कोरोनामुळे कॉलेज बंद पण काम सुरू

कोकण कृषी विद्यापीठात बीएससी अग्री चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत असलेली सुजाता पवार. मूळची नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील भऊर इथल्या प्रकाश पवार यांची कन्या. कोरोना साथीमुळे शाळा-कॉलेज बंद झाली म्हणून ती गावी परत आली.
गावी आल्यावर काय करायचं याचा विचार करत तिने गावातील महिलांना मोफत गृहउद्योगाचे धडे द्यायला सुरूवात केली. एकीकडे काकांकडून शेतीविषयक अधिकाधिक माहिती जाणून घेणं सुरू ठेवलं. आजोबा शिवाजी पवार यांच्याकडून लहानपणीच सुजाताला शेतीचं बाळकडू मिळालं. माती परिक्षण का करावं, माती परिक्षणासाठी नमुना कसा घ्यावा, त्याचे फायदे काय? शेतात विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व त्यामुळे होणारे फायदे या बाबत शेतकऱ्यांना ती माहिती देत आहे.


सुजाता सांगते, “ग्रामीण जागरूकता कार्य अनुभव(RAWE) हा विषय आम्हाला चौथ्या वर्षामध्ये आहे. शेतात कुटुंबियांसमवेत काम, त्यांच्या अडचणी ओळखण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यासाठी, त्यांचे रोजगार आणि कौशल्य सुनिश्चित करण्यासाठी उद्योजकता वाढवणे हे प्रमुख उद्देश आहेत. या गोष्टी कोरोनाच्या कारणास्तव फक्त कागदावर राहू नये म्हणून व आपल्या परिसरातील महिलांच्या हाताला भविष्यात रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने मी हे मोफत प्रशिक्षण सुरू केलं आहे.”

परिसरातील महिलांना आंब्यापासून जॅम, आंबा पोळी, आमचूर, सिरप, स्क्वॅश, लोणचं असं विविध पदार्थ तयार करणे, पनीर तयार करणे, अशा विविध गोष्टी शिकवत आहे. या गोष्टी दीर्घकाळ टिकणाऱ्या असल्याने यांचा फक्त घरापुरता उपयोग न करता विविध खाद्यपदार्थ निर्मिती व विक्री याची शिकवण ती देत आहे. शिवाय ह्याच लघुउद्योगांमागील अर्थकारणही ती समजून सांगत असल्याने हातावर पोट असलेल्या महिलांना वेगळी वाट मिळण्याची शक्यता आहे.

भऊरइथल्या सोनाली निकम म्हणाल्या, “काही दिवसांपासून सुजाता आम्हाला दीर्घकाळ टिकणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थाबाबत माहिती देत असून ते तयार कसे करावे याचं प्रात्यक्षिक करून दाखवत आहे. या गोष्टीमुळे भविष्यात आम्ही शेती सोबत जोडधंदा म्हणून काही पदार्थ तयार करून बाजारात त्याची विक्री करून छोटा -मोठा व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो.”

– प्राची उन्मेष, देवळा, नाशिक

Leave a Reply