कशाचीही बळजबरी करायची नाही

माझं लग्न त्या मानाने लवकर झालं होतं. मी तेव्हा महाराष्ट्र टाइम्समध्ये उपसंपादक होते. थोडं स्थिरस्थावर झाल्यानंतर मूल हवं, असा विचार केला होता. मला मुलांची फार आवड नाही, मी मुलांत फार रमत नाही. लग्नाला चार वर्षं होत होती, त्या सुमारास गार्गी झाली. आम्ही दोघं नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर असायचो. माझे सासूसासरे आणि आमच्या घरची एक सदस्य असलेली आमची साहायक लीला यांनी गार्गीचा अधिक सांभाळ केला. ती सहासात वर्षांची झाली तेव्हा मी नोकरी सोडली. त्यानंतर मला तिचा जास्त सहवास मिळाला. तिला वाढवताना अमुक एक करायचं हे ठरवलं नसलं तरी तिच्यावर कशाचीही बळजबरी करायची नाही, इतकं नक्की होतं. १८ वर्षांपर्यंत ती आपली, त्यानंतर ती स्वतंत्र असेल आणि आपणही तिच्यावर भावनिकदृष्ट्या विसंबून राहायचं नाही, हे ठरवलेलं होतं.

ती अगदी लहान असल्यापासून तिला वेगवेगळ्या प्रकारचं संगीत आम्ही ऐकवत होतो. तिला घेऊन प्रवासही करत असू. ती अडीच वर्षांची असताना मी तिला देवनागरी वाचायला शिकवलं. मी फार मेहनती, अभ्यासू वगैरे नाही, त्यामुळे मी तिला अभ्यासासाठी आग्रह करत नाही. दहावीत मार्क महत्त्वाचे आहेत कारण कॉलेजचा प्रवेश त्यावर अवलंबून आहे, इतकंच तिला सांगितलं होतं. ती शाळेत असताना फार काही अॅक्टिव्हिटी करत नव्हती. गाणं शिकणंही तिने मधेच सोडून दिलं होतं. तिच्या मनात नसताना तिने ते चालू ठेवावं, असा माझा हट्ट नव्हता. पण कॉलेजला जायला लागल्यापासून ती प्रचंड उद्योगी झाली आहे. आता ती सरोद शिकतेय, लिहिते, प्रचंड वाचते, खूप भटकते, इंग्रजी/हिंदी/मराठी गाणी आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत दोन्ही ऐकते, तिचं विस्तृत मित्रमंडळ आहे, ज्यात मित्र-मैत्रिणी आणि LGBTQ गणल्या जाणाऱ्या व्यक्तीही आहेत. त्यांना स्वीकारण्यासाठी मन खुलं करायला तिने मला शिकवलं आहे.

मी पत्रकार आहे, त्यामुळे सणावाराला मी घरी असतेच असं नाही. अनेकदा मला कामानिमित्त बाहेर जावं लागतं. ते तिने स्वीकारलं आहे. ती त्याविषयी कटकट करत नाही. ती आठनऊ वर्षांची असताना, २६/११च्या हल्ल्यांच्या वेळी मी फिक्सर म्हणून काम करत होते, गार्डियनच्या पत्रकारासोबत ताजच्या परिसरात होते. २७ला सकाळीही मी तिला शाळेत पाठवलं होतं, कारण आपलं काम आपण करत राहायला हवं, हे तिला कळायला हवं होतं. त्या दुपारी टीव्हीवर लाइव्ह टेलिकास्ट पाहून तिने काळजीने मला फोन केला होता, आई तू ताजच्या जवळ नाहीयेस ना, तिथे बाँबिंग होतंय. मी तिथेच होते, पण तिला अर्थातच मी तसं सांगितलं नाही. आई असले काहीतरी उद्योग करत असते, हे तिला तेव्हापासून ठाऊक झालंय. पाचसहा वर्षांपूर्वी एकदा घरातला तिचा पसारा पाहून चिडून मी तिला काहीतरी बोलत होते. तेव्हा तिने मला थांबवून म्हटलं होतं, आई, तुझ्या पहिल्या वाक्यात मला कळलंय काय हवंय ते. पुढचं लेक्चर देऊ नकोस. त्या क्षणापासून मी कमीत कमी शब्दांत माझा राग वा नाराजी व्यक्त करायला शिकले. आताही घरात पसारा असतोच, जेवणाखाण्यात दिरंगाई असते, पण मी दुर्लक्ष करायला शिकलेय. ती १८ वर्षांची झाली तेव्हाच मी तिच्या छोट्यामोठ्या बाबींमध्ये लक्ष घालणं थांबवलंय. बँकेतलं तिचं खातं सांभाळणं, कॉलेजातल्या परीक्षा, अटेंडन्स वगैरेची जबाबदरी तिच्यावर असते. त्यातनंही कधीतरी गडबड होते, पण तेही होतच राहणार हे आम्ही गृहीत धरलं आहे. मी निष्काळजी आहे, असं यातनं वाटू शकतं. पण व्यक्तिस्वातंत्र्यावर नुसता विश्वास असून उपयोग नाही, ते आचरणात आणायला हवं ना? खून आणि बलात्कार याव्यतिरिक्त कोणतीही गोष्ट माफ करण्यापलिकडची नाही, असं माझं ठाम मत आहे. मी स्वत: अतिशय चुकतमाकत शिकत या टप्प्याला येऊन पोचलेय. त्यामुळे ती वयपरत्वे चुका करणारच, त्याचा बाऊ करण्याची गरज मला वाटत नाही. तिच्या चुकांमधनं मीही शिकतेयच कीे!

-मृण्मयी रानडे, पत्रकार.