कोविडकाळात ‘सहनिवास’पण जपताना

मी मकरंद सहनिवास, माहीम मुंबई १६ इथला रहिवासी आणि कार्यकारिणी समितीचा सदस्य.
परवाच आमच्या सोसायटीचे एक सदस्य व स्नेही कोविडचा उपचार घेऊन इस्पितळातून सुखरूप परतले. त्यांचा फोन आला. त्यांनी कार्यकारिणी समितीचे आभार तर मानलेच. खरं तर तसं करण्याची आवश्यकता नव्हती. पण आणखी म्हणाले “यापुढे मी या जागेचा उल्लेख कधीही मकरंद सोसायटी असा करणार नाही तर आवर्जून मकरंद सहनिवास असाच करीन”. त्यांच्याकडून असं सर्टिफिकेट मिळालं म्हणून आमच्या सहनिवासातील कोविडकाळातील नियोजन, वातावरण याबद्दल थोडं लिहायला मी धजत आहे. हे कथन माझं स्वतःचं असलं तरी बहुसंख्य सदस्य माझ्याशी सहमत असतील असा विश्वास आहे.


आमची सोसायटी पाच इमारतींची, १२५ घरांची. आणि ३० ज्येष्ठ नागरिक एकएकटे राहाणारे.
२४ मार्च पासून प्रत्येक दिवशी संकुलाच्या आवारात आमचे रहिवासी सकाळ-संध्याकाळ फिरायला /धावायला /सायकलींग करायला येत आहेत. कोणीही त्यांना थांबवलं नाही. नियमित व्यायाम, फिरणं याने मन स्वस्थ राहील आणि इम्युनिटी लेव्हल्स चांगल्या राहतील असा विचार केला. मात्र मास्क लावा, शारीरिक अंतर पाळा हा आग्रह सर्व सभासदांनी एकमेकांकडे सातत्याने धरला.


आम्ही सोसायटीचा एक कोविड वर्किंग ग्रुप बनवला. २३ मार्चपासून या गृपने फक्त मेसेजिस देणारा (one way traffic) व्हॉट्स ॲप गृप सुरू ठेवला आहे. वेळोवेळी नियोजनाचे निर्णय, ताजी माहिती इथे प्रसारित केली जाते. त्याचे सर्व transcripts उपलब्ध आहेत. इतर काही सहनिवासातील दारुण किस्से कानी पडायचे, पोलीस/BMC तक्रार इत्यादी कथा आम्ही ऐकतो तेव्हा आम्ही कोविड वर्किंग ग्रुपचे सदस्य एकमेकात आत्मविश्वासाने म्हणतो, “हा सहनिवास समंजस लोकांचा आहे. पोलीस व महापालिका यंत्रणा बाहेर अथक परिश्रम घेताहेत, आपले आतले प्रश्न इथली माणसे त्यांच्याकडे नेणार नाहीत. तरी असं झालाच तर गृपचे सर्व मेसेजिस प्रशासनापुढे ठेऊ, आपल्या नियोजनाचे पुरावे आपल्या वतीने बोलतील. जाचक नियम आम्हीही लागू केले. मात्र, प्रत्येक वेळी सभासदांना विश्वासात घेतलं, योग्य ते स्पष्टीकरण दिलं. जेव्हा गरज पडली तेव्हा नियम शिथीलही केले. अपवादात्मक केसेसचा जिव्हाळ्याने विचार केला. प्रसंगी जाचक नियम मागेही घेतले.

