कोरोनाला गावाबाहेरच रोखणारं भडंगवाडी

 

बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातलं भडंगवाडी. मादळमोहीपासून दोन किलोमीटर अंतरावरचं हे गाव. भडंगवाडीत२५० कुटुंब. या गावातल्या कोणालाही कोरोना झाला नाही. जिल्हा परिषदेच्या झिरो डेथ मिशनअंतर्गत आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांनी दोन वेळा सर्वेक्षण केलं.
गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात झाली तेव्हाच एकजुटीनं त्याचा प्रतिबंध करण्याचं गावकऱ्यांनी ठरवलं. त्यासाठी ग्रामपंचायतीनं तरुणांच्या टास्क फोर्सची स्थापना केली. सरंपच ज्ञानेश्वर नवले यांनी गावकऱ्यांना या संसर्गाविषयी सजग केलं. आत्ताही घराेघरी दोन हजार मास्क, सॅनीटायझर वाटले. दहा दिवसातून एकदा फवारणी.
”पाण्यासाठी गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली.” सरपंच नवले सांगत होते. ”आठ महिन्यांपूर्वी पाणीपुरवठा योजना सुरू केली. त्यामुळे आता घरी नळ आहेत.”


बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला गावात प्रवेश नाही. गावकरीही सहसा गावाबाहेर जात नाहीत. मास्क वापरतात. इथला मुख्य व्यवसाय शेती. त्यामुळे अन्नधान्य, भाजीपाला गावातच उपलब्ध. मादळमोही बाजारपेठेत जायची वेळ आलीच तर गावकरी, जास्त लोक असलेल्या ठिकाणी जात नाहीत. परस्परांमध्ये अंतर राखण्याच्या, स्वच्छतेच्या नियमांचं पालन करतात.
”सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रम पूर्णपणे बंद.” ग्रामसेवक विनोद निंबाळकर सांगतात. ”देवीची यात्राही रद्द केली. गेल्या पाच महिन्यात तीन लग्न झाली. पण उपस्थिती फक्त १५ जणांचीच.”
७०% गावकऱ्यांची लसीची पहिली मात्रा घेऊन झाली आहे. गावातल्या सर्वांनीच नियमांचं काटेकोर पालन केल्यानं कोरोनाला रोखणं शक्य झालं आहे.

-दिनेश लिंबेकर,ता. गेवराई, जि. बीड

Leave a Reply