कोरोनाअनुभव भारताबाहेरचा

सध्या मी Brighton या शहरात राहते. लंडनपासून दोन तासावर हे शहर आहे. UK मध्ये इटली आणि स्पेनच्या मानाने थोडा उशिरा लॉक डाउन झाला तरीही आता तीन आठवडे होऊन गेले आहेत. युरोपमधे करोनाचा प्रसार इटलीपासून चालू झाला. त्या वेळेस UK ने इटली मधून परत येणाऱ्या लोकांना सेल्फ आयसोलेट करण्याची सूचना दिली होती. मी त्यावेळेस नेमकी साऊथ इटली मध्ये होते त्यामुळे परत आल्यावर मला लक्षणं नसतानाही सेल्फ आयसोलेट व्हावं लागलं.
१४ दिवसानंतर मी एक दिवस ऑफिसला जाऊ शकले आणि दुसऱ्या दिवशी इथल्या सरकारने लॉक डाउन चालू केला.

लोकांनी फक्त गरजेच्या गोष्टी आणण्यासाठी आणि व्यायामासाठी घराबाहेर पडावं असा सल्ला दिला. या काळात, जेव्हा, सरकारचा सल्ला रोज बदलत होता, इथले लोक थोडे पॅनिक झाले होते. पुढे काय होईल याची कल्पना नसल्यामुळे सगळे लोक भरपूर सामान भरून ठेवू लागले. डाळ, तांदूळ, टॉयलेट पेपर अश्या गरजेच्या गोष्टी आऊट ऑफ स्टॉक झाल्या. परिस्थिती हाताबाहेर जायला लागल्यामुळे दुकानांनी रिस्ट्रिकशन्स चालू केली.

आता काही आठवड्यानंतर परिस्थिती सुधारली आहे. लोकं आता खूपच काळजी घेऊन रूल्स फॉलो करायला लागले आहेत. त्यामुळे अजूनही पार्कमध्ये चालायला मी जाऊ शकते, जे मेंटल स्टॅबिलिटीसाठी गरजेचं आहे. UK मधे करोनाच्या टेस्ट्सचं प्रमाण कमी असल्यामुळे नेमका आकडा अजूनही सांगू नाही शकत. इथे सिम्पटम्स असली तरी घरीच आयसोलेट करायचा सल्ला दिला आहे. सरकारने निवृत्त झालेल्या नर्सेस, डॉक्टर्सना परत कामावर बोलावलं आणि २०,००० च्यावर लोक आलेसुद्धा!

बऱ्याच सामान्य लोकांनी पण म्हाताऱ्या लोकांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम सुरू केलं आहे. इटलीच्या स्थितीकडे बघून लंडन मध्ये ५०० बेड्सचं एक हॉस्पिटल १० दिवसात उभारलं गेलं. पण सुरक्षा साधनांचा मात्र अजूनही तुटवडा आहे. अजून तीन आठवडे तरी लॉक डाउन चालू राहणार आहे आणि त्यानंतरच परिस्थितीचा अंदाज येईल.
हा काळ नक्कीच खूप तणावाचा आहे. माझ्या घरच्यांना माझी आणि मला त्यांची सतत काळजी तर असतेच पण व्हिडीओ कॉलमुळे संपर्कात राहणं सोपं झालं आहे. कामाचं आणि पुढच्या जॉबचं टेन्शन असलं तरी ही परिस्थिती आपल्या हाताबाहेरची आहे त्यामुळे त्याचा फार विचार करण्यापेक्षा मी कामात बिझी राहण्याचा प्रयत्न करते. रेग्युलर व्यायाम, नवीन रेसिपीस, वाचन यात बाकी वेळ सहज निघून जातो.

मला स्वतःला एक रुटीन चालू केल्याने खूप फायदा झाला. सतत न्यूज बघून, फॉर्वर्डेड मेसेजेस बघून अस्वस्थ होणं साहजिक आहे. बरीच चुकीची माहिती पण दिली जातेय. त्यामुळे प्रत्येक माहितीचा सोर्स चेक करणं खूप गरजेचं आहे. ज्यांना वर्क फ्रॉम होम करणं शक्य नसेल त्यांनी काहीतरी नव्या गोष्टींमध्ये, नवीन कौशल्य शिकण्यामध्ये वेळ घालवावा असं वाटतं.
अमृता गाडगे, युके

Leave a Reply