”गावांमध्ये साध्यासाध्या सुविधा मिळवण्यासाठी नागरिकांना कशी तारेवरची कसरत करावी लागते , ते मी लहानपणापासून पाहिलं आहे. आरोग्य सेवेसाठीही शहरात धाव घ्यावी लागते. तेव्हाच ठरवलं होतं, शिक्षण पूर्ण झालं की गावासाठी काहीतरी करायचं.” २१ वर्षांची कल्याणी जोशी सांगत होती. कल्याणी, सर्वात लहान वयातली कोकणातील सरपंच तरुणी ठरली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातलं निवे बुद्रुक. साधारण २ हजार लोकसंख्येचं हे गाव. गेल्या आठवड्यात ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया झाली. त्यात गावपॅनेलची उमेदवार असलेल्या कल्याणीला गावकऱ्यांनी बिनविरोध निवडून दिलं. कल्याणीच्या सरपंच होण्यात गावातील लवू माने, प्रकाश जोशी, विजय राऊत, कृष्णा जोशी, अमोल जाधव, सुरेश महाडिक, दिनकर विभूते, सचिन इप्ते, दीपक लिंगायत, बी. टी. यादव, वैभव गावणकर, अनंत चौगुले यांचा मोलाचा वाटा होता. कल्याणीनं बीएस्सीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तिचे वडील रत्नागिरी शहरातील एका हॉटेल मध्ये आचारी म्हणून काम करतात तर आई गृहिणी आहे एक भाऊ महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.
कल्याणीनं निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी गावाच्या विकासाचा आढावा घेतला. विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत नेण्यासाठी अभ्यासपूर्ण नियोजन आपण तयार करणार असल्याचं तिने सांगितलं. समाजसेवा करण्याची नुसती आवड असून चालत नाही त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येऊन विविध विकासकामे आपल्याला करता येतात, यासाठी उच्च शिक्षित तरुण वर्गाने समाजकारणात उतरायला हवे तर प्रत्येक गावाची प्रगती झपाट्याने होईल, असे कल्याणीला वाटते.
-जान्हवी पाटील, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी