कोरोनाअनुभव भारताबाहेरचा

 

मी अमेरिकेत Connecticut राज्याच्या Bridgeport शहरात तीन वर्षांपासून राहते आहे. University of Bridgeport मध्ये MS in Clinical and Mental Health Counseling करून आता Life Bridge Community Services या non profit hospital मध्ये mental health therapist म्हणून काम करत आहे.
यावर्षी जानेवारीत मी भारतात सुट्टीसाठी आले होते. माझ्या परतीच्या प्रवासात check-in करताना मला बरेच प्रश्न विचारले गेले माझ्या लगेजबाबत, कोणी बॅग भरल्या, काय काय आहे त्यात? लगेज बद्दल अगदी check-in ला असे आणि इतके खोलात प्रश्न विचारायचे पहिल्यांदाच झाले. अमेरिकेत उतरल्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात immigration staff कडून. कुठे जात आहात, कशासाठी आला आहात, कोणी ओळखीचं आहे का अमेरिकेत इ. पण या वेळेला एकच प्रश्न विचारला “तुम्ही इतक्यात चीन मध्ये गेला होतात का?” प्रवासाच्या सुरुवातीला जे वेगळे वाटत होते, त्याची लिंक आत्ता लागली होती. Covid १९ च्या साथीमुळे असे प्रश्न विचारले गेले होते.


मी परत अमेरिकेत पोहोचले तेव्हा, नुकतेच Covid १९ चे रुग्ण वाढायला लागले होते. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये ही सोशल distancing पाळायला सुरूवात झाली होती. येणाऱ्या लोकांशी थेट संबंध येत असल्यामुळे, अमेरिकेत परत गेल्याच्या महिन्याभरातच हॉस्पिटल बंद झालं. पुन्हा कधी सुरू होणार, आधी १ एप्रिल आणि मग १ मे तारीख करण्यात आली. बरं या १ महिन्याच्या काळात सगळ्याच कामगारांना furlough केले. हा अनुभव माझ्यासाठी नवीनच असल्यामुळे मी एकदम घाबरून गेले. एक महिना काम नाही, पगार नाही आणि नुकतंच भारतातून परतल्यामुळे शिल्लक ही नाही. अश्या परिस्थितीत आपण किती वेळ राहू शकू आणि कसं राहायचं असा प्रश्न होता. न्यू यॉर्क, न्यू जर्सी , Bridgeport हून २ तासांच्या अंतरावर आहे. बातम्यांमध्ये न्यू यॉर्क, न्यू जर्सीचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत हे बघत होतो. त्यामुळे अजून थोडी भीती वाटत होती. पण ओळखीच्या कुठल्या लोकांना कोरोना नसल्यामुळे हा रोग खरंच आहे का, असा प्रश्न पडायला लागला. मला इथं बरेच मल्याळी मित्र-मैत्रिणी आहेत. एकाची आई जवळच्या हॉस्पिटल मध्ये काम करते. त्यांच्याकडून कळले की हा रोग आहे आणि तो लवकर पसरत आहे. माझ्या कामात रुग्णांशी direct interaction भरपूर असते, त्यामुळे पुन्हा कामाचा विचार आला की आपलं काम कधी आणि कसं सुरू होणार?
इथं लॉकडाऊन १५ मार्चला सुरू झाला. भारतासारखं फक्त धान्य आणि औषधांची दुकानं सुरू रहायला परवानगी दिली होती. दुकानात जाताना, ग्लोव्हज आणि मास्क हे जरुरी असते. लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा आम्ही दोन महिन्याचं सामान साठवून ठेवलं होतं. त्यामुळे खाण्याचा प्रश्न नव्हता. आता इथं उन्हाळा सुरू झाला आहे. आम्ही थोडा बदल म्हणून बाहेर गेलो, तेव्हा उन्हाळ्यामुळे भरपूर लोकं, बागेत आणि beaches वर दिसले, त्यामुळे लोकं लॉकडाऊन इतकं गांभीर्याने घेत नाहीत असं दिसलं. मास्क आणि ग्लोव्हज फक्त दुकानापुरतेच मर्यादित ठेवले. बाकी फिरताना हे वापरायचे गांभीर्य दिसत नाही. जशी काही सगळी परिस्थितीत नॉर्मल झालीये.
लॉकडाऊन सुरू असताना, बाकी माझ्या रूममेट्सना work from home होते. मला काहीच काम नसल्याने मी त्यांना वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालायची. मला नृत्याची अतिशय आवड असल्यामुळे एरवी नृत्यासाठी वेळ देता येत नव्हता. लॉकडाऊनच्या रिकाम्या वेळात मला नृत्यासाठी भरपूर वेळ मिळाला. रुममेट्सच्या मदतीने मी काही डान्स व्हिडिओही बनवले. इथल्या भारतीय community कार्यक्रमांमध्ये काही नृत्याचे कार्यक्रम केले होते. त्यामुळे काही लोकांनी त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी ही विचारलं. मग ऑनलाईन क्लास ही घेण्याचा प्रयत्न केला. पण आता माझा जॉब परत सुरू झाला आहे. आम्ही telehealth द्वारे रुग्ण बघत आहोत. काम पुन्हा सुरू झाल्यावर लक्षात आलंय, हा लॉकडाऊन जरी लोकांच्या भल्यासाठी असला, तरी त्याचे वेगळे प्रॉब्लेम दिसून येत आहेत. लॉकडाऊन मुळे लोकं घरी आहेत. बेकारी वाढली आहे आणि work from home मुळे ऑफिस आणि घरचे काम यांची सरमिसळ झालेली दिसून येते, घरच्यांसोबत २४ तास पटवून कसं घ्यायचं हा ही एक प्रश्न झाला आहे. त्यामुळे नात्यांवर ताण येतो आहे. यामुळे नैराश्य अजून वाढलेलं दिसून येतं. सध्या अश्या रुग्णांना त्वरित मदत करणे हेच आमच्या हॉस्पिटलचं प्राथमिक उद्दिष्ट आहे.
तुम्हीही स्वतः आवडीच्या छंदात तुमचा वेळ घालवा म्हणजे तुमचं नैराश्य कमी होईल.
– श्रद्धा कुलकर्णी, अमेरिका

Leave a Reply