कोरोनाअनुभव भारताबाहेरचा

 

मी बर्लिनमध्ये राहते. 11 मार्चपासून, म्हणजे आता दोन महिने होऊन गेले, सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊन—आधी स्वतःहून पाळलेला आणि मग जर्मन सरकारने जाहीर केलेला—चालू आहे. मार्चच्या सुरुवातीला, जेव्हा कोरोना व्हायरसचं गांभीर्य दिसायला लागलं होतं, इटलीमधली परिस्थिती खालावत चालली होती, आणि जर्मनीही त्याच्या तडाख्यातून सुटणार नाही हे स्पष्ट झालं होतं, तेव्हा सरकारकडून काही ऑफिशियल निर्णय येण्याची वाट न बघता बर्लिनमधल्या काही कंपन्यांनी आपणहून वर्क-फ्रॉम-होम सुरू केलं माझी कंपनी, बॅबल, त्यांच्यापैकी एक. (बॅबल हे मोबाईलवर किंवा कंप्युटरवर नवीन भाषा शिकण्यासाठीचं ॲप आहे). लागोपाठच काही दिवसात ऑफिशियली लॉकडाऊन जाहीर झाला, अगदी गरजेच्या सोडून बहुतेक सगळ्या गोष्टी बंद झाल्या आणि इथल्या ‘न्यू नॉर्मल‘ला सुरुवात झाली.

माझ्या कंपनीमध्ये बरेच लोक माझ्यासारखेच बाहेरच्या देशातून आलेले आहेत. बहुतेकांना जर्मन येत नाही, किंवा आली तर अगदी जेमतेम. क्लिष्ट जर्मनमधले सरकारी आदेश वगैरे आमच्यासाठी अगम्यच. त्यामुळे आम्हाला गरजेची माहिती कळत राहावी यासाठी आमची कंपनी दर आठवड्याला कोरोना संदर्भातल्या ताज्या घडमोडींचा एक अपडेट पाठवायला लागलीये. घरून काम करणं त्यातल्या त्यात सोयीचं व्हावं, या काळात मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळता यावं, यासाठीही बॅबल आम्हाला सपोर्ट करतंय, मग त्यात एखाद्या फिटनेस ॲपची मेंबरशिप किंवा ‘होम ऑफिस’ सेटअप करण्यासाठी अमेझॉन व्हाउचर्स देणं आलं, आमचं मन थोडंसं रिझवावं म्हणून काही व्हर्च्युअल खेळ, कार्यक्रम योजणं आलं, आणि आम्हाला धीर द्यायला दर आठवड्याला आमच्या सीईओने एक व्हिडीओ मेसेज पाठवणं आलं.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑफिसमधली माझी मस्त टीम—आम्ही सगळे एकमेकांना खूप सांभाळून घेतोय. ऑफिसमधे सहज होणाऱ्या इन्फॉर्मल गप्पा आता बंद झाल्यामुळे आम्ही व्हर्च्युअल कॉफी ब्रेक्स, लंचेस वगैरे एकत्र घेतो. कधी फारच अस्वस्थ वाटत असेल तर उत्स्फूर्तपणे कोणाला तरी मेसेज करून थोडा वेळ एकमेकांशी बोलतो. एकमेकांना सतत आठवण करत असतो, मध्ये मध्ये ब्रेक घे, संध्याकाळी वेळेवर दिवस संपव, उशिरापर्यंत काम करत बसू नकोस, बरं वाटत नसेल तर (अगदी मानसिक त्रास होत असेल तरी) अट्टाहासाने काम करू नकोस, लागेल तेवढी विश्रांती घे, वगैरे वगैरे. रोज कोणीतरी विनोदी GIFs पाठवतं, किंवा आपल्या गोंडस मांजरीचे, कुत्र्याचे किंवा सशाचे (हो, सशाचे!) फोटो पाठवतं. थोडंसं का होईना, ओझं हलकं होतं.

अर्थातच सगळं परफेक्ट नाहीये. इतरांचा कितीही आधार असला तरी प्रत्यक्षात आठ तास अखंड स्क्रीन समोर बसून असायचं, समोरच्याशी संवाद फक्त आणि फक्त व्हिडीओ कॉल वरून—मग तो कामाचा असू दे किंवा वैयक्तिक, कामाचा आठवडा आणि वीकेंड यात काहीच फरक नाही, अशा अनेक गोष्टींचा ताण आहेच. परिस्थिती कधी बदलणार याबद्दलची अनिश्चितता, भारतातल्या बातम्या वाचून-ऐकून वाटणारी काळजी, हेही आहेच.

तरी सुरुवातीला त्याच्या जोडीला सुपरमार्केटमध्ये रोजच्या गरजेचं सामान न मिळणं, कडक सोशल डिस्टन्सिंग असल्यामुळे आणि मी एकटी रहात असल्यामुळे सुपरमार्केटमधल्या कॅशियरशिवाय कोणत्याच हाडामासाच्या माणसाशी प्रत्यक्ष बोलायलाच न मिळणं, आणि अर्थातच कोरोनाचे अखंड वाढते आकडे याही गोष्टींचा त्रास होत होता. आता निदान जर्मनीमधे तरी त्यात सुधारणा होते आहे. आणि काळजी करणं थांबवता येत नसलं तरी घरच्यांच्या संपर्कात असल्यामुळे, व्हिडीओ कॉलवर रेग्युलरली बोलणं होत असल्यामुळे तेवढं तरी समाधान आहे.

7-8 आठवड्यांच्या बऱ्यापैकी कडक लॉक डाऊननंतर आता परिस्थिती जरा निवळायला लागलीये असं दिसतंय. नवीन इन्फेक्शन्सचं प्रमाण आणि ‘आर नंबर‘ आटोक्यात, धोक्याच्या पातळीच्या खाली आलाय. त्यामुळे शुक्रवारपासून रेस्टॉरंट्स, बऱ्याच प्रकारची दुकानं, चर्चेस आणि अजून काही गोष्टी उघडायला लागल्या आहेत. अर्थातच अंतर ठेवून, मास्क लावून वगैरे. काळजीचं कारण कमी झालं असलं तरी निष्काळजीपणे वागायला नको, अशा अर्थाचं आवाहन जर्मन चॅन्सेलर ॲंगेला मर्केल यांनी सगळ्या नागरिकांना केलंय. असं वाटतंय की परिस्थिती अगदी लगेच पहिल्यासारखी होणार नसेल तरी आता निदान त्या दिशेने जायला लागलोय हळूहळू. पाॅझिटिव्ह राहायचा, मनाने आणि शरीराने फिट राहायचा प्रयत्न आहेच.

शेवटी मला मिळालेला एक सल्ला शेअर करावासा वाटतोय – सध्याची परिस्थिती अभतपूर्व आहे. तिचा सामना करायला कठीण जाणं, ताण येणं, त्रास होणं, हे अगदीच साहजिक आहे. सकारात्मक न राहता येणं हेही स्वाभाविक आहे. त्यामुळे, It is ok to not be ok. Be kind to yourself, be easy on yourself. I am trying to 🙂
– मुक्ता परांजपे, बर्लिन

Leave a Reply