्र सेल बँकेद्वारे कर्णबधीर युवकांना कमीत कमी किंमतीत सेल उपलब्ध करणे, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मोफत सेल, प्रौढ कर्णबधीरांना सेलचे वितरण, वृध्दत्वामुळे कर्णबधीरत्व आलेल्या ज्येष्ठांनाही मदत करण्याची मुख्य उद्दिष्टे असल्याचे अर्चनाताईंनी सांगितले.


– प्राची उन्मेष.