रविवारी 10 जुलै 2022 रोजी ज्याप्रमाणे हिंदूंसाठी अतिशय महत्त्वाची अशी आषाढी एकादशी होती, त्याचप्रमाणे मुस्लिमांसाठी पवित्र अशी बकरी ईद सुद्धा होती. या बकरी ईदच्या दिवशी बकरी किंवा बोकडाची कुर्बानी देणं, आणि मग त्यातल्या मांसाचा हिस्सा गोरगरीब मुस्लिमांना वाटणं, याला इस्लाममध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण पुण्याच्या पैगंबर शेख या तरूणाने गेली नऊ वर्षे ‘आर्थिक कुर्बानी’ हा विधायक उपक्रम सुरू करून, या परंपरेला एक अनुकरणीय वळण दिलेले आहे.
या आर्थिक कुर्बानीची संकल्पना अशी आहे की, बकरी अथवा बोकड बळी देण्याऐवजी (इच्छा असल्यास ते बळी देऊन अतिरिक्त पैश्यांनी), तुम्हांला शक्य असेल तितके पैसे स्वेच्छेने, मुस्लिम समाजसुधारणा चळवळीला दान करावेत. त्या पैश्यातून प्रामुख्याने गरीब आणि गरजूंना शैक्षणिक मदत, नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी मदत केली जाते. आत्तापर्यंत या पैश्यातून शाळकरी मुलांपासून ते महाविद्यालयीन आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांना आर्थिक अथवा शैक्षणिक साहित्याची मदत तर केलेली आहेच, पण 2018 साली केरळ पूरपरिस्थितीच्या वेळी आणि 2019 साली आलेल्या सांगली- कोल्हापूर पूरपरिस्थितीत या आर्थिक कुर्बानीच्या माध्यमातून, पैगंबर शेख आणि मित्रमंडळींनी भरीव कार्य केलेलं आहे.
पैगंबर शेख पुण्यातील वारजे परिसरात राहतात. त्यांना ही संकल्पना कशी सुचली हे विचारलं असता ते म्हणाले, “मला वाचनाची अतिशय आवड आहे. इतर साहित्यासोबत कुतुहूल म्हणून मी काही वर्षांपूर्वी भारतातील अनेक धर्मांचे धर्मग्रंथ वाचले. रामायण, भगवदगीता, बायबलचा जुना आणि नवा करार, गौतम बुद्ध आणि त्याचा धम्म, आणि अर्थातच कुराण हे सगळं काही वाचलं. या धर्मग्रंथांच्या वाचनाने माझ्या ज्ञानात भर पडली. कुराण वाचताना लक्षात आलं की, बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी अथवा बळी देणं, हे इस्लाममध्ये अतिशय मोलाचं मानलं गेलं असलं तरी कुराणमध्येच एका ठिकाणी उल्लेख आहे की, तुम्ही बळी दिलेल्या प्राण्याच्या रक्ताचा एक थेंब अथवा मांसाचा एखादा तुकडा सुद्धा अल्लापर्यंत पोहोचू शकत नाही. या कुर्बानीतून अल्लापर्यंत पोहोचते ती तुमची निष्ठा!! ”
“शिवाय एका कथेनुसार, ही बकरी ईद म्हणजे तुमच्या सगळ्यात प्रिय गोष्टीची कुर्बानी अशी प्रतिकात्मक असते, हे ही लक्षात आलं. सगळ्यात प्रिय तर आपली माणसं असतात, पण अल्लाने सुद्धा हजरत इब्राहिम यांच्या प्रिय मुलाचा बळी जाऊ दिला नव्हता, त्याऐवजी बकरा बळी गेला, असं ही कथा सांगते. आपल्या परिवाराच्या खालोखाल, आजच्या युगात माणसाला पैश्याइतकं प्रिय आणि मोलाचं काय असू शकेल? मग प्राण्यांचे बळी देऊन आपण काय मिळवतोय, यासोबत अधिक चांगलं काही करता येईल का, असा विचार मनात यायला लागला. आणि ‘आर्थिक कुर्बानी’ हा उपक्रम प्रत्यक्षात आला.” पैगंबर शेख सांगत होते.
आपली अल्लाप्रति असलेली निष्ठाच अर्पण करायची असेल तर मग मी ती समाजातील गरजूंना आवश्यक त्या गोष्टी दान करूनही दाखवू शकतो, असं पैगंबर शेख यांना सुचलं. आणि मग 2014 साली प्रथम त्यांनी स्वत:च्या खिशातून काही मशिदींना पंखे, अनाथाश्रमांना आणि गरीब- गरजू कुटुंबांना धान्य- किराणा तसेच मदरश्यातील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य देऊन या उपक्रमाची सुरूवात केली. पुढेही दोन तीन वर्षे पैगंबर दादा, स्वत:च्या कमाईतून गरजूंना आर्थिक आणि वस्तूरूपात मदत करायला लागले. यात त्यांनी फक्त मुस्लिमांनाच मदत करायची अशी कुठलीही अट ठेवली नव्हती. आधी ते हे सगळं करायचं आणि याबद्दल कुठंच वाच्यताही करत नव्हते. पण हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की समाजात गरजूंची संख्या लाखोंच्या घरात आहे, आणि माझी एकट्याची दानत पुरी पडणार नाही. मग ते ‘आर्थिक कुर्बानी’ या उपक्रमाबाबत त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर लिहू लागले.