सहनिवासातील स्त्रिया एक वेगळा व्हॉट्स ॲप गृप चालवतात. तिथे सर्व सभासद मतप्रदर्शन करतात. त्या मतांची दिशा काय आहे, यावर कोविड वर्किंग गृपचं लक्षं असतं. दर दोन- तीन दिवसांनी वर्किंग गृप आवारातल्या बागेत बाकांवर मास्क, अंतर हे नियम पाळून भेटतो. गरज पडेल तेव्हा कॉलवर चर्चा करतो.
प्रवेशद्वारी टेंपरेचर तपासणं, हात धुण्याची सोय,प्लम्बर, इलेक्ट्रिशियन, सफाई कामगार, सुरक्षा कर्मचारी यांची राहायची-जेवायची सोय; आठवड्यातून एकदा इमारतींचं निर्जंतुकीकरण हे सुरूच आहे.
गेल्या तीन महिन्यात आमच्या सहनिवासात असंख्य उपक्रम हाती घेतले गेले. आठवड्यातून दोनदा भाजीचा स्टॉल, आंब्याच्या दिवसात पूर्वी कधी आल्या नाहीत इतक्या पेट्या आल्या, किराणा सामानाच्या प्रत्येक घराची ऑर्डर घेऊन दादरहून सर्वांचं सामान एकत्रितपणे आणणं, त्याचे वितरण करणं, अधनंमधनं लोकांचे आवडते खाद्यपदार्थ मागवून त्यांचं वितरण – थोडक्यात, लॉकडाऊन सुसह्य वाटावा, रहिवाशांना बाहेर जायला लागू नये हे पाहिलं. एकटं राहाणाऱ्या ज्येष्ठांची विशेष काळजी घेतच आहोत. हे सगळं मास्क, अंतर, हातांची स्वच्छता हे अनुशासन पाळूनच. प्रत्येक उपक्रमात सभासदांनी स्वयंसेवक होऊन भाग घेतला.
सहनिवासात काही डॉक्टर्स आहेत. त्यांचं एक पॅनेल नेमण्यात आलं. त्यांचा मौलिक सल्ला आणि मार्गदर्शन यांनी मार्ग खूप सोपा झाला. तेही याच सकारात्मक वातावरणातले असल्यामुळे त्यांनी नेहमीच योग्य सल्ला दिला. कोविडसारख्या संकटाचा सामना करण्यासाठी काळजी, धडाडी, सकारात्मकता, सदस्यांमध्ये परस्परविश्वास, जिव्हाळ्याचं नातं, मैत्र आणि विचारविनिमय यांचा जो समन्वय लागतो तो साधण्यात आम्ही सर्वच – समिती, डॉक्टर्स पॅनल, सभासद, सोसायटीतला सेवकवर्ग – सहभागी आहेत.
हे सगळं आम्ही का घडवू शकलो? पूर्वजांची देणगी! गेल्या ५६ वर्षांत खूप प्रेमाने आणि रुचीने आमच्या आईवडिलांनी हा सहनिवास उभा केला. त्यातील अनेक काळाच्या पडद्याआड गेले. अनेक अजून आमच्यासोबत आहेत – आमचे आदरणीय ज्येष्ठ नागरिक. त्यांनी आम्हाला सहकाराचा, शेजारधर्मपालनाचा अमूल्य वारसा दिला आहे. आमच्याकडे १२५ कुटुंबांतले सगळे एकमेकांना ओळखतात. त्यातून आमचं सहजीवनाचं नातं फुलत गेलं आहे. आता तुम्ही विचाराल की, पूर्वजांच्या देणगीशिवाय, ५६ वर्षांच्या तपश्चर्येअभावी असा सहनिवास कसा साध्य होणार?
या प्रश्नालाही उत्तर आहे. आमच्याकडे रहिवासी भांडले तरी पुनःश्च एकत्र येतात. एवढं तर लहान मुलांनाही जमतं! सहनिवास, सहजीवन ही तर आपली प्राथमिक गरज आहे. भावनिक आणि व्यावहारिकसुद्धा. तेव्हा नवीन संकुलांना, सोसायट्यांना हे का जमू नये? एकदिलाने जगणारा समुदाय तयार करावा लागतो. त्याकरता वेळेची गुंतवणूक करावी लागते.
आमच्या पिढीला, आमच्या सोसायटीतल्या भावी पिढ्यांना सहनिवासात वेळ गुंतवावा लागेल. नाही तर भावी काळातल्या संकटांना हसतमुखाने आणि कणखरपणे सामोरं जाता येणार नाही. मॉल्स, रिसॉर्ट्स, पंचतारांकित हॉटेलांमधील वेळेची गुंतवणूक तेव्हा मदतीस येणार नाही. सहनिवास उभारण्यात केलेली वेळेची गुंतवणूक किती भरभरून परतावा देते, हे आम्ही कोविडकाळात अनुभवत आहोत.
– अमलेश कणेकर

Leave a Reply