संसदेत बालकांविषयी अधिक प्रश्न विचारणारा खासदार असा गौरव दक्षिण मुंबईचं प्रतिनिधित्व करणारे अरविंद सावंत यांचा युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संस्थेने नुकताच केला. नवी उमेदसाठी आम्ही याबद्दल अरविंद यांची मुलाखत घेतली तेव्हा दिवाळी जवळ आली होती. आणि ते मोखाड्यात जाण्याच्या तयारीत होते.
ठाणे जिल्ह्यात मोखाडा इथली जिल्हा परिषद डिजिटल स्कुल, तसंच कोकणातील काही अशा एकूण 450 मुलांना खासदार अरविंद सावंत यांनी दत्तक घेतलं आहे. देशातील मुलांना शिक्षण, आरोग्य आणि उत्तम सुरक्षितता लाभावी यासाठी आग्रही असलेले शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत त्यांच्या या उपक्रमाविषयी सांगतात, की दत्तक घेतलेल्या मुलांमध्ये माझ्या गावच्या शाळेतली मुलंही आहेत. आज गावातील शाळांमध्ये पटसंख्या नाही. काही शाळा बंद पडायच्या मार्गावर आहेत. गावातली काही मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात. अशा परिस्थितीत दत्तक घेतलेल्या गरीब आणि गरजू मुलांचा सगळा खर्च सावंत यांची संस्था करते. आरोग्यसेवा, औषधं आणि चांगला आहार यामुळे ही मुलं सुदृढ झाली.
या शाळेचं वेगळेपण असं की शालेय शिक्षणासह मुलांना तंत्रशिक्षणही दिलं जातं. आपल्या घरातला खराब फ्युज आपल्याला लावता येत नाही, पण त्यांच्या शाळेतला विद्यार्थी तंत्रशिक्षणामुळे फ्युज लावून देऊ शकतो. तसेच गाण्याची आवड असलेल्या मुलांसाठी संगीतशिक्षण मिळतं. पखवाज, हार्मोनियम अशी विविध वाद्यं मुले शिकू शकतात. हे कलाविषय शिकवणा-या कलाशिक्षकांचीही सोय या शाळेत केली आहे. शेतीविषयक प्रशिक्षणही इथं मुलांना मिळतं. विशेष म्हणजे शाळेत सर्पालय आहे. अजगर पाळले जातात. त्यामुळे प्राण्यांविषयीची भीतीही मुलांच्या मनातून दूर व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे जी मुलं बंडखोर आहेत, पालकांचं ऐकत नाहीत अशा मुलांमध्येही या शाळेत दाखल झाल्यावर सुधारणा होते, असं आढळलं आहे. शाळेतील शिक्षक त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना प्रेमाने शिकवतात. अनेक लोकप्रिय लेखक, कवी, गायक, राजकीय नेते अशा मान्यवरांनी मोखाड्यातल्या या शाळेला भेट दिली आहे. त्यांनी दिलेल्या या भेटीमुळे मुलांमध्ये उत्साह नांदतो, नवं काही करण्याची प्रेरणा त्यांना मिळते.
खासदार सावंत यांनी गटप्रमुख म्हणून राजकारणातील प्रवासाची सुरुवात केली. आज ते युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्र महासभेत आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. क्रिकेट, कबड्डी, कॅरम, खो खो, टेनिस अशा मैदानी खेळप्रकारांची त्यांना विशेष आवड आहे. राजकारणात आल्यावर अंगणवाड्यांना मदत करणे, त्यांना उजाला योजनेचा लाभ मिळवून देणे, भारतातील बालकांचं जीवन सुधारावं, त्यांना शिक्षणाचा हक्क मिळावा, कुपोषित मुलांचं आरोग्य सुधारावं यासाठी खासदार अरविंद सावंत सतत आग्रही असतात. एक बालस्नेही धोरणकर्ता असं त्यांचं वर्णन करावंसं वाटतं.
– व्ही. नमिता