कौशल्यविकासातून स्व-ओळख : पेस

पहिलीत प्रवेश घेणाऱ्यांपैकी सुमारे ८३% विद्यार्थी दहावीत पोचण्याआधीच शाळा सोडतात. या मुलांना कौशल्यं दिल्यास ती उद्योग-सेवाक्षेत्रात काम करण्यासाठी सक्षम होतील या विश्वासाने ‘प्रथम’ या संस्थेने २००५ पासून काम सुरू केलं. बेरोजगार मुलांच्या पहाणीत दिसलं की शाळा अर्ध्यात सोडल्याने, चारचौघात वावरायची सवय नसल्याने, बेरोजगारीचा शिक्का बसल्याने ती घरावर ओझं झालेली. अनेकांकडे कौशल्यं होती. पण नोकरी-व्यवसायापर्यंत पोचण्याची क्षमता नव्हती. ड्रायव्हिंग शिकलेल्या तरुणाला आठ-दहा इंग्रजी वाक्यं बोलता आली, लोकांत वावरायचा धीटपणा आला; तर त्याला काम मिळण्याची शक्यता वाढते. साधं वॉचमन म्हणून काम करण्यासाठीही बर्या्पैकी संवादकौशल्य हवं. अर्थात वॉचमनचं किंवा अन्य कोणतंच काम तितकं ‘साधं’ नसतंच! घरची शेती करायची तरी नवं शिकायला पाहिजे याचं भान नाही. बिगारीचं काम येतं; पण त्यातून अधिक पैसे कसे-कुठे मिळतील ते माहीत नाही. फिटिंग, इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग शिकलेल्यांना कामात अद्ययावतपणा ठेवणं जमत नाही. आधुनिक मोटरगाड्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाच्या माहितीअभावी वाहनदुरुस्तीसेवा देता येत नाही.

‘प्रथम’ने अशा मुलांसाठी मराठी संवादकौशल्यं, जरुरीपुरतं इंग्रजी, सामान्यज्ञान, थोडं गणित, कंप्युटरचं जुजबी ज्ञान असा अभ्यासक्रम तयार केला.
सॉफ्ट स्किल्सच्या या अभ्यासक्रमामुळे युवकांची नोकरी मिळवण्याची पात्रता वाढू लागली. तीन-चार महिन्यात प्रशिक्षित होऊन मुलं कामाला लागली पाहिजेत, या उद्देशाने मनुष्यबळाची जास्त गरज असलेली व्यवसायक्षेत्रं निवडून लेक्चर्स आणि कामांचा सराव असं प्रशिक्षण सुरू केलं. आदरातिथ्य क्षेत्रासाठी ताज हॉटेल्स, बांधकाम क्षेत्रासाठी एल ऍंड टी, वाहनदुरुस्तीत टाटा मोटर्स याप्रमाणे प्रशिक्षित मुलांना नोकरीची हमी देणाऱ्या विविध कंपन्यांशी भागीदारी केली. त्यातून उभं राहिलं ‘पेस’(PACE)
इथून चालू वर्षात सुमारे ३० हजार मुलंमुली विविध कंपन्यांत काम सुरू करतील. मात्र हे निव्वळ नोकर्‍या देण्याचं काम नाही; तर त्यांना अर्थव्यवस्थेत शिरकाव करायला, अर्थव्यवस्थेचा भाग बनायला मदत करणं, औद्योगिक लोकशाही प्रस्थापित करणं आहे.
पुढे जायला आसुसलेल्या तळातल्या माणसाला ‘पेस’ संधी देतं. पैसा नाही याची अडचण येऊ देत नाही. ‘आधी शिका आणि काम मिळाल्यावर फेडा’ हे सूत्र आहे. कामाला लागल्यावर या मुलांचा आनंद निव्वळ पैसे मिळवण्यातला नाही; तर एका मोठ्या समाजात स्व-ओळख तयार होण्यातला आहे. ‘पेस’ ही उद्योगाची सामाजिक चळवळ आहे!

– मेधा कुळकर्णी