
जागतिक महामारीने अनेकांच्या जीवनात उलथापालथ झाली. काही जणांचे रोजगार गेले तर काहींनी रोजगाराच्या नव्या संधी शोधल्या. कळंब तालुक्यातील शिराढोण. इथल्या कृषी सेवा केंद्राचे मालक सुभाष माकाेडे. कोरोना काळात त्यांनी शेतात टोमॅटो शेतीचा नवा प्रयोग केला.
निसर्गानं साथ सोडली की उत्पादन घटतं किंवा अनुकुल वातावरणात उत्पादन झालं तर चांगला भाव मिळत नाही,अशा गर्तेत मग शेतकरी हताश होतात आणि मग शेतीबद्दलचीच निराशा वाढीस लागते. यात दुरूस्ती करायची असेल तर बाजारपेठेचं नीटपणे आकलन असायलाच हवं.
सुभाष यांची २० एकर शेती. त्यापैकी १६ एकर वहितीखाली तर ४ एकर अंतर्गत शेतरस्त्यांसाठी वापरली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांना दुकान बंद करावं लागलं. गावातही फिरता येत नव्हतं. सुभाष यांनी आपला मुक्काम शेतात हलवला. तेव्हा त्यांना टोमॅटो शेतीचा कल्पना सुचली.सुभाष यांना त्यांचे बंधू शरद यांनीही यासाठी साथ दिली.
सुभाष यांनी टोमॅटोचा बाजारपेठेतील अंदाज घेतला. लागवड कधी करायची, बाजारपेठेत

मालाची सर्वाधिक मागणी आणि भाव कधी असतो, याचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी शेतात १२ एकरवर टोमॅटोची लागवड केली.पारंपारिक वाट सोडून त्यांनी नव्या जाेमानं शेतीचा मार्ग पत्करला. कोरोना काळात त्यांनी गाव पाहिलंच नाही. दिवसरात्र परिश्रम करत त्यांनी १२ एकर टोमॅटोतून गेल्यावर्षी (२०२१) नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात सुमारे एक कोटींचं उत्पादन घेतलं.पहिल्याच प्रयोगातून भरघोस उत्पादन मिळाल्यानं माकाेडे बंधूंचा उत्साह द्विगुणित झाला.त्यांनी यावर्षी लागलीच मार्च आणि एप्रिल

महिन्यात प्रत्येकी साडेसहा आणि सहा एकरवर दोन टप्प्यात टोमॅटोची लागवड केली. साडेसहा एकरवरील टोमॅटोचा प्लॉट वाढत्या तापमानामुळे वाया गेला, तर उर्वरित सहा एकरवरील प्लॉटमधून त्यांना विक्रमी म्हणजे तब्बल दीड कोटींचं उत्पादन मिळालं. त्यांनी कर्नाटक राज्यात टोमॅटोची विक्री केली. यापूर्वी दिल्ली, बेंगलोर, हैद्राबाद इथंही त्यांनी टोमॅटो विकले.
”व्यापारी शेतात येऊन टोमॅटोची खरेदी करत असल्यामुळे जाण्याची गरज पडत नाही”, सुभाष सांगतात. ”देशपातळीवरील बाजारपेठेचा अभ्यास करून मे महिन्यात टोमॅटो बाजारात आणला. या काळात बाजारपेठेत टोमॅटोची

आवक कमी आणि मागणी अधिक होती. त्यामुळे सहा एकरातून १२ हजार कॅरेट टोमॅटोला सरासरी १५०० रूपये प्रति कॅरेट भाव मिळाला. साधारण सहा महिने बाजारपेठेत स्थिरता म्हणजे मंदी असते. त्यानुसार नियोजन केलं तर खर्च वजा जाता एकरी किमान अडीच लाख रूपये उत्पादन मिळतं. आम्ही गेल्यावर्षी एकरी १० लाख रूपये निव्वळ नफा मिळविला होता. यावर्षी मात्र त्यात तिपटीनं वाढ झाली आहे. सहा एकरात एकूण दीड कोटी रूपये आतापर्यंत मिळाले, त्यात २२ लाख रूपये खर्च झाले.”
सुभाष यांच्या मते ,फक्त टोमॅटो शेतीसाठी नव्हे तर कोणत्याही व्यवसायासाठी बाजारपेठ आणि हवामानाचा अंदाज असायला हवा. म्हणजे चांगला भाव मिळतो.
-चंद्रसेन देशमुख, ता. कळंब, जि. उस्मानाबाद
Related