कोरोनाअनुभव भारताबाहेरचा

 

आमचे चार जणांचे कुटुंब. आम्ही सॅन फ्रान्सिस्को बे एरिया (कॅलिफोर्निया, यूएसए) येथे रहातो. मी आणि माझी पत्नी, दोघेही टेक उद्योगात इंजीनियर आहोत.
बाकी राज्याच्या २ आठवडे अगोदर आणि बाकी यूएसच्या ३ आठवडे अगोदर सॅन फ्रान्सिस्को बे एरिया ‘शेल्टर इन प्लेस’मध्ये गेला. बहुतेक कंपन्यांमध्ये आधीच म्हणजे अगदी जानेवारीपासून कोणत्या ना कोणत्या प्रकारची बंधने / स्वयंअलगीकरण (सेल्फ क्वारंटाइन) होते. त्यामुळे व्हायरसचा बे एरियातील प्रसार बाकी देशाच्या तुलनेत बऱ्यापैकी नियंत्रणात राहिलेला आहे.


‘शेल्टर इन प्लेस’ असणे म्हणजे अत्यावश्यक काम सोडून अन्य कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर पडू नये, असा सल्ला. पुढील कामांसाठी आम्हाला घराबाहेर पडण्याची अनुमती आहे
१. अत्यावश्यक गोष्टींची (अन्न, औषधे, वगैरे) खरेदी
२. व्यायाम (धावणे, चालणे, सायकल चालवणे, वगैरे)
३. तुमचे काम जर अत्यावश्यक मानले गेले असेल, तर कामावर जाणे (उदा, बँका, राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीतून महत्त्वाचे उद्योगधंदे).
हाय टेक क्षेत्रातील बहुतेक लोक (म्हणजे या शहरातले बहुसंख्य भारतीय लोक) घरूनच काम करत आहेत. सर्व शाळा बंद असल्याकारणाने आम्ही मुलांनादेखील आमचे काम चालू ठेवून घरूनच शिक्षण देत आहोत.
सार्वजनिक आणि खाजगी, दोन्ही शाळा मार्चपासून बंद आहेत. बहुतेक शाळांमध्ये कोणत्या ना कोणत्या पातळीवर ‘व्हर्चुअल’ शिक्षण होत आहे. झूम/गूगलच्या माध्यमातून शालेय वर्गाच्या वातावरणात शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्यामुळे शिक्षणावर अगदी कमी परिणाम झाला आहे. या भागातील शाळांकडे निधीचा तुटवडा नाही. त्यामुळे ज्यांना घरी इलेक्ट्रॉनिक साधने उपलब्ध नाहीत, अशा विद्यार्थ्यांना शाळाच आयपॅड, लॅपटॉप यांसारखी साधने मोफत वापरावयास देत आहे.
अन्न / किराणा यावर फारसा परिणाम झालेला नाही. खाद्यपदार्थांची सर्व मार्केट्स चालू आहेत आणि अंतर राखण्याचे नियम प्रचलित असून त्यांचे पालनही नीट होते आहे.
आणीबाणीच्या स्थितीत रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढेल आणि रुग्णालयात खाटांची मागणीही वाढेल, या अपेक्षेने रुग्णालयांना सुसज्ज ठेवण्यात आले होते. या घडीला सर्वोच्च क्षमतेची पातळी गाठली गेलेली नाही; मात्र वैद्यकीय कर्मचारीवर्गाला जादा काम करावे लागत आहे. आणीबाणीची स्थिती नसणाऱ्या वैद्यकीय दुखण्यांच्या बाबतीत डॉक्टर ‘व्हर्चुअल’ तपासणी करत आहेत जेणेकरून लोकांना रुग्णालयात यावे लागू नये. दात आणि तत्सम अपॉइंटमेंट्स रद्द करण्यात आल्या आहेत.


गरजूंना मदत करण्यासाठी पुष्कळ लोक पुढे येत आहेत. गरजू आणि वयस्क लोकांना पुरवण्यासाठी अन्नसाठा (फूडबँक्स) आणि स्वयंसेवक, दोन्हींची तयारी झाली आहे. तात्पुरत्या बंद पाळणाघरांमधील शिक्षकांचा पगार चालू राहावा म्हणून मुलं घरी असूनदेखील अनेक पालक महिन्याची फी भरत आहेत. अल्प उत्पन्न गटातील कामगारांकडून (सफाई करणाऱ्या बायका, माळी, वगैरे) सेवा मिळत नसूनसुद्धा बऱ्याच जणांनी त्यांना मेहनताना देणे चालू ठेवले आहे. ज्यांना भाडे भरणे परवडेनासे झाले आहे, त्यांना पुष्कळ बँकांनी मासिक भाडे माफ केले आहे. राज्य आणि केन्द्र शासनांकडून बेकार भत्ता दिला जात असून तो जगण्यासाठी पुरेसा आहे. नोकऱ्या जाण्याचे प्रमाण कधी नव्हते इतके मोठे असले तरी सेवाक्षेत्रातील बहुतेक नोकऱ्या अर्थव्यवस्था रुळांवर आल्यावर परत मिळतील, अशी अपेक्षा आहे.
बहुतेक राज्यांप्रमाणे येथेही सूचना अशाच आहेत की रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण २-३ आठवडे सतत कमी होत गेले की राज्यात पुनर्प्रारंभ(रिओपनिंग ) होऊ शकेल. (आवर्जून नोंद घ्यायला हवी की या बाबतीतला निकष लागण होण्याचे वा मृत्यूचे प्रमाण नसून रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण, हा आहे. यामागचे तर्कशास्त्र असे आहे की लागण होण्याची पातळी वा लागणीची तीव्रता मोजण्यासाठी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण हे, तपासणीच्या दरावर अवलंबून असणाऱ्या इतर निकषांपेक्षा खूप जास्त अचूक साधन आहे.) जूनमध्ये अंशत: गोष्टी सुरू होतील आणि २० ते ३०% कर्मचारी कामावर परततील, असा अंदाज आहे.
बहुतेक हाय टेक कंपन्यांमध्ये पुनर्प्रारंभानंतर आमूलाग्र बदल होऊ घातले आहेत किंवा तसे नियोजन आहे. यातील काही कृती:
१. आयआर कॅमेऱ्याच्या सहाय्याने दररोज तापमान नोंदणे
२. स्पर्शविरहीत तत्त्वावर चालणारे दरवाजे, नळाच्या तोट्या, वगैरे.
३. जास्त वर्दळीच्या जागांची वारंवार स्वच्छता
४. एकूण कामाची वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी करून आणि प्रत्येक गटाला वेगळ्या वेळी कामाला बोलावून कार्यकालाचे स्टॅगरिंग
५. बाहेरच्या पाहुण्यांना बंदी
६. मोठ्या संख्येने व्यक्ती सहभाग असलेल्या बैठकांऐवजी व्हर्चुअल बैठका
७. प्रत्येक कर्मचाऱ्याला फेसमास्क
इथे अत्यंत उच्च जागतिक स्तरावरील तपासणी केली जात असून कॅलिफोर्नियातली निर्णयप्रक्रिया ही बहुतांश डेटाआधारित असते.
ही पोस्ट बहुतांश माझ्या स्वत:च्या सीए बे एरियामधील अनुभवांवर आधारलेली आहे. यूएसमधील इतर ठिकाणांच्या, विशेषत: न्यूयॉर्कच्या बाबतीत ही माहिती प्रातिनिधिक मानली जाऊ नये.

–अजित बर्वे, कॅलिफोर्निया,अमेरिका

Leave a Reply