गणिताला कार्टून्सचा आधार

 

विजयकुमार अडसूळ सर. मुंबईत चेंबूर इथं त्यांनी सुरू केलेल्या समिक्षा क्लासेसमध्ये तसंच मुंबईमधील इतर क्लासेसमध्ये गेली १५ वर्षे आठवीपर्यंतच्या सगळ्या इयत्तांना ते गणित विषय शिकवतात. भूमितीतील प्रमेय, बीजगणितातील क्लिष्ट सूत्रे सर सोप्या पद्धतीने शिकवत असल्याने त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळतात. शिवाय इतरही सगळे विद्यार्थी गणितात उत्तीर्ण होतात.


गणितासारखा अवघड विषय शिकवण्यासाठी एकाग्रता हवी. शिवाय शिक्षकांनी वर्गात असणं गरजेचं. सध्या कोरोनामुळे शाळा, क्लासेस हे सगळंच बंद आहे. पारंपरिक पद्धतीत विद्यार्थी समोर असताना त्यांच्याकडे लक्ष ठेवता येतं, त्यांना समजतंय, नाही हे सगळं लगेचच कळतं. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने शिकवायचं तर काही वेगळ्या पद्धती, कल्पना वापराव्या लागतील, हे सरांनी ओळखलं. भूमिती शिकवत असताना कार्टून्स, थ्रीडी आकृत्या तसंच पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा उपयोग केल्याने मुलांच्या मेंदूमध्ये भूमितीची प्रमेय, सूत्रं पक्की ठसतात. उदाहरण म्हणजे, पाण्याची तोटी उघडली असता इतक्या वेगाने पाणी गेल्यास इतके लिटर पाणी भरण्यास किती वेळ लागेल, अशा गणितासाठी कार्टुन्सचा वापर केल्याने मुलांना चटकन आकलन होते असं सरांचं निरीक्षण आहे. शंकु, घन, पाण्याची तोटी अशा गोष्टी मुलांनी चित्रात बघितल्याने गणितात रस नसलेल्या विद्यार्थ्यांना गणिताची मजा वाटू लागते.
स्क्रीनचा डोळ्यांना होणारा त्रास, मुलांचं नीट लक्ष आहे की नाही, इंटरनेटचा वाढणारा वापर या नकारात्मक गोष्टी असल्या तरीही ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे शिकवण्याचे व शिकण्याचे नवीन प्रयोग होतील व त्यातून अनेक सकारात्मक गोष्टी निघतील अशी आशा सरांना वाटते आहे.

– संतोष बोबडे, चेंबूर, मुंबई

Leave a Reply