साल २०२०- २०२१ कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट. कधी न ऐकलेला नवा रोग, प्रचंड भीती, अपुरी आरोग्यव्यवस्था, हाताला काम नसल्याने लोकांचे स्थलांतर, आप्तांचे मृत्यू, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या कोसळलेली घरं असा अतिशय भयंकर काळ आपण सर्वांनी पाहिलेला आहे. या काळात ‘कोरोनायोद्धे’ म्हणून ज्यांना ज्यांना गौरवलं गेलं त्यात डॉक्टर, रूग्णालयीन स्टाफ, सफाई कामगार, पत्रकार आणि अर्थातच पोलीस या सर्वांची कामगिरी अत्यंत महत्त्वाची होती.
अशीच आमच्या नागपूरमधील मौदा तालुक्याच्या अरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत अविस्मरणीय कामगिरी बजावली ती, त्यावेळचे ठाणेदार विवेक सोनवणे यांनी. सुरूवातीला कोरोना विषाणू पसरू नये म्हणून, शक्य ती काळजी घेण्याची जबाबदारी सरपंच तसेच हद्दीतील पोलीस ठाण्यावर होती. नागपुरातील अनेक तालुक्यात कोरोनाने धुमाकूळ घालायला सुरूवात केली होती, कित्येकांचे बळी गेले होते, प्रशासन पुरते हतबल झाले होते. मात्र वर उल्लेख केलेल्या अरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मात्र रूग्णसंख्या तर नियंत्रणात होतीच शिवाय मृत्यूदर शून्य होता. याला कारणही तसंच होतं, ‘सिंघम’ म्हणून ओळखले जाणारे त्या गावातील त्या वेळचे ठाणेदार विवेक सोनवणे यांचे काटेकोर नियोजन, बंदोबस्त आणि माणुसकी!
त्यांच्या हद्दीत एकुण ६४ गावं आणि ४ मोठ्या झोपडपट्ट्या होत्या. हद्दीतील पोलीस पाटलांची मिटींग घेऊन त्यांना त्यांची जबाबदारी समजावून, कामाची विभागणी करून दिली. इतर गावांच्या तुलनेत या गावात रूग्णसंख्या कमी असल्याचे बघून लोकांनीही त्यांना साथ दिली.या ६४ गावात फक्त ३५ कोरोनाचे रूग्ण आढळून आले, त्यांच्यावर वेळीच उपचार देऊन त्यांना सुरक्षितरित्या क्वारंटाईन केले गेले. बाकी गावात कामाखेरीज न फिरण्यासाठी प्रेमाची भाषा समजणाऱ्यांना प्रेमानं समजावलं तर, दंडुक्याची भाषा समजणाऱ्यांना ‘दे दणादण’. या वृत्तीमुळे त्यांना प्रसंगी राजकारणी लोकांचा, विरोधकांच्या कुरघोडीचासुद्धा सामना करावा लागला.तरी ते डगमगले नाहीत. गावकऱ्यांची काळजी घेत असतांना त्यांनी पोलिस कर्मचार्यांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष दिले. रोज योगासनं, प्राणायम करून घेत होते, मास्क उत्तम आहाराचं महत्त्व समजावत होते. प्रत्येक गावाच्या वेशीवरच पोलीस तैनात केल्याने, अतिमहत्वाचं काम वगळता कोणाला बाहेर जाऊ दिले नाही की कोणाला आतही येऊ दिले नाही.
