कोरोना विषाणूशी दोन हात करणाऱ्या हिरकणी

 

महाराष्ट्रात कोरोनाशी लढा देण्यासाठी धुळे हिरे वैद्यकीय महाविद्यालयात विषाणू तपासणी प्रयोगशाळा सुरू झाली असून, या ठिकाणी कोरोना विषाणूचे नमुने युद्धपातळीवर तपासले जात आहेत. विशेष म्हणजे या प्रयोगशाळेच्या प्रमुख या महिला डॉक्टर असून, अन्य सहाय्यक देखील महिलाच आहेत. बहुधा राज्यातील ही पहिलीच विषाणू तपासणी प्रयोगशाळा आहे, ज्या ठिकाणी महिला सर्व प्रमुख जबाबदारी पार पाडत आहेत.

अत्यंत कमी कालावधीत या प्रयोगशाळेने उत्तर महाराष्ट्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. गेल्या पाच-सहा दिवसांच्या कालावधीत या प्रयोगशाळेत धुळ्यासह नाशिक, जळगाव, नंदुरबार अशा जिल्ह्यातील संशयितांचे नमुने (swab) तपासले जात आहेत. या प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. मृदुला द्रविड असून त्यांच्या मदतीसाठी डॉ. सुप्रिया मालवी, डॉ. गायत्री पोद्दार आणि डॉ. मनीषा तमायचेकर आहेत. इतकंच नाही तर या डॉक्टरांसोबत तंत्रज्ञ पूजा ब्राम्हणे आणि स्मिता ठाकूर या महिला कर्मचारीच आहेत.

एकीकडे संपूर्ण जगात ज्या कोरोनाची दहशत निर्माण केली आहे. या विषाणू तपासणी प्रयोगशाळेत या महिला न घाबरता आत्मविश्वासाने काम करीत आहेत. त्यांच हे काम तासन् तास चालतं. तहान लागली असतानाही पाणी प्यायला मिळत नाही. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच जेवणासाठी वेळ मिळतो.

या डॉक्टर आणि तंत्रज्ञांनी देशातल्या विविध नामांकित संस्थांमध्ये आणि मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये काम केलं आहे. “कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी सरासरी सहा तासांचा कालावधी लागतो, मात्र आम्हाला ७ ते ८ तास लागत आहेत, येणाऱ्या काही दिवसात सरावामुळे अजून कमी वेळेत आम्ही उद्दिष्ट साध्य करू,” असा विश्वास डॉ. मृदुला द्रविड व्यक्त करतात.

मागील आठवड्यात या प्रयोगशाळेत पूर्ण क्षमतेने काम सुरू झालं असून, दिवसाला 90 कोरोना विषाणूच्या चाचण्या या डॉक्टर करीत आहेत. या महिला डॉक्टरांचे या प्रयोगशाळेतील काम पाहिल्यावर ते कोरोना विरोधातला लढा आपणच जिंकू असा विश्वास निर्माण होतो

– कावेरी राजपूत, धुळे

Leave a Reply