कोरोना असूदे की इतर कुठलं संकट आम्ही शेतकरी नेहमी तुमच्या पाठीशी

 

‘‘शेतकरी दाता आहे. तो स्वतः उपाशी राहील पण इतरांची भूक भागवेल. त्याला निसर्गानेच तेवढे दातृत्व दिलंय. लॉकडाऊनच्या संकटात आम्ही आमची जबाबदारी पार पाडली…’’ वयाची साठी गाठलेले आणि कांदा बीजोत्पादनात संशोधन केलेले कृषिभूषण बाबासाहेब पिसोरे सांगत होते. नगरहून मराठवाड्यात जाणाऱ्यांना त्यांनी जेवण दिलं. रोज तीनशे लोक जेवायचे.


ब्राह्मणीचा तरुण शेतकरी सचिन ठुबे सांगत होता, ‘‘भीती प्रत्येकालाच असते. पण लॉकडाऊनमध्ये लोकांची गरज भागवायची होती. त्यामुळे नफातोटा न बघता राहुरीच्या बाजारात भाजीपाला विकला.”
जामखेड तालुक्यातील शिऊरच्या शेतकऱ्याने आपली पेरूची बाग लोकांसाठी खुली केली.
शेतकरी कुटंबातला साईनाथ घोरपडे हा उमदा तरुण. रोजगारासाठी शहरात स्थायिक झाला. त्याने संकटकाळात शिवभोजनच्या माध्यमातून अनेकांची सोय केली.


संपूर्ण शेतकरी गटाच्या माध्यमातून ज्योती भापकर, संतोष भापकर सेंद्रीय भाजीपाला विकतात. त्यांनीही नफातोट्याचा विचार न करता भाजीपाला पुरवला.
नेवाशा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ‘शेतात या, ना नफा ना तोटा या तत्वावर हवे ती फळे न्या’ अशी ऑफर दिली.
कोरोनाची भीती बाजूला सारून लोकांसाठी काम करणाऱ्या शेतकऱ्यांची अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील. कोरोनाच्या संकटामुळे मजूर, गरीब कुटुंबांचं जगणं अवघड झालं. रोजगार बंद झाला. रोजच्या जगण्याची भ्रांत पडली. मजुरांच्या राहण्याजेवणाची सोय करायला, गोरगरीब, विकलांग, मनोरुग्ण, भिकाऱ्यांना अन्नाची पाकिटं वाटायला शेतकऱ्यांची पोरंच पुढे होती.
खरं तर कोरोनाच काय कोणतंही संकट असो त्याचा पहिला घाव शेती आणि शेतकऱ्यांवरच पडतो. अनेक शेतकऱ्यांना धान्य, फळे, भाजीपाला पुरवठा करताना संसर्ग झाला. आर्थिक नुकसान झालं. मानसिक त्रास झाला. शेतमाल विकता आला नाही, खतं-बियाण्यांचा तुटवडा पडला, कर्ज मिळत नाही, बियाणं उगवून आलं नाही… अशी संकटांची मालिकाच शेतकऱ्यांच्या पाठीशी लागली आहे.
सध्याच्या काळात डॉक्टर,पोलीस यांच्यासह अत्यावश्यक सेवेतले अनेक जण अहोरात्र झटत आहेत. कोणाची उपासमार होऊ नये म्हणून शेतकरीही आपल्या परीने काम करतोय. स्वतः संकटात असताना कित्येक शेतकरी दाते या राज्याने, देशाने अनुभवलेत.

-सूर्यकांत नेटके, अहमदनगर

Leave a Reply