काउन्सेलर काम करताना, पालकही जागृत असते.

काउन्सेलर म्हणून काम करताना माझ्यातली पालकही जागृत असते. आईवडिलांच्या कामानिमित्त घराबाहेर असण्याने मुलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते, असं म्हटलं जातं. पण आवर्जून सांगते, की तसं अजिबात नाही. आई नोकरी-व्यवसाय करणारी आणि मुलांसोबत तुलनेनं कमी वेळ असली तरी ‘क्वालिटी टाइम’ देणं महत्त्वाचं असतं. ईशान, कावेरी दोघांना वाढवताना मीही हेच केलं. त्यांच्याबरोबर अॅक्टिविटीज करण्यानं, रात्रीचं जेवण सर्वांनी एकत्र, गप्पा मारत घेण्यानं हे सहज जमून जातं. माझ्याकडे इंटर्नशिपसाठी, सल्ल्यासाठी येणाऱ्या तरुण मुलींना माझं सांगणं असतं की मुलांसाठी करियर थांबवणं, हा पर्याय होऊच शकत नाही. ‘वर्क-लाइफ बॅलन्स’ साधलं पाहिजे. शेरील सँडबर्ग (फेसबुकची चीफ ऑपरेटिंग ऑफिसर) यांनी ‘लीन इन’ या पुस्तकात केलेलं मार्गदर्शन मला उपयुक्त ठरलं. त्या लिहितात की, नोकरी-व्यवसाय करणाऱ्या महिलांवर टीका होते ती काम न करणाऱ्या महिलांकडून किंवा असुया करणाऱ्या समाजघटकांकडून.

मुलं वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर पालकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याही नकळत डिमांडिंग होतात. तेव्हा आव्हान उभं राहातं. दोन-तीन वर्षांच्या वयाची मुलंसुद्धा हट्ट, समवयस्कांशी मारामारी, आपली वस्तू दुसऱ्याला न देणं करतात. यातून मुलं ‘माझ्याभोवती राहा’ असा संदेश देत असतात. टीनएजरचं पालकत्व सगळ्यात अवघड! ईशान १७ वर्षांचा आहे आणि कावेरी १३. मी काही पुस्तकं वाचून या आव्हानाला सामोरं जायची तयारी केली. शरीरात घडणाऱ्या बदलांमुळे मुलं या वयात संवेदनशील होतात आणि ती स्थिती नजाकतीने हाताळायची असते, हे मला वाचनातून समजलं. ‘मी आता मोठा झालोय,’ हे पोहोचवण्यासाठी मुलं लक्षवेधी काही करतात. केस वाढवणं, रंगीत कपडे घालणं वगैरे. पालक या किरकोळ दृश्य गोष्टींना आक्षेप घेत वाद घालतात, त्यात एनर्जी खर्च झाली की महत्त्वाच्या बाबींवर बोलायचं राहून जातं. ईशाननेही एकदा केस वाढवले होते. मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मग शाळेतून वॉर्निंग आली. ईशान प्रिन्सिपलना जाऊन भेटला. तो म्हणाला, “केस अशा तऱ्हेने ठेवण्यावर माझा आत्मविश्वास अवलंबून आहे.” प्रिन्सिपलना मी भेटणार नाही, हा प्रसंग तूच निभावायचा, असं माझं म्हणणं होतं आणि तोही आपली भावना, आपलं म्हणणं मांडू शकला होता. आपण परिणामांची जबाबदारी मुलांवर टाकावी. त्यामुळे योग्य काय याचा विचार ती करतात आणि तसं वागतातसुद्धा.
दोन पिढ्यांच्या आवडीनिवडीतल्या वेगळेपणामुळे संघर्ष होतो. माझी मुलं पाश्चिमात्य संगीत मोठ्या आवाजात ऐकतात. मग नियम केला, की तुमच्या खोलीत संगीत लावा. मला शास्त्रीय संगीताची आवड. एकदा आशुतोष जावडेकर यांचा ‘लयपश्चिमा’ कार्यक्रम ऐकण्याचा योग आला आणि मुलांना आवडणार्या पाश्चिमात्य संगीताची चव चाखली. मी मुलांना म्हणाले, “तुम्ही ज्या गोष्टीचा आस्वाद घेता, ती मला आता समजली…” असं मुलंही आपल्याला घडवत असतात.
आव्हान देण्याची भाषा या वयात वापरली जात असते. मला भडकवण्यासाठी ईशान म्हणतो, “मी दारू प्यायलो, सिगरेट ओढली तर काय करशील…?” मी उत्तरते, ‘मुक्तांगणमध्ये ठेवून तुझ्यावर उपचार करीन…!’ असं हसतखेळतही हाताळता येतं.
सोशल मीडिया आणि गॅजेट्स हेही पौगंडावस्थेतल्या मुलांच्या पालकांसमोरचं मोठं आव्हान आहे. ते हातळण्यासाठी कुटुंबियांनी एकत्र वेळ घालवणं, विविध कार्यक्रमांत सहभाग घेत ‘संवाद’ या गोष्टीवर भर देणं याला पर्याय नाही. मुलांना सोशल मीडियावर शेकड्यानं फ्रेंड्स असणं आणि प्रत्यक्षात एकही फ्रेंड नसणं, असं चित्र असेल तर ओळखावं की इथे समस्या आहे. पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
(मुक्ता पुणतांबेकर या पुणेस्थित मुक्तांगण पुनर्वसन केंद्राच्या संचालक आहेत.)

शब्दांकन : सुलेखा नलिनी नागेश / naviumed@sampark.net.in
 -मुक्ता पुणतांबेकर