कोरोनाअनुभव भारताबाहेरचा

 

गेली सहा वर्ष मी शिक्षणासाठी रशियात आहे. इथल्या व्होल्गोग्राड युनिव्हर्सिटीत मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला आहे. पुढच्या महिन्यात आमची अंतीम परिक्षा आहे. बाकी युरोपियन देशांच्या मानानं, रशियात कोरोना प्रसारानं धोक्याची पातळी जरा उशिरानं गाठली. पण आज अमेरिकेच्या खालोखाल सर्वाधिक कोरोना रुग्ण रशियात आहेत. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून इथंही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. शाळा, कॉलेजं बंद करून ऑनलाईन क्लासेस सुरू झाले. वर्क फ्रॉम होमनं ऑफिसेस सुरू होती किंवा सरळ सुट्ट्या दिल्या गेल्या. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या मेसेजचे मिम्स, फोटोज आणि व्हिडिओज प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. आपल्याकडेही हे सर्व प्रसारमाध्यमांवर पोहचलं होतंच. तुम्हीही ते पाहिलं असेलच. पण इथल्या लोकांनी लॉकडाऊनला अजिबात गंभीरपणे घेतलं नाही. उलट लॉकडाऊन जाहीर झाल्यावर, नेहमीपेक्षा जास्त संख्येनं लोकं रस्त्यावर दिसू लागली. सध्या इथं स्प्रिंग सुरू आहे. त्याचा आनंद घेण्याकरता लोक फिरायला बाहेर पडू लागली. इथल्या लोकांना त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची बंधन नको असतात. ‘आम्हांला काही होणार नाही’ हा फाजील आत्मविश्वास इथल्या लोकांमध्ये दिसून येतो. इथले लोक टीबीला प्रचंड घाबरतात. अगदी पाच वर्षापूर्वी एखाद्याचा टीबी बरा झाला असेल तरीही, त्याच्यापासून लोक दूर पळतात. टीबी झालेल्या परदेशी नागरिकाला इथं प्रवेश नाही. स्थानिक नागरिकाला टीबी झाल्यास त्याच्याकरता शहराबाहेर वेगळी सरकारी सोय केली जाते.

कोरोनाचा धोका वाढू लागल्यामुळं लॉकडाऊन जाहीर झाला तरी, पोलिसांनाही लोकं जुमानत नव्हती. मास्क लावायला टाळाटाळ, सोशल डिसटन्स न पाळणं या बेफिकिर वृत्तीचे परिणाम लवकरच दिसू लागले. राजधानी मॉस्कोसोबतच सर्वच प्रांतांमध्ये एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना वेगानं पसरू लागला. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात मास्क आणि पीपीई किट उपलब्ध नाहीत. त्यामुळं प्रचंड मानसिक तणावात ते काम करत आहेत. लोकांच्या बेफिकिर वागण्याचे परिणाम आता जागोजागी दिसू लागलेत. त्यामुळं आता सरकारनं कडक निर्बंध लावायला सुरू केलंय. 20 मे पासून सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग न पाळणं आणि मास्कचा वापर न करणाऱ्या लोकांकडून तीस हजार रुबेल्सचा दंड वसूल करायला लागलेत. सुपरमार्केटमध्ये हँड सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचं कडक पालन सुरूवातीपासूनच करण्यात येतंय.


