कोरोनाअनुभव भारताबाहेरचा

 

अमेरिकेतली भारतीय समाज मार्च-एप्रिलकडे डोळे लावून असतो. कारण एकीकडे शाळेतील विविध स्पर्धा तर दुसरीकडे भारतीय वार्षिक उत्सव असतात. फेब्रुवारीचे कॅलेंडर तर सरावाच्या तारखांनी खचाखच भरलेलं असतं.
पण यावेळी याआधीच चीन, युरोपमधून कोरोनाच्या बातम्यांनी जोर धरला. त्याआधीही बातम्या येत होत्याच, पण हा कोरोनाचा ब्रह्मराक्षस जागतिक होत जातोय, हे मात्र मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाणवलं. इटलीची गत बघून, सर्व सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला खूप हिरमोड झाला. पण जसजशा बातम्या कळत गेल्या, तस-तशी जाणीव झाली की, हे शहाणपणाचं आहे, गरजेचं आहे.
खरंतर भारतातील कंपन्यांनी आधी, इथं काम करणाऱ्या त्यांच्या कामगारांना Work from home सुरू केलं. मग अमेरिकन कंपन्यांनी तसे आदेश दिले. शाळांनीही मग घरबसल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून मुलांचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे आता ऑफिस व शाळा घरातूनच म्हणजे फारच गोंधळ उडतोय.

इथे अमेरिकेत अजूनही पूर्ण लॉकडाऊन केलेले नाही. WHO नी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार Social Distancing पाळलं जातं. त्यामुळे शाळा, आॅफिसेस, उद्योगधंदे, वाचनालयं, मॉल्स, मल्टीप्लेक्स, गेमझोन्स, बागा, जिम असं सर्व बंद आहे. हॉटेल्सना Home delivery किंवा Parcel ची परवानगी आहे, पण तिथं बसून खायला बंदी आहे.

सार्वजनिक वाहतूक म्हणजे बसेस, ट्रेन्स, हवाई वाहतूक असं सर्व सुरू आहे. येथील सामाजिक साक्षरता बऱ्यापैकी असल्यामुळे, प्रशासनाला खूप खबरदारी घ्यायची गरज वाटत नसावी. आणि तसाही हा मुख्यत्वे करून भांडवलशाही देश असल्याने, कारखाने, बाजारपेठ, दळणवळणाची साधने पूर्णपणे बंद करणे त्यांना पटत नसावं. पण त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची केंद्र असणाऱ्या, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि फ्लोरिडा सारख्या राज्यात, या आजाराने खूप धुमाकूळ घातला आणि आजतागायत जवळ जवळ सात लाख लोक संक्रमित झाले. 30 एप्रिलपर्यंत तरी शाळा, ऑफिसेस बंद आहेत. पण ही कालमर्यादा वाढण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला, ‘हा रोग मानवी स्पर्शातून पसरतो’ असे कळल्यावर, अमेरिकेमध्ये Personal Hygiene च्या वस्तू म्हणजे Tissue paper, Sanitizer, handwash, लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यास सुरुवात केली.या वस्तू बाजारातून नाहीशा होऊ लागल्या. त्यानंतर, ‘घरातून कमीत कमी बाहेर पडा’ असे निर्देश आल्यावर मात्र, लोकांची तारांबळ उडाली.आणि त्यांनी धास्तीने, ब्रेड, अंडी, सॉसेस, कणिक, तांदूळ अशा गोष्टीही मोठ्या प्रमाणात साठवून ठेवायला सुरुवात केली. पण एक आठवड्यात सर्व काही परत उपलब्ध होऊ लागलं.

आम्ही राहतो म्हणजे Greenville, South Carolina, या एकाच शहरात जवळपास 400 कोरोना रुग्ण आहेत. येथील शहर प्रशासन खूप सजग आहे. त्यांनी दोन आठवडे आधी पासून सर्व प्रतिबंधक पावले उचलण्यास सुरुवात केली आणि योग्य तेवढे नियमांचे पालन होईल अशी दक्षताही घेतली. पण न्यूयॉर्कची स्थिती बघता इथंही भीती वाटते.
अशातच येथील उद्योग बंद झाल्यामुळे Business खालावत जातोय आणि त्यामुळे कामावरून माणसे कमी केली जात आहेत. त्यामुळे काही लोकांपुढे आता ही सुद्धा एक समस्या उभी राहिली आहे. जागतिक मंदीची लक्षणे समोर दिसत असताना, आमच्यासारखी जी कुटुंबं नोकरीनिमित्त भारताबाहेर आहेत, त्यांच्यासमोर एक अनिश्चिततेचा काळ आहे.
पण इथंही भारतीय समाज एकीने, या संकटाला सामोरे जात आहे. अमेरिकेतील ठिकाणच्या भारतीयांना जी काही गरज पडेल, ती पुरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये भारतीय दुतावास सर्वात पुढे आहे.

लोकसंख्या जास्त आणि वैद्यकीय सुविधा मोजक्या असं असलं तरीही आपल्या भारतातील स्थिती खूपच चांगली आहे असं वाटतं. भारतीय जनतेने दाखवलेल्या एकीचा आणि संयमाचा अभिमान वाटतो.

या जागतिक संकटात ‘सर्वे सुखिनः सन्तु सर्वे संतु निरामय:’ ही देवाला प्रार्थना.

– शर्मिष्ठा गाडगीळ, अमेरिका

Leave a Reply