‘कॅन्सरला न घाबरता त्याच्याशी लढलं पाहिजे’, कॅप्टन रितू बियाणी सांगतात. कॅप्टन रितू यांनी आतापर्यंत देशभरात २ लाख किलोमीटर प्रवास करत ३ लाख लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवला आहे.
कॅप्टन रितू बियाणी पुण्यातल्या पंचवटी इथं राहतात. नागपूरमधल्या गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजमधून शिक्षण घेतल्यावर १९८१ ते १९९२ या काळात त्यांनी भारतीय सैन्यदलात दंतशल्य चिकित्सक म्हणून सेवा बजावली.
सैन्यदलाच्या डेंटल कोरमधल्या त्या पहिल्या महिला पॅराट्रूपर. उत्तम स्काय डायव्हर,गिर्यारोहक असलेल्या कॅप्टन रितू यांनी दुर्गम भागात, सीमारेषेवर सेवा बजावली. सैन्यदलातील सेवानिवृत्तीनंतर आनंदात आयुष्य सुरू असतानाच वर्ष २००० मध्ये त्यांना स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं. या काळातच इतरांमध्ये या रोगाविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज लक्षात आली. शहरांमध्येही अजून या रोगाविषयी पुरेशी माहिती नाही तर दुर्गम भागांचे काय. माहितीचा अभाव तर आहेच याखेरीज या रोगाकडे बघण्याचा दृष्टिकोनही मागास आणि अशास्त्रीय.
कर्करोगावर मात केल्यावर कॅप्टन रितू यांनी वर्ष २००६ पासून प्रोजेक्ट हायवे अंतर्गत देशभरात कॅन्सर जागृती मोहीम सुरू केली. कच्छपासून ईशान्य भारतापर्यंत सियाचीन बेस कॅम्पपर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी या आजाराबाबतची शास्त्रीय माहिती, त्याला धीरानं कसं सामोरं जायचं हे सांगितलं आहे. त्यांची मुलगी तिस्ता जोसेफही आता या मोहिमेत उतरली आहे.
गेल्या वर्षी कोविडमुळे या कामात खंड पडला असला तरी या काळात स्थलांतरितांना आपल्या घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी त्यांनी मदत केली. कोविड रुग्णांसाठी काम केलं. पुढल्या काळात सीमेवरची गावं, दुर्गम भागात त्यांना कॅन्सरबाबत शास्त्रीय दृष्टिकोन वाढीला लागावं यासाठी काम करायचं आहे.
-संतोष बोबडे, पुणे