खारीचा वाटा

पुण्यातल्या बिबवेवाडी भागात राहणारा अजित कुंटे. तो जन्मतः बहु विकलांग आहे. विशेष शाळेतून शिक्षण घेऊन पुढं त्याने टिळक विद्यापिठातून बी.ए. पूर्ण केलं.
कोरोना साथीच्या सुरूवातीच्या काळात अजितने खूपच मोठं तितकंच आवश्यक आणि महत्त्वाचं काम केलं. सेवा सहयोग संस्थेने अजितचं संवाद कौशल्य लक्षात घेऊन त्याला संस्थेच्या अभ्यासिकेतल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांचा सर्व्हे करायला सांगितला. संस्थेने त्याला पालकांचे मोबाईल नंबर कळवले. त्यानंतर अजितने प्रत्येक कुटुंबांला फोन करून त्यांना बोलतं केलं. त्यांना आत्ता कशाची गरज, आवश्यकता आहे ते सध्या काय काम करत आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत हे जाणून घेतलं आणि तो डेटा तयार करून संस्थेला दिला. त्यानुसार संस्थेने त्या कुटुंबांना मदत केली. नंतर ही मदत कुटुंबापर्यंत पोहोचली की नाही त्याचीही माहिती अजितने फोनवरून घेतली.


अजित सांगतो, “माझ्या शारीरिक अक्षमतेमुळे मी बाहेर जाऊन काम करू शकत नाही. पण, सेवा सहयोग संस्थेने मला माझी क्षमता जाणून हे काम करण्याची संधी दिली हे मी कधीच विसरणार नाही. यासाठी मला संस्थेच्या अनिता मॅडम यांचं मार्गदर्शन मिळालं आणि मदत झाली. कोरोनासारख्या कठीण काळात समाजातील अनेक व्यक्ती, संस्था काम करत आहेतच ह्या सगळ्यांबरोबर मी माझ्या परीने मदत करू शकलो याचं मला नक्कीच समाधान वाटतं.”
अजितचा आणखी एक विशेष म्हणजे, त्याने पु. ल. देशपांडे, व. पु. काळे व शंकर पाटील यांच्या कथांच्या अभिवाचनाने इतरांना निखळ आनंद दिलेला आहे. त्याच्या कथाकथनाचे आता पर्यंत 118 कार्यक्रम पार पडले आहेत.

– प्रतिनिधी

Leave a Reply