कोरोनाअनुभव भारताबाहेरचा

 

आम्ही लंडन येथील हॕरो या भागात रहातो. भारताप्रमाणे इकडे देखील २५ मार्चला सगळं बंद झालं. इकडे बहुतेक सर्व जण शुक्रवारी घरातून काम करतात. आम्ही पण १६ मार्चला घरातून काम करायला सुरूवात केली. ‘Work from home’ ही concept इथं रूळली असल्यामुळे सगळ्यांना काम करणं एवढं जड गेलं नाही.
इथं National Health Services (NHS) नावाची सरकारी आरोग्य सुविधा आहे. ह्या संस्थेमधील कर्मचाऱ्यांना कोविड19 मुळे कामाचा खूप ताण आला आहे. सर्व लहानग्यांनी NHS चे आभार मानण्यासाठी इंद्रधनुष्याची चित्रे खिडकीत लावली आहेत. दर गुरूवारी संध्याकाळी आठ वाजता NHS ला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही टाळ्या वाजवतो. NHS च्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी शाळा छोट्या प्रमाणात चालू आहेत. शिक्षक / शिक्षिका आळीपाळीने शाळेत येतात.


इतर मुलांसाठी शाळेने प्रत्येक तासाचा अभ्यास वेबसाईटवर दिलेला असतो. ज्या मुलांनी सर्व अभ्यास पूर्ण केलाय, त्यांना online rewards दिले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही हुरुप येतो. शाळेत शिस्त असली तरी शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुवतीप्रमाणे त्यांना प्रोत्साहन देतात. त्यामुळे मुलं शाळेत जायला उत्सुक असतात. शालेय अभ्यासक्रमात संगीत, खेळ, ध्यान, mindfulness यांचा समावेश आवर्जून असतो. अवांतर वाचनावर आणि उस्फूर्त लिखाणावरही भर देतात. थोडक्यात पुढील पिढीतून लेखक निर्माण करण्याची तयारी पध्दतशीरपणे लहानवयापासून केली जाते. शाळेत एकूण तीन सत्रं असतात. प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यांकडून अन्नधान्य आणि जीवनावश्यक गोष्टी मागवल्या जातात. ह्या वस्तूंचे दान अनाथालयं, समाजातील गरीब कुटुंबाना केले जाते.

इथे वर्षातील सहा ते आठ महिने थंडी असते. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी सगळ्यांना घरी रहाण्याची सवय सगळ्यांना आहे. घरातील कामं सगळ्यांच्यात वाटलेली असल्याने कोणा एकावर भार येत नाही. Online learning वर आपोआपच भर दिला जातो. सध्या माझे यजमान दर आठवड्याला एकदा बाहेर जाऊन भाज्या, दूध, फळे आणतात.
इथं व्यायाम, योगासने आणि ध्यान यांचा समावेश येथील कित्येकांच्या जीवनात आढळतो, त्यामुळे वेळ कसा घालावावा हा प्रश्न उद्भवत नाही.

मला वाटतं की, ह्या काळात आपला अवांतर खर्च वाचल्यामुळे ती रक्कम PM care किंवा इतर सामाजिक संस्थाना द्यावी. आपल्या घरात काम करायला येणाऱ्या बायकांना शक्य असेल तितकी मदत करावी; किमान ह्या महिन्याचा पगार तरी कापू नये.

हा काळ आनंदात घालवण्यासाठी काही टिप्स –
१. आपल्याकडे एवढे संत वाङमय आहे की एखादा तरी ग्रंथ निवडून त्याचा अभ्यास सुरू करावा.
२. दररोज (आपण आणि मुलांनी ) एक तरी नवीन गोष्ट शिकावी.
३. जर वाचायला वेळ नसेल तर facebook / youtube वर lectures असतात त्यांचा लाभ घ्यावा. उदा. – Tejgyan Foundation, Brahma Kumaris, Isha Foundation, Vedanta Society.
ही sessions आपण इतर कामे करताना ऐकू शकतो. त्यामुळे कामाचा ताणही जाणवणार नाही.
४. मुलांसाठी ”अमर चित्र कथा” online version (३५०+ गोष्टी) उपलब्ध आहे, त्याचा जरुर लाभ घ्यावा.
५. मुलांबरोबर त्यांचे खेळ खेळावेत.
६. शाळेतील मित्रमैत्रिणी / नातेवाईक ह्यांच्याशी फोनवरून, व्हिडिओ कॉलवरून संपर्कात यावे.
७. आपले छंद जोपासावेत.

– मीरा खटावकर-इनामदार, लंडन

Leave a Reply