साऊथ आफ्रिकेतील गौटेंग राज्यातल्या जोहान्सबर्ग शहरात आम्ही राहतो. इथली परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आमच्या या राज्यातच सर्वाधिक कोरोनाबाधित आहेत. आता इथले नियम व कायदा अजून कडक करण्यात आला आहे. आम्हीसुद्धा बाहेर जाण्याचे टाळत आहोत. किराणा सोडून इतर कोणत्याच गोष्टीसाठी बाहेर पडत नाही. थंडीही खूप वाढली आहे. थंडीमुळे सर्दीताप होऊन डॉक्टरकडे जायची गरज पडू नये, ह्यासाठीसुद्धा घरीच काळजी घेत आहोत. येथील हेल्पलाइन नंबर्स व्यवस्थित चालू आहेत. पुरेशी माहिती दिली जाते. कुणी आजारी असल्यास त्यांना कळवल्यास ते वेळोवेळी विचारपूस करतात.
आई-वडिलांची व घरच्यांची खूप आठवण येते. त्यांनाही आमची खूप काळजी वाटते. त्यातून बातम्या वाचून त्यांची काळजी जास्त वाढते. अशा वेळेस आम्ही त्यांना जे खरे आहे ते सांगून आम्ही नीट असल्याचे सांगतो. अर्थात असा वेळ बऱ्याच काळानंतर मिळाला आहे. त्यामुळे आई-वडील व आम्ही ऑनलाईन गेम्स एकत्र खेळतो. रोज व्हिडिओ कॉल वरून एकमेकांची खुशाली कळवतो. एकमेकांना आम्ही काढलेली चित्रे दाखवतो. वडील आपली कला आम्हाला दाखवतात. आई गाणी म्हणून पाठवते. असं एक वेगळंच विश्व झालं आहे. दूर असूनसुद्धा त्यांच्यासोबत वेळ घालवता येतो. याचं समाधानही वाटतं कधीकधी. इतका फवला वेळ पहिल्यांदाच मिळाला आहे. म्हणून आम्ही व आमची मित्रमंडळी, Udemy.com/ Coursera.com अशा शैक्षणिक माध्यमांद्वारे हवे ते शिकून घेत आहोत. त्यात एक वेगळीच मजा आहे..
भारतातलं चित्र बघून वाटतं की, आपल्या देशाचे सरकार त्यांना जेवढे जमते तेवढे करत आहे. आपण आपली काळजी घेणे जास्त आवश्यक आहे. आपल्यावर फक्त एकच जबाबदारी आहे सध्या… ती म्हणजे घरी बसून आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करणे. तेवढे आपण केलेच पाहिजे. मी सर्वांना सांगू इच्छिते की, हा वेळ तुमचा आहे. तुमच्यासाठी मिळाला आहे असं समजा. ज्या गोष्टी वेळ नसल्यामुळे अर्धवट राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करा. नवीन काहीतरी शिका. छंद जोपासा. असे समजा की, बाहेरचे जग तुमच्यासाठी थांबले आहे. कोरोनाचा ताण घेण्यापेक्षा स्वतःमध्ये positive बदल घडवून आणा.
– ऋतुजा डाफळे, साऊथ आफ्रिका