सरकारी काम आणि सहा महिने थांब!! हा अनुभव आपल्यापैकी कित्येकांचा असेल. सरकारी कार्यालयात जाऊन एखादं काम विनासायास करून या, असं सांगितलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. मात्र सरकारी कार्यालयांची हीच प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केलाय तो मराठी महिला आयएएस अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी. धुळ्यात कार्यरत असलेल्या धोडमिसे मॅडम यांनी तब्बल दोन कार्यालयांना आयएसओ मानांकन मिळवून दिलंय, या दोन्ही कार्यालयांमध्ये क्यु आर कोड प्रणालीद्वारे कामकाज सुरू केलंय. या क्यूआर कोड प्रणालीमुळे जागेची बचत तर होतेचंय, शिवाय दस्तऐवजांचे जतनही झालंय. कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण तसा कमी झालाय, तसंच सर्वसामान्य जनतेचं काम काही मिनिटांत मार्गी लागतंय.
धुळे येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी त्यांच्या प्रांत अधिकारी कार्यालय, धुळे आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धुळे या दोन्ही कार्यालयांना आयएसओ मानांकन मिळवून दिले आहे. तसेच या दोन्ही कार्यालयांमध्ये क्यूआर कोड प्रणाली कार्यान्वित केली आहे. दोन्ही कार्यालयातील अभिलेखांसह नस्ती म्हणजेच फाईल्स शोधण्यासाठी आणि त्यांचे जतन करण्यासाठी क्यूआर कोडचे तंत्रज्ञान विकसित करून तिथल्या संचिका अर्थातच डाटा अद्ययावत केलाय. यामुळे दोन्ही कार्यालयातील कोणतीही फाईल शोधणे आता एका क्लिकवर शक्य झालंय. आधुनिकीकरणामुळे या कार्यालयांमधला सुमारे सहा टन कागदी कचरा नष्ट झाला आहे. या कामाचे मूल्यमापन होऊन, त्यांच्या दोन्ही कार्यालयांना ’आयएसओ’ मानांकन प्राप्त झालंय. विशेष म्हणजे ‘धुळे प्रांताधिकारी कार्यालय’ हे नाशिक विभागातील पहिले आयएसओ मानांकित कार्यालय ठरले आहे.
सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे आदिवासी विकास प्रकल्प विभाग आणि धुळे प्रांताधिकारी या दोन्ही कार्यालयांचा पद्भार आहे. त्यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांनी दोन्ही कार्यालयांमध्ये अनेक सुधारणा केल्यात. कामात सुसूत्रता आणून कर्मचार्यांमध्ये शिस्तीचं वातावरण आणलं. या गोष्टीचा सर्वाधिक फायदा झालाय तो सर्वसामान्य नागरिकांना!! कार्यालयात येणार्या प्रत्येक नागरिकाचं काम तातडीनं मार्गी लागलं पाहिजे, कुठल्याच नागरिकाला फाईलअभावी कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागू नये, यावर त्यांचा भर होता. म्हणूनच त्यांनी क्यूआर कोड प्रणाली विकसित करून फायलींचा डेटा अद्ययावत केला.
एवढंच नाही तर या कार्यालयांच्या आवारात आकर्षक फुलझाडांची लागवड केलीये. इमारतीच्या दर्शनी भागात धुळे जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळं- नकाणे तलाव, अक्कलपाडा प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प, लळींग किल्ला यांची आकर्षक चित्रे रंगविण्यात आली आहेत. याशिवाय विविध विषयासंदर्भातील खटले, तक्रार निवारणासाठी पाचशे चौरस फुट अर्धन्यायी कक्षाची उभारणी केलीये. या कार्यालयात नवीन स्वच्छ प्रसाधनगृहे, प्रथमोचार पेटी, बायोमेट्रिक प्रणाली, अग्निशमन यंत्रणा, तक्रार पेटी, कर्मचार्यांना ड्रेसकोड, संगणकीय सुविधा, कर्मचार्यांसाठी स्वतंत्र वाचन सुविधाही उभारण्यात आल्या आहेत. धोडमिसे मॅडम यांच्या प्रयत्नांमुळे आदिवासी विकास प्रकल्प आणि प्रांताधिकारी कार्यालयाचा कारभार चांगलाच सुटसुटीत झाला आहे. आयएसओ नामांकनाच्या परिक्षणासाठी आलेल्या समितीनेही त्यांच्या कामाचे कौतुक केलंय.
क्युआर कोड प्रणालीमुळे अनावश्यक कागदपत्र हाताळण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर येत नाही. गठ्ठ्यांचा क्युआर कोड स्कॅन केल्याबरोबर त्या गठ्ठ्यांमध्ये असलेले कागदपत्र डिजिटल स्वरूपात मोबाईल मध्ये पाहता येतात. मोबाईलमध्ये आवश्यक असलेले कागदपत्र आढळलं तरच, तो गठ्ठा उघडला जातो अन्यथा दुसरा क्यूआर कोड स्कॅन केला जातो. आधी दस्तऐवज शोधण्यासाठी एकेक गठ्ठा काढून, कागद उलगडून पहावा लागायचा. मात्र आता या आधुनिक स्कॅनिंगमुळे जुने दस्तऐवज अधिक काळ जतन करणे शक्य होणार असून, वेळेचेही बचत होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना हवे असलेले जुनी दस्तऐवज आता काही मिनिटांमध्ये उपलब्ध होत आहेत.
लेखन: कावेरी परदेशी, धुळे
‘नवी उमेद’ची टीम दररोज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली सकारात्मक कामं, घटना, व्यक्ती तुमच्यापर्यंत आणत असते. या कामाला खर्च येतो. त्यातला काही वाटा वाचक म्हणून तुम्ही उचलावा, ही विनंती. त्यासाठी ही लिंक:
अकाऊंट डिटेल्सः
Sampark account details
Name: SAMPARK
Account No: 50100547410322
Account Type: Savings
Branch Name: HDFC Bank, Goregaon East
IFSC Code: HDFC0000212
सोबतच ‘नवी उमेद’विषयी तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा.
#नवीउमेद
#आयएसओसरकारीकार्यालय
#धुळे
#क्यूआरकोड
#तृप्ती_धोडमिसे