खरंखुरं गौरीपूजन+

 

अशोकराव जाधव बुलढाणा तालुक्यातील कोलवडचे. हे गाव तसं छोटसं. लोकसंख्या दोन हजाराच्या आत. अशोक यांचं बारावीपर्यंत शिक्षण झालं. पुढच्या शिक्षणात रस नसल्यामुळे त्यांनी शेतीकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. भजन किर्तनाची आवड असल्याने जवळपासच्या अनेक गावात ते भजनी मंडळीसह वावरतात.

संत तुकाराम, ज्ञानेश्वर, मुक्ताई, वेणाई आदींची भजन कीर्तनं करीत असताना त्यांच्यात वैचारिक परिवर्तन झालं. त्यांच्या घरी दरवर्षी गौरी पूजन केलं जातं. मात्र त्यावर्षी म्हणजेच 2007मध्ये त्यांनी त्यांच्या घरातील लोकांना गौरीपूजनाऐवजी महानायिकांचे आणि ग्रंथाचे पूजन करून त्यांच्या विचारावर आपण चालायला हवं हा विचार मांडला. या विचाराचा त्यांच्या घरच्या मंडळींनीही स्वीकार केला. मागील 10 वर्षापासून सातत्याने जाधव परिवारात महानायिकांचे पूजन केलं जातं. यात राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, ताराबाई शिंदे, अहिल्या होळकर यांच्यासह म. फुले, संत गाडगेबाबा, चक्रधर स्वामी, आदींच्या ग्रंथांचा समावेश असतो. या पूजेत दोन दिवस महानायिकांच्या प्रतिमेचं तसंच ग्रंथांचं नियमित पूजन केलं जातं. भजन किर्तनाने या पूजेचा समारोप केला जातो. पूजेतली पुस्तके काही दिवसांसाठी गावातील युवकांना वाचनासाठी उपलब्ध करून देतात.

जाधव यांनी आपल्या घरापासून सुरू केलेला हा बदल गावातही काही घरांनी स्वीकारला. संतोष पाटील, रामेश्वर जाधव, तानाजी पैठणी, राम जाधव यांनी आपल्या घरात गौरी पूजनाऐवजी महानायिका पूजन सुरू केल्याचं जाधव यांनी सांगितलं.

गावोगावी होणाऱ्या भजन किर्तनातून परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. आतातरी आपण ही परिवर्तनवादी भूमिका घेऊन वैचारिक परिवर्तन स्वीकारायला हवं. या महानायिकांच्या व ग्रंथाच्या पूजनातून मला ऊर्जा मिळते असं अशोकराव जाधव म्हणतात.

– दिनेश मुडे, बुलढाणा

Leave a Reply