रशियात सर्वच मेडिकल युनिव्हर्सिटीजमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. माझ्या युनिव्हर्सिटीत आम्ही फायनल इयरला 80 भारतीय विद्यार्थी आहोत. महाराष्ट्रातले दोनशेहून अधिक विद्यार्थी माझ्या युनिव्हर्सिटीत मेडिकलचं शिक्षण घेत आहेत. मार्च महिन्यातच युनिव्हर्सिटीनं कॉलेज बंद करून ऑनलाईन क्लासेस सुरू केले. सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत युनिव्हर्सिटीचे ऑनलाईन क्लासेस असतात. रशियात एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना भारतात प्रॅक्टिस करण्याकरता, भारतात येऊन पुन्हा परिक्षा द्यावी लागते. त्या परिक्षेचीही तयारी सुरू आहे. त्याचेही ऑनलाईन क्लासेस संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत असतात. उरलेल्या वेळेत अभ्यास आणि पटकन जेवण बनवून पोटात ढकलतो. त्यामुळं माझा दिवस तसा बिझीच असतो. पण त्यातूनही वेळ काढून मी कोरोनाचे अपडेटस् घेत असतो. वेगवेगळ्या देशांमधला, आपल्या देशाचा ग्राफ, चाचण्या आणि व्हॅक्सिन्स याच्यासोबतच सामाजिक-वैद्यकीय संशोधन आणि दृष्टीकोन जाणून घेत असतो. घरच्यांशी दिवसातून एकदा बोलतो. मी सुखरूप असल्याचा त्यांना विश्वास देतो.
आवश्यक ते सामान आणण्यासाठी आम्ही आठवड्यातून एकदाच हॉस्टेलच्या बाहेर जाऊ शकतो. त्याकरता आम्हांला विशेष परवानगी काढावी लागते. आमचं आय कार्ड ऑफिसमध्ये जमा करून, दिलेल्या वेळेतच आम्ही बाहेर जाऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे युनिव्हर्सिटीचं परवानगी पत्र आम्हांला जवळ ठेवावं लागतं. या पत्रात आम्ही कोणत्या कारणासाठी बाहेर आलो आहोत आणि कोणत्या ठिकाणी जात आहोत याचा उल्लेख असतो. शक्यतो एकावेळी एकानेच बाहेर जावं. पण जास्तीत जास्त तीन जणांना परवानगी देण्यात येते. कोरोनाच्या आधी आम्ही कधीही कितीही वाजता हॉस्टेल बाहेर जाऊ शकत होतो. याकरता परवानगीपत्राची गरज नव्हती. सुपरमार्केटमध्ये सर्व सामान उपलब्ध आहे. सामान मिळत नाही असं काही झालं नाही. माझ्या हॉस्टेल बिल्डींगमध्ये इतर देशातले विद्यार्थीही आहेत. पण माझ्या मजल्यावर आम्ही आठही जण भारतीय आहोत. एका खोलीत दोन जण राहतात. हाऊसकिपिंग स्टाफ येऊन रोजच्या रोज हॉस्टेलची प्रत्येक खोली स्वच्छ करतात. आमचं किचन कॉमन आहे. आठ गॅस बर्नर्स आहेत. प्रत्येक जण आपापल्या सवडीनुसार जेवण बनवतो.
आम्हा सर्व भारतीय आणि महाराष्ट्रीय मुलांचांही इथं ग्रुप आहे. काही विद्यार्थी युनिव्हर्सिटी हॉस्टेलमध्ये राहतात तर काही पीजीमध्ये राहतात. या ग्रुपवर आमचं बोलणं सुरू असतं. पुढच्या महिन्यात सर्वच वर्षांच्या ‘फायनल एक्झाम’ आहेत. परिक्षा झाल्या की, सर्व विद्यार्थी दोन महिने सुट्टीकरता मायदेशी जातात. पण यंदा पहिल्या ते चौथ्या वर्षाच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी इथचं थांबण्याचा निर्णय घेतला आहे. कारण या साथीमध्ये एवढा लांबचा प्रवास करून धोका पत्करायचा का? हा मुद्दा आहेच. शिवाय भारत सरकारच्या ‘मिशन वंदे मातरम’मधील विमान तिकिटाचे दर विद्यार्थ्यांना परवडणारे नाहीत. त्यासोबतच भारतात आल्यावर ‘इंस्टिट्युशनल क्वारंटाईन आणि तपासणीचा खर्च’ हे सर्वच आवाक्याबाहेरचं आहे. त्यामुळे नियमांचं पालन करत रशियातचं राहणं हे सुरक्षित आणि सोयीचं आहे, असं त्यांना वाटतं. आमच्या परिक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाईनच घेण्यात येणार आहेत. माझी परिक्षा 2 जुलैला संपतेय. रशियातल्या सर्वच मेडिकल युनिव्हर्सिटीच्या परिक्षा याच दरम्यान आटोपतील. शेवटच्या वर्षात असणाऱ्या माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचा विजा संपणार. पुढचं चित्र अजून स्पष्ट नाही. त्यावेळच्या परिस्थितीनुसार कदाचित युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये राहता येईलही. त्यामुळं सध्या तरी अभ्यास करणं आणि योग्य ती खबरदारी घेणं हेच आम्ही करतोय.

– प्रणव संजय राव
व्होल्गोग्राड मेडिकल युनिव्हर्सिटी, रशिया

Leave a Reply