कोरोनाअनुभव भारताबाहेरचा

 

सध्या इटलीमध्ये trieste शहरात (नॉर्थ ईस्ट इटली) मी राहतो आहे. आयसीटीपी इन्स्टिट्यूटमध्ये माझी पोस्ट डॉक्टरेट सुरू आहे.

कोरोनाच्या संकटकाळातला इटालियन लोकांचा प्रतिसाद विविध प्रकारचा आहे. इटालियन लोकांवर यापूर्वी भूतकाळात कधी बंधने घालण्यात आली नव्हती; त्यामुळे सरकार आणि WHO यांनी जेव्हा सोशल डिस्टन्स पाळायला सांगितले, तेव्हा अनेकांनी लक्ष दिले नाही. यथावकाश सरकारला अधिकाधिक कडक उपाय योजावे लागले, ज्यात लोक घरी राहावेत यासाठी भरपूर दंड वसूल करण्याची तरतूददेखील होती. नंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू झालेले पाहून लोक स्वतःच अधिकाधिक जबाबदार होऊ लागले. उदाहरणार्थ सोबतच्या फोटोत या सुपरमार्केटच्या प्रवेशद्वारापाशी पाळले जाणारे सोशल डिस्टन्सिंग पहा.

माझ्या कुटुंबाला अगदी सुरुवातीपासून काळजी वाटू लागली होती आणि मी परत यावं, अशी त्यांची इच्छा होती. परंतु मला माहीत होते की याचे रूपांतर कालांतराने महामारीत (pandemic) मध्ये होणार आहे. मी त्यांना पटवून दिलं की मी इटलीत राहणं, हेच आपल्या सर्वांच्या फायद्याचं आहे. त्यांना खात्री दिली की या रोगाला मी नीट समजावून घेतलं असून सुरक्षित राहण्यासाठी काय करायला हवं, हे मला माहीत आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेल्या या रोगाला तोंड देण्याचा अनुभव घेणारा देश चीननंतर इटली, हाच होता. ही गोष्ट लक्षात घेता त्यांनी उचललेली पावले खरोखर कौतुकास्पद म्हणावी लागतील. मानवाच्या इतिहासात असा देशव्यापी लॉकडाऊन या पूर्वी कधीच झाला नव्हता आणि त्यावर भरपूर टीकाही झाली. परंतु आज दिसून येत आहे की त्यामुळे लागण होण्याचा दर रोजच्या रोज उतरण्याला मदत झाली आहे. दुर्दैवाने अशा प्रकारच्या रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ त्यांच्याकडे कमी पडण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे बंधने सैल करण्याचा पर्याय ते निवडू शकतात.

लॉकडाऊन ही कठीण परिस्थिती आहे. गेले दोन महिने घरातच राहिल्यामुळे कधी कधी मला गुदमरल्यासारखे होते. त्यात पुन्हा मला सारखी भीती वाटत राहिली आहे की भारतात ही जीवघेणी साथ हाताबाहेर जाईल. मी साथीच्या रोगांवरील माहिती वाचत असतो आणि कोणते धोरण सर्वोत्तम ठरेल, याचा सतत विचार करत असतो. हा रोग चीनच्या बाहेर पसरल्यापासून भारत सरकार करत असलेल्या कृतीवर मी लक्ष ठेवून आहे. त्यामुळे मला या साथीचा नेमका अंदाज घेणे शक्य झाले आणि चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करता आले. माझ्या मर्यादित क्षमतेला जमेल तितक्या प्रमाणात मी माझे कुटुंब, माझे मित्र आणि सर्वसाधारण जनता यांना हा विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी पाहिले की भारतातसुद्धा पुरेसे लोक या गोष्टीकडे गंभीरपणे पाहत आहेत आणि भारत सरकारही योग्य दिशेने उपाय योजत आहे, तेव्हाच माझ्या नित्याच्या संशोधनाकडे मी वळू शकलो. माझे काम तात्त्विक स्वरूपाचे असल्याने घरी राहून करण्यासारखे आहे.

स्वतःचे काम वगळता मी नियमितपणे, खरे सांगायचे तर पूर्वीपेक्षा जास्त नियमितपणे व्यायाम करण्याचा प्रयत्न केला. मन सैरभैर झाल्यासारखे वाटले तर मी ध्यानसुद्धा करतो. या लॉकडाऊनचा फायदा घेऊन मी माझ्या कुटुंबाशी जास्त बोलण्याची, गप्पा मारण्याची संधी साधली.

मला सांगावंसं वाटतं की, अशा कठीण प्रसंगी अस्वस्थ वाटणं, चिंताग्रस्त होणं नैसर्गिक आहे. परंतु तुम्ही एरवी करू शकला नसता, अशा गोष्टी करण्याची हीच संधी आहे, हे लक्षात घ्या. कुटुंबासमवेत जास्त वेळ घालवणं असो, स्वतःला जास्त वेळ देणं असो, नवीन काहीतरी कौशल्य वा विषय शिकून घेणं असो, स्वतःचं मन व शरीर यांच्यावर पुन्हा ताबा मिळवणं असो, आहारावर नियंत्रण ठेवणं असो की इतरांशी प्रेमाने वागणे असो.

– डॉ. अंजन रॉय, इटली

Leave a Reply