कोरोनाअनुभव भारताबाहेरचा

 

मी जर्मनीतील ड्युसेलडॉर्फजवळच्या एका शहरात माझ्या मुलीकडे राहायला आले आहे. जर्मनी हा अतिशय शिस्तप्रिय देश आहे. नागरिक संयमी आहेत. आत्ताच्या परिस्थितीतही इथलं वातावरण शांत आहे.

लोक परस्परांत अंतर ठेवून चालतात. शिस्तीत रांगेत उभे असतात. कॅफे आणि रेस्टॉरंट्स टेक अवेसाठी उघडी आहेत. मागील सोमवारपासून ८०० स्क्वेअर मीटरची दुकानं उघडायची परवानगी आहे. तसंच शाळाही हळूहळू उघडणार आहेत.

सुपर मार्केट्स उघडी आहेत. ठरावीक संख्येपेक्षा अधिक ग्राहकांना एकावेळी आत प्रवेश दिला जात नाही. सुपर मार्केटमध्ये ट्रॉलीज डिसइन्फेक्ट करून दिल्या जातात. मास्क्स लावण्याची शिफारस केली आहे. पण त्याचबरोबर वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तींना मास्क्सची अधिक गरज आहे, हेही सांगितलं जातं. दैनंदिन व्यवहारातील सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळत आहेत.

बातम्या अतिशय संयतपणे दिल्या जातात. कोणतंही भयग्रस्त विधान केलं जात नाही. रोगासंबंधी प्रत्येक विधानाला रॉबर्ट कॉख इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीचा भक्कम पाया असतो. त्यामुळे दहशत पसरत नाही. माझ्या दृष्टीने इथल्या बातम्या हा पत्रकारितेचा उत्तम नमुना आहे.

माझं इथलं वास्तव्य तात्पुरतं आहे. Work from home चा माझ्या दैनंदिन आयुष्यावर काहीही परिणाम नाही. मुलगी डॉक्टर असल्याने ती रोज हॉस्पिटलमध्ये जातेच.

मुलाखतींमधून मात्र पालकांची होणारी तारांबळ दिसते. किटा म्हणजे लहान मुलांची पाळणाघरं बंद! त्यामुळे त्यांना सांभाळून घर, अॉफिस सांभाळणं अवघड होत आहे. पण ते सांगताना तक्रारीचा सूर नसतो. एकत्र सगळ्यांनी मिळून तोंड देण्याची भावना दिसते.

नागरिक सुशिक्षित आणि समंजस आहेत. अगदी लहान मुलांमध्येही शिस्त दिसते. शाळकरी मुलांना घरी बसून कंटाळा आला आहे, असं मुलाखतीतून सांगतात. काही ठिकाणी अॉनलाइन शिकवणं सुरू आहे.

     

 

इथे Auto Kino म्हणून प्रकार आहे. आपापल्या गाडीत बसून चित्रपट बघायला सगळे एकत्र येतात. पण गाड्या विशिष्ट अंतरावर उभ्या केलेल्या असतात. गाडीत लहान मुले पुढे आणि मोठी माणसे मागे असं बसून समोर चित्रपट बघतात. ईस्टर संडेला भाविकांनी अशीच गाडीत बसून, म्हटलं तर एकत्र, म्हटलं तर आपापल्या गाड्यांत बसून, प्रार्थना केली.

मी तीन दिवसांतून एकदा बाहेर पडते. दैनंदिन आवश्यक गोष्टी आणून ठेवते. छोटी सैर करण्यावर या शहरात बंदी नाही. फक्त घोळक्याने फिरणं टाळलं जातं. अगदी कंटाळा आला तर, शहराला एक तासभर चक्कर मारून परत येते. रस्त्याला एरवीही गर्दी कमी असतेच. त्यामुळे फारसा फरक जाणवत नाही. पण संध्याकाळी एरवी चैतन्यानं रसरसलेले कॅफे बंद बघून आणि फुलांनी डवरून दरवळणारी उद्यानं ओस पडलेली बघून थोडं वाईट वाटतं.

जर्मन लोकांच्या नर्मविनोदी स्वभावानुसार त्यावरही ते मजेशीर बोलत राहतात. एकूणच जर्मन माणसाला बटबटीत उथळपणाचं वावडं आहे. त्यामुळे आलेली परिस्थिती स्वीकारून शांतपणे तोंड देण्याची अत्यंत सकारात्मक सांघिक भावना त्यांच्यात दिसते.

एक छोटा पण मला विशेष वाटलेला प्रसंग सांगते. माझी एक जर्मन मैत्रीण पूर्व जर्मनीत लाइपझिशला राहते. इथली वाचनालयं ३० एप्रिलपर्यंत बंद केलेली आहेत. माझी पुस्तकं वाचून होत आली आहेत, मग मला वाचायला मिळणार नाही, हे मी न सांगताच माझ्या मैत्रिणीनं जाणलं. आणि मला कंटाळवाणं वाटू नये म्हणून पोस्टाने तिच्याकडची काही पुस्तकं पाठवून दिली. यानं अक्षरशः हेलावून गेले मी.

आमच्याच बिल्डिंगमधल्या एका काकूंनी मुलीला मेल पाठवला. ती डॉक्टर म्हणून करत असलेल्या कामाबद्दल आभार मानले आणि ‘आई बरी आहे ना?’ हेही मेलमध्ये विचारलं. एका काकूंनी इस्टर संडेला दाराला गुपचूप चॉकलेटची मोठी पिशवी लावून ठेवली होती. या परिस्थितीत आपण मनानं जवळ आहोत, हे परदेशातही मला या फारशा परिचयाच्या नसलेल्या लोकांनी वर्तनातून जाणवून दिलं.

सामान्य नागरिकांमध्ये कोणतीही घबराट पसरणार नाही, आणि तरीही सगळ्यांना जबाबदारीची पूर्ण जाणीव होईल याची खबरदारी घेऊनच बातम्या किंवा मुलाखतींमधून संदेश दिले जातात. एकमेकांवर राजकीय दोषारोप केलेले मी ऐकलेल्या बातम्यांत तरी, ऐकले नाहीत.

घरी बसून करण्यासारख्या किती तरी गोष्टी असतात. पुस्तकं वाचणं, लेखन करणं, स्वयंपाक करणं या तीन माझ्या अत्यंत आवडीच्या गोष्टी आहेत.
त्यामुळे वेळ कसा घालवू? परतीचा प्रवास पुढे गेला, आता काय करू? ही भीती किंवा वैताग मला येत नाही.
आहे ही परिस्थिती स्वीकारून आपल्या आवडीच्या गोष्टी आणखी मजेत करत राहायच्या हा पिंड असल्याने मला वेगळा सकारात्मक विचार रुजवायची गरज भासत नाही. आलेलं प्रत्येक संकट आपल्याला शिकवत असतं. त्यामुळे ही नवं काही शिकण्याची संधी आहे असं समजावं असं वाटतं.
– सुषमा जोशी, जर्मनी

Leave a Reply