“कोरोनाकाळातली ही गोष्ट. तारीख, वार आठवत नाही पण एका रात्री रुग्णालयात प्रसव कळा सुरु झालेली एक महिला आली. बाळाचे ठोके ६० पर्यंत खाली आलेले. आई आणि बाळाच्या जीवाला धोका. त्यातून ती महिला कोरोना बाधित. तिचं कुटुंब या रुग्णालयातून त्या रुग्णालयात तिला घेऊन फिरत होतं. पण कुणीच दाखल करून घेत नव्हतं. शेवटी मी हिम्मत केली आणि त्या मातेची प्रसूती सुखरूप केली”, असं डॉ वैशाली सांगतात. डॉ. वैशाली पाटील धुळ्यातल्या हिरे वैद्यकिय महाविद्यालयात स्त्रीरोगतज्ञ आहेत.
त्या सांगतात, “कोरोनाकाळात गर्भवती महिलांची तपासणी अनेक ठिकाणी वेळेवर झाली नाही. त्यामुळे महिलांमध्ये रक्त कमी असल्याची समस्या सर्वाधिक जाणवली. एक महिला आधीचं सिझरिन झालेली, गर्भाशयात पाण्याची कमतरता, त्यात न्यूमोनियाची लागण झालेली, अश्या स्थितीत आधीचे टाके फाटण्याची भीती, या महिलेचे आणि तिच्या बाळाचे भविष्य कसे असेल असा विचार करीत मी तिच्यावर उपचार सुरु केले आणि तिची प्रसूती सुखरूप केली.”
डॉ.वैशाली यांचे कोरोनाकाळातील असे कित्येक अनुभव अंगावर शहारे आणणारे आहेत. तब्बल ३०० पेक्षा अधिक प्रसूती एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात त्यांनी सुखरूप पार पाडल्या आहेत. यात १७ कोरोना बाधित गर्भवती महिलांचा समावेश होता. विशेष म्हणजे डॉ. वैशाली यांचं दोन वर्षांचं बाळ सासू सासऱ्यांकडे सोपवून त्या गेले सात महिने दवाखान्यात हजर आहेत. वैशाली म्हणाल्या, “पती डॉ.मिलिंद आणि मी रुग्णालयातील एक रूम राहण्यासाठी आम्ही निवडली. त्यातच कोरोनाकाळात आम्ही राहिलो. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात तर झोपही व्यवस्थित होत नव्हती. मात्र कठीण काळात केलेल्या रुग्ण सेवेचे समाधान आहे.”
– कावेरी परदेशी, धुळे
#नवीउमेद
@Prashant Pardeshi