कृषी सहाय्यकाने उभारले ‘ज्ञानमंदिर’

कृषी सहाय्यक- शेतातील पिकांचे नियोजन, कृषी शिबिरांचे आयोजन, माती परीक्षण शिबिरं, अशी वेगवेगळी जबाबदारी कृषी सहाय्यकांवर असते. खरंतर यांचं काम फिरस्तीचे असते, वेगवेगळ्या गावांची जबाबदारी त्यांच्यावर असते. मात्र आठवड्यातील दोन दिवस या कृषी सहाय्यकांनी ग्रामपंचायतीत पूर्ण वेळ हजर असणे अपेक्षित असते, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देणं तसंच त्यांच्या समस्या जाणून घेणं सुकर होईल. मात्र महाराष्ट्रात क्वचितच कुठं तरी कृषी सहाय्यकाचे स्वत:चे कार्यालय असेल.

असंच कृषी सहाय्यकाचे एक स्वतंत्र कार्यालय नागपूर जिल्ह्यातील गुमथळा या गावी आहे. आणि त्याहूनही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की हे फक्त कृषी सहाय्यकाचे कार्यालय नाहीए, तर गावाचं जणू ‘ज्ञानमंदिर’ आहे. हे घडलं कसं? तर ऐका, गुमथळा हे गांव नागपूरपासून २० किलोमीटर अंतरावर आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये कृषी सहाय्यक म्हणून  रूजू झालेले महेंद्र गजभिये यांनी कार्यालयाचा कायापालट करून हे कार्यालय प्रसिद्धीच्या झोतात आणलंय. गुमथळा, लोणारा, भोकारा, गोधणी आणि घोगली अश्या पंचक्रोशीतील पाच गावाचा कार्यभार त्यांच्याकडे आहे. पाचही गावातल्या गावकऱ्यांना कृषी सहाय्यकाला भेटता यावं म्हणून, पूर्वीपासूनचं हे कार्यालय थाटलं होतं. पण याचा प्रत्यक्षात उपयोग फारसा कधी झालाच नाही. मात्र गजभिये आलेत आणि त्यांनी या पडक्या कार्यालयाची स्वखर्चाने डागडूजी सुरू केली.

महेंद्र गजभियेंनी गुमथळा गावात सुरू केलेले वाचनालय आणि अभ्यासिका

नेमकं त्याचवेळी गावातील काही तरूण मंडळी त्यांच्याकडे आली आणि त्यांनी “ सर, गावात वाचनालय नाही, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरूणांना शांत बसून वाचन करता येईल, अभ्यास करता येईल अशी जागाच गावात नाही. कृपया, आम्हाला वाचनालयाची सोय करून द्या” अशी विनंती केली. सगळ्यांकडे मागणी करून हतबल झालेले युवक आशा घेऊन गजभियेंकडे आले होते. गजभियेंनी विचार केला, तीन खोल्यांचे कार्यालय तसेही कामात येणार नव्हते. एका खोलीत स्वत:चे कार्यालय थाटल्यावर इतर दोन खोल्या रिकाम्याच राहणार, हे लक्षात आल्यावर त्यांनी लागलीच तरूणांना होकार दिला. ”आपण याच ठिकाणी तुमच्यासाठी अभ्यासिका सुरू करूयात ” असं आश्वासन दिलं.

लागलीच त्याच युवकांना हाताशी घेऊन स्वखर्चाने त्यांनी साहित्याची जुळवाजुळव केली आणि रंगरंगोटीही मुलांकडून करून घेतली. तरूणांसह स्वत: मेहनत घेऊन  वाचनालयाची खोली सुसज्ज केली. हे करत असतानाच “शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी वाचनालय सुरू करतोय, मग शेतकरी राजासाठी का नाही..?” हा विचार त्यांच्या डोक्यात आला नि लगेच त्यांनी दुसऱ्या खोलीत शेतकऱ्यांसाठी सुद्धा वाचनालय सुरू केलं. या खोलीत त्यांनी वाचनीय अशी माहितीपर पुस्तकं, मासिकं , दैनिकं, साप्ताहिकं आणि शेतकऱ्यांसाठी योजनांची माहिती असलेली पत्रकं लावून खोली सुशोभित केली. इथे आलेल्या शेतकऱ्यांनी योजनांची माहिती वाचून त्याचा लाभ घ्यावा हा यामागचा उद्देश.

