कोरोनाकाळातील सिव्हीलच्या देवदूत
रत्नागिरीचं सिव्हिल हॉस्पीटल. कोरोनाकाळात खाजगी हॉस्पीटल बंद होती. त्यावेळी ताण वाढला तो जिल्हा शासकीय रूग्णालयातला. एकीकडे हे रुग्णालय कोविड सेंटर म्हणून जाहीर झालेलं. इथल्या प्रसूती विभागात गरोदर मातांची संख्या दररोज वाढत होती. अनेक गरोदर स्त्रियांना कोरोनाची लागण झालेली असतानाही त्यांच्यावर योग्य उपचार केले ते इथल्या डॉ.शुभांगी बेडेकर आणि त्यांच्या टीमने. कोरोनाकाळात त्यांनी एकूण 1800 प्रसूती केल्या. सुरूवातीच्या काळात जवळपास 100 नवजात बाळांना कोरोनाची लागण झालेली होती.
गेल्या तीन वर्षांपासून वर्षांपासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून डॉ. शुभांगी काम करत आहेत. एकीकडे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची कमतरता असताना त्यांनी कर्तृत्वाने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कोरोनाकाळात प्रसूती विभागात सेवा बजावताना डॉ शुभांगी यांना त्यांच्या लहानग्या बाळासह पूर्ण कुटुंबालाच कोरोनाची लागण झाली होती. तरी त्या खचल्या नाहीत, खंबीरपणे कोरोनावर मात करून पुन्हा रुग्णांच्या सेवेत दाखल झाल्या.
अती जोखमीची प्रसूती, Laparoscopy द्वारे गर्भाशयाची शस्त्रक्रिया याबरोबरच त्यांनी सिव्हीलमध्ये जुळी, तिळी असलेल्या नॉर्मल प्रसूती, आधीच्या सिजरनंतर नॉर्मल प्रसूती, complicated प्रसूती केल्या आहेत. कुटुंब नियोजनावर, किशोरवयीन मुलींना खास मार्गदर्शन करण्याचे काम त्या करतात. आकाशवाणीवर प्रसूतीशी निगडित विषयावर अनेक वेळा त्यांनी संवाद साधला आहे.

Leave a Reply