कष्टकऱ्यांनी पुसले कलाकारांचे अश्रू

 

”कलावंत आयुष्यभर आपली करमणूक करतात, त्यांच्या डोळ्यात पाणी असताना आपण त्यांना आधार दिलाच पाहिजे.”ढवळीपुरीचे सरपंच राजेश भनगडे सांगत होते.
ढवळीपुरी हे, नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातलं कष्टकरी, कामगारांचं गाव. तमाशातील वगनाट्यसम्राट अशी ओळख असलेले प्रसिद्ध तमाशा कलावंत चंद्रकांत ढवळपुरीकर हे याच गावचे. त्यामुळे गावाला तमाशाचा वारसा. नावाजलेल्या या तमाशाफडामुळे ढवळपुरीकरांचे नाव सातासमुद्रापार गेले. त्याचा गावकऱ्याना अभिमान. त्यांची मुलं किरण आणि संतोष ढवळपुरीकर हा वारसा पुढे नेत आहेत.

गावात मार्च महिन्यात यात्रा असते. त्या यात्रेतही राज्यभरातून तमाशाचे नावाजलेले फड येत असतात. गेल्या वर्षापासून मात्र कोरोनामुळे राज्यभरातले तमाशाचे फड बंद आहेत. त्यामुळे तमाशा कलावंताची उपासमार होत आहे. काहीच दिवसांपूर्वी ही व्यथा एका वृत्तवाहिनीवर मांडताना प्रसिद्ध तमाशा कलावंत आणि फडमालक रघुवीर खेडकर आणि मंगला बनसोडे यांना रडू कोसळलं. हे दुखः पाहून तमाशा कलेचा वारसा जपणाऱ्या ढवळपुरीतला प्रत्येक जण गहिवरला.
सरपंच राजेश भनगडे, भागाजी गावडे, सुखदेव चितळकर, बंडू जाधव, हिरामण भालेराव, अजित सांगळे, अहमद पटेल यांच्यासह इतरांनी पुढाकार घेत तमाशा कलावंताच्या मदतीसाठी सोशल मिडीयावरून आवाहन केलं आणि बघता-बघता 56 हजार रुपये जमले.
रघुवीर खेडकर यांनी ते गावात येऊन स्वीकारले. तमाशा कलावंतांना कष्टकऱ्यांकडून अशा प्रकारे मिळालेला राज्यातली हा पहिलाच आधार. “माणुसकी जिवंत आहे. ही मदत कलावंतांसाठी निश्‍चित मोलाची ठरेल,’ अशी भावना रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली.

-सूर्यकांत नेटके, ता. पारनेर, जि. अहमदनगर

Leave a Reply