पण हे करताना त्यांच्यातली माणुसकी मात्र सदैव जागी होती. अगदी सुरूवातीलाच गावाच्या हद्दीतून स्थलांतरित होणाऱ्या मजूरवर्गाला जेवण आणि प्रवासाची सोय करून दिली. गावातील गरजूंना वेळप्रसंगी किराणा, मदत घरपोच पाठवली. रमजान ईदच्यावेळी गावातील १३० मुस्लिम कुटुंबांना शिरखुर्म्याचे साहित्य सोनवणेंनी घरपोच पाठवले. शहरात रक्ताची कमतरता होती म्हणून गावपातळीवर रक्तदान शिबीरंही भरवली. लॉकडाऊन काळात आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम न घेता १ लाख ८० हजार रूपयाचा निधी, सोनवणेंच्या पुढाकारातून मुख्यमंत्री सहायता निधीत पाठवला गेला. याच काळात ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनाही जेव्हा कोरानाची लागण झाली, तेव्हा त्यांना उत्तम उपचार मिळतील आणि मनोबल खचणार नाही यासाठी ते रोज दवाखान्यात त्यांना भेटायला जात होते. पुढे रक्षाबंधनाचा कार्यक्रमही साध्या पद्धतीनं पोलिस ठाण्यात साजरा झाला. यावेळी गावातील अनेक महिलांनी आपल्या या पाठीराख्या भावाला- राखी बांधून आपलं प्रेम आणि आदर व्यक्त केला.यात तरूण स्त्रियांपासून ते वृद्ध महिलाही होत्या. विवेक यांनीही त्यांना साडी भेट देवून कर्तव्यपूर्ती केली.
विवेक सोनवणेंचा हा सेवाभाव कोरोना काळापुरताच नसून स्वभावगुणच आहे. आपल्या हद्दीतील गावांमधील युवकांसाठी स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन शिबीरं, क्रीडा शिबिरांचे ते आयोजन करतात. गरजू आणि गरीब मुलांना शिक्षणात मदत, गोरगरिबांना न्याय मिळवून देणे, नोकरी लावण्यास मदत करणे हे सुद्धा ते करत असतात.
लॉकडाऊन काळात अगदी सुरूवातीला चाकरमानी आपापल्या गावी परतत होते. मुंबईवरून असंच एक कुटूंब नागपुरातील गावी परत आलं होतं. त्यात एक गरोदर महिला आपल्या पती आणि लहान बाळासह आली होती. मात्र गावकरी त्यांना गावातच काय तर, गावाच्या वेशीबाहेरही राहू देत नव्हते. यांनी कोरोना आणला असेल, अशी शंका घेत काही विकृत गावकऱ्यांनी, त्यांच्यावर दगडाचा मारा करत त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्नही केले. मात्र ही बाब जेव्हा ठाणेदार विवेक यांना कळली, तेव्हा ते अतिशय संतापले. आधी त्यांनी सदर कुटुंबाची मदत करत त्यांची टेस्ट करून घेतली आणि आपल्या देखरेखीत निवास आणि भोजन व्यवस्था केली. दगडफेक करणाऱ्यांना ‘सिंघमी झटका’ दाखवला. अक्षरश: सदर महिलेचा आणि तिच्या कुटुंबाचा जीव त्यांनी वाचवला. म्हणून तिने बाळ जन्माला आल्यावर, बाळाचे नामकरण ठाणेदार विवेक सोनवणेंकडूनच करवून घेतले.
बाहेरचा व्याप सांभाळत असताना त्यांनी पोलीस ठाण्यातील कामात कामातही कसलीच कसूर ठेवली नाही. मग ते किरकोळ गुन्हे असोत की गंभीर, वेळेत तपास केला.या काळात निवडणुकांचे नियोजन आणि बंदोबस्तही चोख ठेवून वरिष्ठांची शाबासकी मिळवली. पोलिस दलाची प्रतिमा उंचावल्याने त्यांना डिपार्टमेंटकडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विविध संस्था- संघटनाकडूनही ‘कोविड योद्धा’, ‘समाजभूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढतोय. म्हणूनच दरवर्षी ते त्यांच्या वाढदिवसाला सुमारे ५०-१०० केक कापतात.
नंतर मात्र विवेक सोनवणेंची रामटेकला दुय्यम पोलीस उपनिरिक्षक म्हणून बदली झाली. त्यावेळी गावकऱ्यांनी अगदी प्रेमाने त्यांना खास निरोप दिला. रामटेकमध्येही सोनवणेंचं चांगलं काम गाजतंच आहे. पण अरोली हद्दीतले गावकरी मात्र आजही ‘असा अधिकारी होणे नाही’ असं म्हणून विवेक सोनवणेंची आठवण काढतात.
लेखन: नीता सोनवणे, नागपूर
नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/
#नवी_उमेद
#नागपूर
#विदर्भ
#मौदा
#विवेकसोनवणे
#सिंघम
#कोरोनाडायरी