खूप काही शिकायला मिळत

आमची दोन्हीही मुलं (मोठी मुलगी–लहान मुलगा) घडवताना पालक म्हणून आम्हांलाही खूप काही शिकायला मिळत आहे. मुलगी शांत, समंजस तर मुलगा खोडकर, व्रात्य. काही गोष्टी अनुभवल्यावरच मुलांच्या पक्क्या लक्षात रहातात, हे माझ्या नवर्यावचे मत. त्यामुळे वर्षातून एक – दोनदा आम्हा सर्वांचं एकत्र पर्यटन हे ठरलेलंच.  मुलांना दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टी सहज समजाव्यात म्हणून आम्ही पालक कायम दक्ष असतो. त्याचसाठी आम्ही मुलांची शाळाही अशी निवडली की जिथे ‘अभ्यास एके अभ्यास’ नसतो. चौफेर शिक्षण म्हणजे चित्रकला, नाट्यअभिनय, खेळ, गायन-वादन, हस्तकला यासोबत हसतखेळत शिक्षणही सुरू आहे. यात कधीकधी पारडं एकाच गोष्टीकडे झुकतं. मग इतर विषयांकडे साहजिकच दुर्लक्ष होतं. अशा वेळी मुलं स्वतःच त्यावर विचार करून दुर्लक्ष झालेल्या विषयांवर मेहनत घेतात.
मुलांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पालक देऊ शकत नाहीत. पण मुलांना प्रश्न तर पडलेले असतातच. मग त्यांची उत्तरं बाहेरून चुकीच्या पध्दतीने मिळवण्यापेक्षा मीच सर्रास ती देते. त्यांच्या भाषेत, त्यांना समजेल अशा रीतीने देते.
याआधी मुलं जेव्हा प्राथमिक शाळेत होती, तेव्हा मी एक अनुभवलं. तिथले पालक -शिक्षक फक्त अभ्यासाचे चाहते. त्यामुळे बिचारे विद्यार्थी अक्षरशः बेजार. “माझा मुलगा काहीच अभ्यास करत नाही…” अशी काळजीवजा तक्रार जेव्हा पहिलीतल्या मुलाची आई करते, तेव्हा मला नवल वाटतं. मी अशा खूपशा पालकांचं बौद्धिक घेतलं आहे, “अहो, त्याचं वय किती लहान आहे! या लहानग्याकडून तुमच्या अपेक्षा तरी किती? पहिलीतल्या मार्कांमुळे त्याला नोकरी मिळणार आहे का? की खूप मोठं नुकसान होणार आहे? लहान आहे मुलगा. खेळू द्या, त्याला जे वाटतं ते करू द्या.” मुलांना समजून घेणारे पालक कमीच भेटले.


 माझा मुलगा खोडकर. त्यामुळे शाळेतून वारंवार काही ना काही तक्रारी यायच्या. एकदा मी शाळेत जाऊन शिक्षकांना सुनावलं, “काय हो? ‘तारे जमी पर’ करता का माझ्या मुलाचं? अहो तो खोडकर आहे, हे मलाच काय सांगता? त्याच्या या बुध्दीचा कुठे वापर होईल, त्याला कसं व्यस्त ठेवता येइल ते पहा ना तुम्ही. माझी तुम्हाला साथ असेल. सुदैवाने मला भेटलेल्या शिक्षकांना हे पटलेलंही आहे. त्यांनी तसे प्रयोग सुरू केले. मग माझा मुलगा कायम भाषण पाठ करण्यात, नाटक अथवा समूहगीत सरावात दंग राहू लागला. कौतुक होतं म्हटल्यावर जिद्दीने अभ्यासही करून त्यातही यश मिळवू लागला. त्यामुळे सर्वांचाच त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.
हा सगळा अनुभव आनंदाचा आहे. आमचं आनंदी पालकत्वाचा अनुभव घेणं सुरूच आहे. मुलांसोबत आम्हीही नवे धडे गिरवतोय.

-वर्षा मुसळे, सोलापूरच्या ‘नवी उमेद’च्या वाचक.