शिवजयंतीला साध्याश्या कार्यक्रमात झाले वाचनालयाचे उद्घाटन

कसलाही गाजावाजा न करता शिवजयंतीला त्यांनी कृषी विज्ञान केंद्राअंतर्गत ‘कृषी वाचनालय व कृषी कार्यालया’ चे उद्घाटन करून गावातील युवक- विद्यार्थ्याना अभ्यासाचा मार्ग मोकळा करून दिला. याचा फायदा लहान- मोठे सर्वच विद्यार्थी घेत आहेत. गजभिये यांनी युवकांची इच्छा पूर्ण केल्याने युवावर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे आकर्षित झालाय. सोबत शेतकरी सुद्धा सकाळी वृत्तपत्र वाचायला आणि सायंकाळी इतर माहितीपर मासिकं, पुस्तकं वाचायला आवर्जून येतात. गावातील युवक दिवसभर शेतात राबून सायंकाळी अभ्यासाला येतो. अश्या युवकांकरिता शनिवार – रविवार या दोन दिवशी मान्यवरांकडून स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शनपर व्याख्यानंही आयोजित केली जातात.

या वाचनालयात २५ विद्यार्थी नियमित अभ्यासाला येत असून,त्यापैकी १२ युवक-युवती हे स्पर्धा परिक्षेची तयारी करतायेत. याच्यांतील नितीन नावाचा युवक यूपीएससीची तयारी करतोय, शिवाय वाचनालयातील पुस्तकांच्या नियोजनाची जबाबदारीही तो सांभाळतो. या वाचनालयास महेंद्र गजभिये यांच्या पत्नीने ५ हजाराची पुस्तकं भेट दिली आहेत. या अनोख्या वाचनालयाला काही महिन्यांपूर्वी माजी कृषीमंत्री दादा भुसे यांनीही भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी वाचनालयास ५ हजार रूपयांची मदत पुस्तकांसाठी केली आहे, तसेच गावातील इतर दानशूरांनीही ५ हजारांची पुस्तकं घेऊन दिली आहेत. आज या वाचनालयात फक्त विद्यार्थ्यांसाठी १५ हजारांची पुस्तकं वाचनासाठी उपलब्ध आहेत. शेतकर्यांकरिता खर्च होतो तो वेगळाच…! हा सर्व खर्च स्वत: कृषी सहाय्यक गजभिये हे स्वत:च्या पगारातून करत आहेत.

माजी कृषीमंत्री दादा भुसेंच्या हस्ते गजभियेंचा सत्कार

गजभियेंच्या अनोख्या कार्यालयाची आणि वाचनालयाची चर्चा पंचक्रोशित पसरली असून, आजूबाजूचे गावकरीही त्यांच्या गावातील कृषी सहाय्यकाकडे आपल्याही गावात वाचनालय- अभ्यासिका उभारावी, अशी मागणी करत आहेत. माजी कृषीमंत्री दादा भुसेंनीही शेतकरी, ग्रामस्थ आणि कृषी विभागाचे भावनिक ऋणानुबंध जुळवणारा उपक्रम म्हणून या उपक्रमाचे कौतुक केलं होतं. भविष्यात संगणक मिळाल्यास प्रिंटर घेऊन शेतकऱ्यांची शेतीशी निगडित कागदोपत्री कामं करून देण्याचा, तसंच प्रोजेक्टर घेऊन त्यावर शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान आणि योजनांची माहीती शेतकऱ्यांना देणार असल्याचा मानस गजभियेंनी व्यक्त केला.

लेखन: नीता सोनवणे, नागपूर.

नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/

 

#नवीउमेद

#नागपूर

#वाचनसंस्कृती

#आमचीमाती_आमचीमाणसं

#कृषीसहाय्यक

Leave a Reply