क्ताआजींचा नातू नीलकंठ

 

मुक्ताआजी गेल्या. भोगाव इथल्या आधार केअर सेंटरमध्ये त्या राहायच्या. सेंटरनं नीलकंठला कळवलं. त्यानेच आजींना तिथं दाखल केलं होतं.
नीलकंठ दोरनाल. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकतो. दुसऱ्यांना मदत करायला त्याला फार आवडतं. सोलापुरातल्या पद्मशाली इंटरनॅशनल फाऊंडेशनचा तो सदस्यही आहे.
दोन वर्षांपूर्वी नीलकंठला मित्राकडून एका वृद्ध महिलेची माहिती मिळाली. परिसरातले लोक खायलाप्यायला पुरवायचे. पण घर नसल्यानं आजींचे एकूणच हाल होत होते. नीलकंठ आजींना भेटायला गेला. त्याची आणि मुक्ताबाई भांडेकरांची अशी

ओळख झाली.     
शहरात मंगलदृष्टी वृद्धाश्रम आहे. तिथं नीलकंठनं मुक्ताबाईंना निवारा मिळवून दिला. त्यानंतर तो नियमितपणे वृद्धाश्रमात जायचा. मुक्ताआजींसोबत इतर आज्यांनाही तो काय हवं नको पाहायचा. तिथल्या सर्वांशी त्याचं नातं निर्माण झालं.
साधारण सात महिन्यांपूर्वी मुक्ताआजींना स्मृतिभ्रंश झाला. मग नीलकंठनंच त्यांना भोगावमधल्या सेंटरमध्ये दाखल केलं. तिथं त्यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. नीलकंठच त्यांना हवंनको पाहत असल्यानं सेंटरनं त्याला कळवलं.
त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचं नीलकंठनं ठरवलं. कारंबा नाका स्मशानभूमीत आस्था रोटी बँकेचे विजय चंचुरे, हरिदास पेंटा, श्रीनिवास इप्पा, गौरीशंकर दिकोंडा, मधुकर रापेल्ली, दीपक बोडा, पवन कोंडी आणि मंगलदृष्टी वृद्धाश्रमाच्या रजनी भाटिया यांच्या साथीनं अंत्यसंकार झाले.
”माझ्या जबाबदारीवर आजींना वृद्धाश्रमात दाखल केलं होतं. ” नीलकंठ सांगत होता. ”त्यांना नेहमी भेटायचो. आमच्यात कौटुंबिक, जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं होतं.”

-अमोल वाघमारे, सोलापूर

Leave a Reply