मग आलं, 2018 साल. शतकातला सर्वात वाईट म्हणता येईल असा महापूर केरळमध्ये आले. लाखभर लोकांना स्थलांतरित करावं लागलं, अनेकांचा मृत्यू झाला, आर्थिक नुकसानीची तर गणनाच नाही. अश्या प्रसंगी केरळच्या मुख्यमंत्री निधीला यावर्षीची आर्थिक कुर्बानी पाठवावी, असं पैगंबर शेख यांना सुचलं. तसं आवाहन त्यांनी सोशल मीडियावर केलं. थेट सीएम फंडात पैसे पाठवून त्याचा स्क्रीनशॉट पैगंबर दादांसोबत शेअर करायचा होता. हा सामुहिक निधी जमवण्याचा त्यांचा पहिलाच प्रयत्न. यातून सुमारे पन्नासेक हजार रूपये, केरळच्या मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झाल्याचं ते सांगतात.
त्यानंतर 2019 साली आपल्या सांगली- कोल्हापूरमध्ये महापुराने भयाण नुकसान झालं. कित्येकांच्या शेती- वाड्या- घरं- दारं आणि काही दुर्दैवी लोकांची मुलं- बाळं- घरची माणसं वाहून गेली, पडलेल्या घरांखाली अडकली. पोशिंदा शेतकरी दोन घास अन्नाला पारखा झाला, तेव्हा त्या वर्षीची बकरी ईद पैंगबर शेख आणि सहकाऱ्यांनी सांगली- कोल्हापुरसाठी आर्थिक कुर्बानी देऊन साजरी केली. सुमारे तीन लाख रूपये जमा झाले होते. यातून विचारपूर्वक पूरग्रस्तांसाठी कीट बनवण्यात आले. त्यात सकाळच्या टूथपेस्ट- टूथब्रशपासून, साबण, मेणबत्ती, काडेपेटी, पिण्याचं पाणी शुद्ध करायचं औषध,तेल, मीठ, पीठ इ. किराणा, सॅनिटरी पॅडस, बिस्कीट पुडे, चादरी, कपडे अश्या अनेक गोष्टी होत्या. सांगलीमधील पलूस तालुक्यातल्या भिलवडीमध्ये घरोघरी हे कीट नेऊन वाटले, मुख्य म्हणजे यासाठी गरजूंना रांगेत उभं केलं नाही हे विशेष. या तीन लाखांच्या मदतीनंतर यांचं उत्तम काम बघून, आणखी तीनेक लाख रूपयांची मदत जमा झाल्याचं आणि त्याचंही गरजूंपर्यंत पूर्ण वितरण केल्याचं, पैगंबर दादा सांगतात.
यानंतर पुढे प्रामुख्याने शैक्षणिक मदत लोकांना करायची याचा चंग मुस्लिम समाजसुधारणा चळवळीने बांधला. कारण कुराणात सांगितल्याप्रमाणे जर बकरीचा बळी देऊन त्या मांसाचा एक हिस्सा जरी गरिबांत वाटला, तरी तो त्यांची भूक दोन दिवसांच्यावर भागवू शकत नाही. पण शिक्षण हे एक असं आयुध आहे की, जे तुम्हांला भविष्यात कायमस्वरूपी भाकरी मिळवण्याची सोय करतं. त्यामुळे यानंतर येरवड्यातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याची मदत, ‘कामायनी’ या विशेष विद्यार्थ्यांच्या संस्थेला धान्य कीट वाटप, वारजेमधील मामासाहेब मोहोळ शाळेच्या खोलीला फरशी बसवून देणे, यवतमाळ मधील धनगरवाडीतल्या मुलांचे पालकत्व स्वीकारणे, साताऱ्यातल्या जिजाऊ वसतिगृहातील 50 विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू पुरविणे यासह कित्येक गरजूंना वैयक्तिक फी भरणे, शिक्षणाचे साहित्य, मेसचा खर्च अश्या अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत.
पैगंबर शेख यांचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मदत आलेल्या रकमेतील पै न पैचा हिशोब पारदर्शकरित्या त्यांच्या सोशल मीडियावर दिलेला दिसतो. शिवाय संस्थांना / व्यक्तीला थेट आर्थिक देणगी देण्यापेक्षा आवश्यक त्या वस्तू, सेवा पुरवण्यावर त्यांचा कल असतो, जेणेकरून पैश्यांचा दुरूपयोग होऊ नये. शिवाय हे पैसे फक्त मुस्लिम समाजासाठी नव्हे तर सर्व जाती धर्मातील गरजूंसाठी वापरले जातात.
2022 साली देखील त्यांच्याकडे दीड लाख रूपये जमा झालेले आहेत, आणि या पैश्यांतून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळच्या एका अंगणवाडीचे रंगकाम आणि अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाणार आहे. शेख यांच्या कामास शुभेच्छा.
लेखन: स्नेहल बनसोडे शेलुडकर, संपर्क, पुणे
#नवीउमेद
#बकरीईद
#आर्थिककुर्बानी
#विधायक
#अंधश्रद्धांनाफाटा