सध्या मी ऑस्ट्रेलियामध्ये मेलबोर्न येथे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे आणि मेलबोर्न शहरकेंद्रापासून दूर बरवुड, या एका अत्यंत दाटीवाटीच्या उपनगरात राहतो आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ‘गर्दी’ या शब्दाने विशेष लक्ष वेधून घेतले असले तरी मला बाहेर अजिबात गर्दी दिसत नाही. कोविड-१९ ची साथ पसरली आणि बऱ्या न झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली असली तरी इथे मात्र संकटाला तात्काळ प्रतिसाद दिल्याने परिस्थिती आटोक्यात असल्याचे दिसून येत आहे. या देशातील वस्ती विरळ असली तरी या व्हायरसने प्रत्येकाला घाबरवून सोडले होते. मात्र, वैद्यकीय कर्मचारी चांगल्या रीतीने काम करत असून त्यांच्या कठोर परिश्रमांमुळे देशामधील नवीन रुग्णांचे प्रमाण मार्चअखेरीस दिवसाला ४०० होते, ते मेच्या आरंभी दिवसाला २४ पर्यंत उतरले आहे. अनेक मूलभूत उपाययोजना आणि ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांचा अफाट समजूतदारपणा, यांच्यामुळे आम्ही व्हायरसला भारी ठरतो आहोत.
राज्य शासनाने अनके प्रकारचे दिलासा निधी आणि योजना सुरू केल्या आहेत. भाड्यासाठी दिलासा निधी (माणशी २००० डॉलरपर्यंत), व्हिक्टोरिया राज्याकरता काम करणे, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वित्तीय मदत (विद्यार्थ्यामागे ११०० डॉलरपर्यंत) आणि इतरही अनेक. याचबरोबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना वित्तीय सहाय्य देण्यासाठी विद्यापीठे पुढे येत आहेत. पैशांसाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माझ्या विद्यापीठाने एकरकमी मदत केली, ज्यात माझ्या सहकारी मित्रांच्या बँक खात्यात थेट १५०० डॉलर जमा करण्यात आले. एवढ्या पैशात दोन महिन्यांचे भाडे देऊन वर एका आठवड्याचे किराणा समान घेता यावे. ऑस्ट्रेलियातल्या राजकारणाकडे मी फारसे लक्ष देत नाही; पण या महामारीच्या काळात प्रत्येक माणसाला आधार देऊन जास्तीत जास्त जीव वाचवण्यासाठी त्यांनी कसलीही कसूर केलेली नाही.
घरी असताना आम्ही शासनाकडून मिळालेल्या सर्व आवश्यक मार्गदर्शक सूचनांचे पालन करतो. म्हणजे एकमेकांत अंतर राखतो, घबराट निर्माण करत नाही आणि फक्त अत्यावश्यक कारणासाठीच बाहेर पडतो. आम्ही सगळ्यांनी अशा मार्गदर्शक सूचना पाळल्यामुळे शासनाने पूर्ण लॉकडाऊन लादला नाही आणि आम्ही अत्यावश्यक गोष्टींसाठी बाहेर जाऊ शकलो. माझे कुटुंब भारतात आहे आणि तिथल्या हाताबाहेर चाललेल्या स्थितीतल्या आकड्यांवर त्यांचे लक्ष आहे. माझ्या मनात कधी कधी विचार येतो, या भयंकर साथीमुळे उद्भवलेल्या कठीण प्रसंगाला ते कसे तोंड देत असतील! मग मी लगेच त्यांच्याशी बोलतो आणि ते ठीक असल्याची खात्री करून घेतो. माझा अभ्यास आणि माझी प्रकृती, यांवर माझे लक्ष केंद्रित ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. आठवड्यातल्या बहुतेक दिवशी मी व्यायाम करतो, नवनव्या पाकक्रिया करून बघतो, सोबत राहणाऱ्यांशी अधिक निकट संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, नेटफ्लिक्सवर नव्या मालिका बघतो, गिटार वाजवायला शिकतो आणि सगळ्यात उत्तम म्हणजे दुपारी झोपा काढतो. जमेल तितके कामात राहण्याचा माझा प्रयत्न असतो. आपल्यापैकी बहुतेक जण सुखात जगताहेत आणि आपल्याला इतरांप्रमाणे गंभीर अडचणींना तोंड द्यावे लागत नाही. म्हणून आपण जास्त समंजस होऊन केवळ प्राथमिक गरजांच्या पूर्ततेचीच काळजी घेत राहिले पाहिजे. तरच आपण या कठीण समयी जे आघाडीवर राहून काम करत आहेत आणि रोजच जीवनमरणाच्या लढाईत ज्यांना आपल्या सुजाण पाठबळाची गरज आहे; त्यांचे कष्ट कमी करू शकू. स्वतःचे जगणे साधे, सरळ ठेवले; तर तुम्ही शांत, सकारात्मक रहाल. व्हायरस वेगाने पसरत असला तरी त्याला आवर घालणे अशक्य नाही.
– श्रेयस सरदेशमुख
मेलबोर्न,ऑस्ट्रेलिया